अग्रलेख : कॉंग्रेस – तीच समस्या, तीच स्थिती!

बिहार विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला आलेल्या अपयशानंतर कॉंग्रेसमधील नाराजी नाट्य पुन्हा उफाळून आले आहे. ज्येष्ठ नेत्यांच्या मनातील खदखद पुन्हा नव्याने बाहेर येत आहे. पूर्वी ज्या 23 नेत्यांच्या गटाने पक्षाच्या कार्यपद्धतीवर जाहीर आक्षेप घेतले होते किंवा काही शंका उपस्थित केली होती त्याच नेत्यांनी पुन्हा डोके वर काढून पक्षातल्या कार्यपद्धतीतील त्रुटी दाखवून त्यावर जाहीर टीकाटिप्पणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे नेतृत्व, पक्षाची स्थिती आणि त्यांची कार्यपद्धती यावर पुन्हा चर्चा उपस्थित झाली आहे.

कपिल सिब्बल यांच्या पाठोपाठ पी. चिदंबरम्‌ आणि गुलामनबी आझाद यांनी हा विषय वृत्तपत्रीय मुलाखतींमधून उपस्थित केला आहे. कॉंग्रेसकडे आता ग्राउंड लेव्हलची संघटना मजबूत राहिलेली नाही. पक्षाच्या नेते मंडळींच्या कार्यपद्धतीमुळे कार्यकर्ते व नेते यांच्यात संवाद राहिलेला नाही, वरून नेते लादण्याच्या पद्धतीमुळे पक्षातील समन्वय तुटत चालला आहे वगैरे निरीक्षणे या नेत्यांनी नोंदवली आहेत. राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाला दीड वर्ष अध्यक्ष नाही, अध्यक्षांविना एखादा राष्ट्रीय पक्ष असा दीड वर्ष चालवला जाऊ शकतो काय, असा एकदम बोचरा सवाल कपिल सिब्बल यांनी उपस्थित केला आहे. हे असे असले तरी कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीत मात्र अजून काहीही फरक पडलेला नाही. त्यांचा सारा कारभार कोणत्याही चिंतेविना अत्यंत औपचारिकपणे सुरू आहे. पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष निवडा एवढी एक साधी मागणीही कॉंग्रेसमध्ये मान्य होणार नसेल, तर हा पक्ष देशात पुन्हा भक्‍कम पर्यायी राजकीय पक्ष म्हणून कधी उभा राहणार, अशी चिंता कार्यकर्त्यांना सतावते आहे आणि ती अत्यंत स्वाभाविकच आहे.

राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर गांधी कुटुंबातील कोणीही अध्यक्षपद स्वीकारणार नाही अशी जाहीर भूमिका राहुल गांधी यांनी घेतली होती. त्यांच्या या धाडसी विधानामुळे कॉंग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार, याविषयी मोठेच कुतूहल निर्माण झाले होते. पण त्यानंतर पर्यायी अध्यक्ष निवडण्याऐवजी सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष करून वेळकाढूपणा करण्यात आला आणि आता या गोष्टीलाही दीड वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. त्यांना नवीन अध्यक्ष अजून निवडता आलेला नाही. आता पक्षातील नाराजी पुन्हा वाढू लागल्याचे दिसल्यानंतर अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याच्या बातम्या सोडण्यात आल्या आहेत. या याद्या तयार कधी होणार, प्रत्यक्षात अध्यक्षपदाची निवडणूक कधी होणार याचा कोणताही निश्‍चित कार्यक्रम मात्र जाहीर करण्याचे टाळण्यात आले आहे. म्हणजे पुन्हा असल्या सबबी पुढे करून त्यांना आणखी वेळकाढूपणा करायचा आहे, असे साफ दिसते आहे. असा वेळकाढूपणा करण्याने कॉंग्रेस नेतृत्वाला नेमके काय साधायचे आहे, हेही समजेनासे झाले आहे.

सोनिया गांधी यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पक्षाध्यक्षपदाचा कारभार झेपत नाही. त्यामुळे तांत्रिक अध्यक्ष नेमून दिवस ढकलण्याऐवजी पूर्ण वेळ सक्रिय अध्यक्ष निवड का केली जात नाही, असा प्रश्‍न विचारणारा नेता लगेच फॅमिलीच्या विरोधातील नेता म्हणून तिथे गणला जातो आणि गांधी फॅमिलीशी निष्ठा दाखवू पाहणारे बाकीचे नेते या नेत्यांवर तुटून पडतात असा सिलसिला गेली दीड वर्ष सुरू आहे. आताही अधिररंजन चौधरी या फॅमिलीनिष्ठ नेत्याने पक्षात विरोधी सूर काढणाऱ्या नेत्यांनी पक्षातून बाहेर पडावे आणि स्वत:चा स्वतंत्र पक्ष काढावा, असा सल्ला दिला आहे. दुसरे एक फॅमिलीनिष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनीही पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी जाहीर वाच्यता करणे टाळा, असा सल्ला या नेत्यांना दिला आहे. कॉंग्रेसमधील या नेतेमंडळीचे आपसात जे काही राजकारण चालते त्याच्याशी जनतेला किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना यत्किंचितही देणेघेणे नाही. कार्यकर्त्यांना पक्षाला हुरूप देणारे नवीन नेतृत्व तातडीने हवे आहे आणि मोदींच्या कारभारावर नाराज झालेल्या जनतेला समर्थ पर्यायी राजकीय पक्ष हवा आहे. ही अपेक्षा कॉंग्रेस पूर्ण करू शकते काय, हा आजचा प्रमुख प्रश्‍न आहे. या साऱ्या स्थितीचा कॉंग्रेसच्या नेत्यांना अंदाज आलेला नसावा, असे म्हणता येणार नाही.

राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ अशी नेतेमंडळी त्या पक्षात असताना पक्षाची हालचालच एकदम मंदावत चालली आहे, हे कसे? याचे कोडे मात्र उलगडताना दिसत नाही. कॉंग्रेसने या आधीही अनेक मोठे पराभव पचवले आहेत, पण आजच्या इतकी गलितगात्र कॉंग्रेस कधीच दिसली नव्हती. या आधीच्या पराभवानंतर पुन्हा कॉंग्रेसचेच पुनरागमन होणार याचा विश्‍वास त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना असायचा. पण आता कॉंग्रेसच्या पुनरागमनाचा विश्‍वास बाळगणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. देशाच्या उभारणीच्या कार्यात अत्यंत मोलाचे योगदान देणारा हा पक्ष आहे. अनेक अर्थाने देशाला पुढे नेण्याचे श्रेय निर्विवादपणे कॉंग्रेसकडे आणि त्यांच्या महान नेत्यांकडेच जाते. स्वातंत्र्य प्राप्तीच्या काळापासून संपूर्ण भारताच्या जडणघडणीचे काम या पक्षाच्या नेत्यांनी केले आहे. देशाच्या विकासाचे अनेक मापदंड कॉंग्रेसच्या काळातच प्रस्थापित झाले आहेत.

सारा देश अनेक वर्षे प्रचंड बहुमताने या पक्षाची पाठराखण करीत राहिला होता. एकेकाळी कॉंग्रेसचे तिकीट मिळणे म्हणजे निवडणूक सहज जिंकून येण्याची हमी मानली जात असे. अशी सारी पार्श्‍वभूमी असलेल्या पक्षाची आजची केविलवाणी अवस्था मात्र कॉंग्रेसप्रेमी मंडळींना अस्वस्थ करणारी ठरू लागली आहे. कॉंग्रेस हा स्थितीवादी पक्ष आहे, जे आहे तसेच पुढे चालवायचे अशी भूमिका घेणे हाच या पक्षाचा स्थायीभाव आहे, असे अनेकांचे निरीक्षण आहे.

कोणत्याही विपरीत परिस्थितीमुळे अचानक गांगरून जाऊन किंवा गोंधळून जाऊन हा पक्ष कधीच तडकाफडकी कोणताही निर्णय घेत नाही. परिस्थिती पूर्ण शांत आणि नियंत्रणात आल्यानंतर ते त्यांची कृती करीत असतात असा त्यांच्या कार्यपद्धतीचा आजवरचा अनुभव असला तरी सध्याची लांबलेली निष्क्रियता मात्र आश्‍चर्यकारक आहे. देशातील राजकीय परिस्थिती कमालीची बदललेली असली, तरी कॉंग्रेस मात्र या बदलाला सामोरे जाण्यास तयार नाही याचेच हे द्योतक मानायचे काय?

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.