विविधा : डार्विनचा सिद्धांत

-माधव विव्दांस

24 नोव्हेंबर, 1859 रोजी चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ “ओरिजिन ऑफ द स्पेसिज’ प्रकाशित केला. डार्विनचा जन्म 1809 सालचा. डार्विनचे वडील डॉक्‍टर होते. मुलानेही डॉक्‍टर व्हावं, ही त्यांची इच्छा होती. त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; पण डार्विनला रक्‍त बघवत नसे. त्यामुळे त्यांनी हा अभ्यासक्रम मध्येच सोडून दिला आणि केंब्रिज विद्यापीठात धर्मशात्राचा अभ्यास सुरू केला. त्यांच्या सुरुवातीच्या लेखनामध्ये धर्माच्या बाजूने लिखाण असे. मात्र, काही दिवसांनंतर त्यांचे मतपरिवर्तन होऊ लागले. यामागे त्यांचा प्रवास कारणीभूत ठरला. 

वर्ष 1831-36 या पाच वर्षांच्या काळात द. अमेरिका, अटलांटिक महासागरातील बेटे, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, गालॅपागस बेटे, केप ऑफ गुड होप, टॅस्मेनिया, सेंट हेलेना इ. ठिकाणी त्यांनी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी तेथील प्राणी, वनस्पती व खडक यांचे सूक्ष्म अवलोकन करून अनेक नमुने गोळा केले तसेच निरीक्षणेही नोंदविली. यातील निरीक्षण व नोंदी यावरून “प्राणी जातींच्या उगमा’ संबंधी (निर्मितीसंबंधी) त्यांच्या मनात काही निश्‍चित कल्पना साकार होऊ लागल्या.

विशेषतः प्राचीन वनस्पतींच्या काही जीवाश्‍मासंबंधी (शिळारूप अवशेषांसंबंधी) अभ्यास करून भूतकालीन व वर्तमानकालीन जातींच्या परस्परसंबंधांचे त्यांना आकलन होऊ लागले. सफरीहून परत येईपर्यंत त्यांना जीवविज्ञानाच्या प्रगतीबाबत संशोधन करण्याची दिशा सापडली. त्यांनी 1839-46 या काळात प्रवासातील माहितीचे चार-पाच ग्रंथांमध्ये संकलन केले असून त्यावरून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, लेखनशैली आणि संशोधक वृत्तीची ओळख होते. “ए नॅचरॅलिस्ट्‌स व्हॉएज ऑन द बीगल’ हे प्रवासवर्णन आदर्शवत मानले जाते.

कबुतरांच्या संकरणाबद्दलची (कृत्रिमरीत्या केलेल्या प्रजोत्पादनाची) माहिती त्यांनी संकलित केली तसेच जगातील शिंपली जलचराबद्दल (बॉर्नकल) चार पुस्तिकाही प्रसिद्ध केल्या. ते लंडनमधील भूविज्ञान मंडळाचे चिटणीस (1838-44) होते व 1839 मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवडले गेले.
डार्विनने जवळपास पंचवीस वर्षे (1833-58) सृष्टीनिरीक्षण व संशोधन करून विद्यमान जीवांच्या जातींच्या उत्पत्तीसंबंधी आपला सिद्धांत तयार केला.

वर्ष 1838 मध्ये टॉमस रॉबर्ट माल्थस यांनी प्रसिद्ध केलेला लोकसंख्येबद्दलचा प्रबंध (एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन) डार्विन यांच्या वाचनात आला. त्यामध्ये उल्लेखलेली “जीवनातील स्पर्धा’ ही कल्पना त्यांच्या कल्पनेशी सुसंगत असल्याचे त्यांना जाणवले. या जगात असलेल्या विविध प्राणीजातींची अनुयोजनांची निवड शक्‍य आहे. ही एक मध्यवर्ती कल्पना त्यांच्या “जातीचा उगम’ या विषयाच्या चर्चेत आढळते. या विषयाचा पक्‍का आराखडा 1844 मध्येच तयार झाला व त्यासंबंधीच्या सिद्धांतास 1858 साली प्रसिद्धी मिळाली.

सर्व जीव हे स्वयंजननापासून उत्पन्न झालेले असून ते सर्व अपरिवर्तनीय आहेत, ही कल्पना जुनी व शतकानुशतके रूढ होती तसेच त्याला धार्मिक पाठबळ होते. रूढ कल्पना निराधार असून त्यांच्या सिद्धांताप्रमाणे सर्व विद्यमान जीव प्राचीन व साध्या जीवांपासून क्रमाक्रमाने विकास पावत आले आहेत व ते परिवर्तनीय आहेत, ही “जैव क्रमविकास’ सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना डार्विन यांनी मांडली व त्यासाठी आपल्या ग्रंथात याला सबळ पुरावा सादर केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.