ज्ञानदीप लावू जगी : काम सृष्टीचा वेलु वाढवी ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

– हभप प्रशांत महाराज मोरे देहुकर

जो अप्रवृत्तीचा अव्हांटा । सांडूनि विधीचिया निघे वाटा । तेवींचि नियमाचा दिवटा । सवें चाले ।।48।। कामु ऐसिया वोजा प्रवर्ते । म्हणौनि धर्मासि होय पुरतें । मोक्षतीर्थींचे मुक्तें । संसार भोगी ।।49।। जो श्रुतिगौरवाच्या मांडवीं । काम सृष्टीचा वेलु वाढवी । जंव कर्मफळेंसि पालवी । अपवर्गीं टेंके ।।50।।

माऊली म्हणतात, जो काम अधर्माच्या मार्गाला सोडून वेद विधीनुसार शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने किंवा विवाहविधीच्या मार्गाने निघतो, असा नेहमी वाट प्रकाशमान राहण्यासाठी नियमाची मशाल घेऊन मार्गक्रमण करीत असतो.

काम वासनेची पूर्ती अशी शास्त्रशुद्ध आणि धर्माला अनुसरून झाली तर धर्माचे पूर्ण आचरण केल्यासारखे आहे. म्हणजे पुरुषाने धर्माशी सुसंगत अशा कामाचे सेवन केले तर त्यांना तो बाधक होत नाहीच, उलट त्या कामापासून प्रतिभासंपन्न, भगवद्‌भक्‍त अशा सत्पुरुषांची उत्पत्ती होते. अशाप्रकारे संसाराचा उपभोग घेणारे पुरुषही मोक्ष तीर्थाची मुक्‍ती भोगतात.

तो काम धर्म आणि वेदाने गायलेल्या थोरपणाच्या मांडवावर सुप्रजा निर्माण करून वंशवृद्धीची वेल वाढवतो. ती इतकी वाढते की नित्य नैमित्तिक कर्मामुळे फलासह त्या वेलाची पालवी मोक्षापर्यंत जाऊन भिडते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.