दखल : डुम्सडे क्‍लॉक

-ॲड. हृषिकेश काशिद

जगाचा अंत “या दिवशी, या तारखेला, या वेळेला’ होईल, अशा बातम्या आपण बऱ्याचवेळा ऐकल्या आहेत. ती तारीख निघून जाते आणि अशा बातमीतला फोलपणा समोर येतो. मात्र, पर्यावरणाची हानी ज्या गतीने होत आहे ती पाहता पृथ्वीचा विनाशकालही जवळ येत आहे, हेसुद्धा सत्य आहे.

“डुम्सडे क्‍लॉक’ म्हणजे जगाच्या अंताचं घड्याळ याला प्रलय घड्याळ म्हणून देखील ओळखतात. जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा ऱ्हास आणि अणुयुद्धाचा धोका याचा परिणाम या घड्याळाच्या वेळेवर होतो. 1947 पासून हे घड्याळ जगबुडीची वेळ दाखवत आहे. हे काटे बारावर पोहोचल्यावर जगात प्रलय येणार असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. काही वेळेला घड्याळाचे काटे उलटे फिरताना आढळतात. हे घड्याळ अमेरिकेतील बुलेटीन ऑफ ऍटमिक सायंटिस्ट या स्वयंसेवी संस्थेने बनवले आहे. याच्या उभारणीत 13 नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांचा सहभाग होता. याची देखरेखसुद्धा तज्ज्ञ शास्त्रज्ञ करतात. जेव्हा या घड्याळाची सुरुवात झाली तेव्हा यामध्ये बाराला सात मिनिटे कमी अशी दाखवत होती. आतापर्यंत 24 वेळा ती पुढे मागे झाली आहे. सद्यस्थितीत ती 110 सेकंद म्हणजे जेमतेम बाराला दोन मिनिटं कमी अशी दाखवत आहे.

संयुक्‍त राष्ट्रांनी शाश्‍वत विकास उद्दिष्टे स्वीकारली आहेत त्यापैकी 13 व्या क्रमांकाचे उद्दिष्ट हे हवामान बदलांवरील परिणामांवर प्रत्येक राष्ट्रांनी तात्काळ कृती करावी असे आहे. यावरून या विषयाचे गांभीर्य अधोरेखित होते.पृथ्वीच्या भोवतालच्या वातावरणाचे तापमान वाढणे म्हणजे ढोबळमानाने जागतिक तापमान वाढ असे म्हणता येईल. मात्र याला देखील बरेच कंगोरे आहेत. आजच्या हवामानाचा विचार करता पावसाळ्यात चटके लागणारे ऊन, भर उन्हाळ्यात पाऊस तर हिवाळ्यात देखील उन्हाळ्यासारखे ऊन यालाच जागतिक तापमान वाढीचे परिणाम म्हणतात. नैसर्गिकरीत्या निर्माण झालेल्या समस्यांसाठी आपण निसर्गाला दोष द्यायला विसरत नाही. मात्र अनेक वेळा यातील काही समस्या या मानवनिर्मित समस्या असतात हे मात्र आपण सोयीस्कररित्या विसरतो. याच समस्यांचे परिणाम निसर्ग काही वर्षांनी आपल्याला भोगायला लावत असतो. उदा., जागतिक तापमान वाढीमुळे चामोली येथे घडलेली घटना, हिमालयातील बर्फ वितळून हिमकडा कोसळला अशा दुर्घटना वारंवार घडतात. अंटार्क्‍टिका येथील बर्फ दिवसेंदिवस वितळत आहे.

1899 पासून वैज्ञानिक पृथ्वीच्या अक्षाच्या थरथरण्याचा अभ्यास करीत आहेत. विसाव्या शतकात ते थोडेसे कॅनडाकडे झुकल्याचे आढळले, पण 2002 नंतर ते इंग्लंडकडे झुकल्याचे आढळले असून अक्षाची गती दरवर्षी 7 इंचाने पूर्वेकडे वाढत आहे. जागतिक तापमानवाढीमुळे ध्रुवावरील बर्फ वितळले. विशेषत: 2003 पासून ग्रीनलंडवरील 273 ट्रिलियन किलो, तर पश्‍चिम अंटार्क्‍टिकावरील 124 ट्रिलियन किलो बर्फ वितळले. मात्र, पूर्व अंटार्क्‍टिकावर 74 ट्रिलियन किलो बर्फ दरवर्षी जास्त गोळा होत गेले, तसेच यामुळे सागरी प्रवाहात आणि पातळीतही बदल होत आहे. याच असमतोलामुळे पृथ्वीचे ध्रुव थरथरत आहेत.हवामान बदल जैवविविधतेवर परिणाम करतो या गोष्टीचे पुष्कळ पुरावे आहेत. मिलेनियम इकोसिस्टीम असेसमेंट नुसार हवामान बदल हा या शतकाअंती जैवविविधतेवर प्रभाव टाकणारा सर्वात महत्त्वाचा चल घटक ठरणार आहे. यामुळे प्राण्यांचे आधिवास बदलतात. त्यांच्या प्रजाती नष्ट होईल असा ठळक परिणाम त्यातून होतो.

वनस्पतींना संघर्ष करावा लागतो. मानवालासुद्धा जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अनेक रोग असे आहेत जे हवामान बदलामुळे जडतात परंतु लवकर कळत नाहीत.
एल्‌-निनोचा परिणाम हा पेरू व चिली देशांच्या किनारपट्टीवर दिसतो. विषुववृत्तालगत पाण्याखालून वाहणारा प्रवाह कधी कधी पाण्यावर येतो. असे झाल्यास पृथ्वीवरील हवामानात मोठे बदल होतात व त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीवरही होतो. एल्‌-निनो परिणामामुळे मोसमी वाऱ्यांना अवरोध निर्माण होऊन भारतात दुष्काळ पडतो. एल्‌-निनो परिणामामुळे पृथ्वीवर 1 ते 5 वर्षापर्यंत सरासरीपेक्षा जास्त तापमान नोंदवले जाऊ शकते.

औद्योगिक क्रांतीनंतर प्राचीन काळी गाडल्या गेलेल्या जंगलांचा मानवाने इंधन म्हणून मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला. कुठलाही कार्बनी पदार्थ जाळला की त्यातून कार्बन डायऑक्‍साइडची निर्मिती होते. लाकूड आणि दगडी कोळसा जाळल्याने कार्बन डायऑक्‍साइडचे प्रमाण वाढू लागले. दगडी कोळसा जाळला जात असताना कार्बन डायऑक्‍साइड वायूबरोबर कोळशामध्ये असलेल्या गंधक आणि त्याची संयुगे यांच्या ज्वलनाने सल्फर डायऑक्‍साइडही हवेत मिसळू लागला. विसाव्या शतकात कोळशाबरोबर खनिज तेल आणि इंधन वायूंच्या ज्वलनामुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्‍साइडची भर पडली.

जागतिक तापमानवाढीचे भारतावरसुद्धा अनिष्ट परिणाम पाहवयास मिळतात. मध्य भारतात पावसाचे प्रमाण वाढले आहे तर ईशान्येकडील पर्जन्यमान तुलनेने कमी झाले आहे. गंगा खोऱ्यातील पश्‍चिम भागात पावसाचा कालावधी कमी झाला. कृष्णा व गोदावरीच्या खोऱ्यात प्रचंड पाऊस व त्यामुळे जास्तीचे पूर येतात. 1950 पासूनच पृथ्वीचे तापमान वाढत आहे. मात्र आता आपल्याला अनियमित वातावरणातील बदल पाहायला मिळत आहे. ही समस्या मानवी जीवनाचा नाश करणारी समस्या असल्याने आपल्याला याकडे लक्ष देणे अत्यंत आवश्‍यक आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.