ज्ञानदीप लावू जगी : तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील ।

सप्त शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समाधी वर्ष (इ.स. 1296-2021)

-ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहुकर

तुम्हीं देवांतें भजाल । देव तुम्हां तुष्टतील । ऐसी परस्परें घडेल । प्रीति जेथ ।। तेथ तुम्हीं जें करूं म्हणाल । तें आपैसें सिद्धि जाईल । वांछितही पुरेल । मानसींचें ।।

माऊली म्हणतात, तुम्ही जर स्वधर्माच्या माध्यमातून देवांची भक्‍ती कराल तर देवही तुमच्यावर सहज संतुष्ट होतील. अशा प्रकारे तुमच्यात आणि भगवंतामध्ये प्रेमभाव उत्पन्न होईल. असे तुमच्यात परस्पर प्रेम निर्माण झाले तर तुम्ही जे करू म्हणाल, ते आपोआप सिद्धीला जाईल. तसेच मनात ज्या काही इच्छा, आकांक्षा उत्पन्न होतील त्याही पूर्णत्वास जातील.

भगवंताच्या प्रसादाने तुम्हाला वाचासिद्धी म्हणजे तुम्ही बोलाल ते सत्य होण्याची सिद्धी प्राप्त होईल. तुम्ही आज्ञा करणारे व्हाल आणि तुमची आज्ञा कोणी मोडू शकणार नाही. मोठमोठ्या सिद्धी तुम्हाला आज्ञा करा, असे मागणे मागतील. निश्‍चितच तुम्ही निष्काम भावनेने देवाशी समरूप होऊन विभक्‍त न राहता भक्‍ती केली तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल. भक्‍त आणि देव यांच्यामधली सीमारेषा आपोआप संपुष्टात येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.