प्रकाशकिरण : – अटल बोगदा : नवी लष्करी ताकद

Madhuvan

-ब्रिगे. हेमंत महाजन (निवृत्त)

सामरिकदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या अटल बिहारी वाजपेयी टनेल (बोगदा) चे उद्‌घाटन लवकरच होण्याची शक्‍यता आहे. त्यामधून सैन्याच्या गाड्यांची हालचाल लडाखला सुरू झालेली आहे. यामुळे भारतीय सैन्याला लडाखच्या सीमेवरती आपली सामग्री पाठवण्याकरता दुसरा महत्त्वाचा रस्ता जास्त वेळ उघडे ठेवण्याची संधी मिळालेली आहे.

सध्या लडाखमध्ये जाण्याकरता भारतीय सैन्याला दोन रस्ते उपलब्ध आहेत. पहिला रस्ता हा जम्मू-श्रीनगर-जोझिला खिंड-द्रास-कारगिलमधून जातो आणि दुसरा रस्ता हिमाचल प्रदेशमधून रोहतांग खिंडीतून मनालीद्वारा लेहला पोहोचतो. परंतु हे दोन्ही रस्ते वर्षातून कमीतकमी पाच ते सहा महिने बर्फ पडल्यामुळे बंद असतात. परंतु आता अटल टनेलमुळे हिमाचल प्रदेशमधला रस्ता नऊ ते दहा महिने उघडा राहू शकतो.

अटल बोगदा हा जगातील सर्वात उंच ठिकाणी असून त्याची लांबी नऊ किमी आहे. मनाली ते लाहॉल आणि हिमाचल प्रदेशातील स्पिटी व्हॅली या जोड रस्त्यांवरील या बोगद्यामुळे 46 किमीचं अंतर कमी होणार आहे. हा रस्ता 12 महिने प्रवासाच्या सोयीचा असेल, थंडीमध्येही बंद पडणार नाही. 1998 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातच 3 जून, 2000 साली या रोहतांग बोगदा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. या प्रकल्पाचे काम “डिफेन्स रोड कन्स्ट्रक्‍शन एजन्सी’, आणि “बॉर्डर रोड्‌स ऑर्गनायझेशन’ यांच्याकडे 6 मे, 2002ला देण्यात आले. “फिझिबिलीटी’ अभ्यास “जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया’कडून करून घेतला गेला आणि भौगोलिक अभ्यास जून 2004 मध्ये झाला. संरचना व मार्गदर्शन तत्त्वे ऑस्ट्रियन “फर्म स्मेक इंटरनॅशनल’ने ठरवली. तांत्रिक बाजूंकरिता या प्रकल्पाला 2003 मध्ये, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 2005मध्ये मान्यता मिळाली.

अटल बोगद्याची वैशिष्ट्ये 

हा बोगदा 9.02 किमी लांब, 10.5 मी. रुंद व 5.52 मी. उंच असा असेल. या बोगद्याचे काम मे 2020 मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. परंतु चिनी व्हायरसमुळे हे काम तीन-चार महिने विलंबाने झाले. हा बोगदा म्हणजे हिमाचल प्रदेश व लडाखमधील लाहॉल व स्पिटी व्हॅलीत राहणाऱ्या लोकांसाठी फार उपयुक्‍त ठरणार आहे. मनाली व लेह रस्त्यावरील 46 किमी अंतर कमी होणार आहे. हा रोहतांग खिंडीतला पर्यायी मार्ग ठरणार आहे. त्यामुळे पाच तासांचा प्रवास हा अवघ्या 2-3 तासांवर येणार आहे.

बोगद्यातील काही सोयीसुविधा

बोगद्यामध्ये प्रत्येक 150 मी. अंतरावर टेलिफोनची व्यवस्था आहे. प्रत्येक 60 मी. वर फायर हायड्रेंट ठेवले आहेत, तर 500 मी. वर आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आहेत. 250 मी. वर कुठल्याही बिघाडाकरिता वा दुरुस्तीकरिता ध्वनिक्षेपणाची व्यवस्था व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचीही व्यवस्था बोगद्यात करण्यात आली आहे. या बोगद्याला प्रकाशदर्शन ऑटो ऍडजस्टमेंटने नैसर्गिक स्थितीनुसार बनण्याची व्यवस्था केली असून त्यामुळे ऊर्जेमध्येही बचत होणार आहे. 

या बोगद्यातून वाहनांना ताशी 80 किमी वेगाने प्रवास करता येईल. दिवसाकाठी दीड हजार ट्रक व तीन हजार गाड्या जातील, एवढी या बोगद्याची क्षमता आहे. तसेच या भागात थंडीत बर्फ पडत असल्यामुळे, मनालीच्या बाजूला बर्फ हटविण्याची व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे. मात्र मनाली-लेहमार्गाकरिता आणखी तीन पर्यायी बोगद्यांची आवश्‍यकता आहे. त्यामध्ये, बारालाचा खिंडीखालून 16 हजार 40 फूट उंचीवर 13.2 किमी लांबीचा बोगदा, लाचुंग खिंडीखालून 16 हजार 800 फूट उंचीवरून 14.78 किमी लांबीचा बोगदा, तगलांग खिंडीखालून 17 हजार 480 फूट उंचीवरून 7.32 किमी लांबीचा बोगदा बांधला जाणार आहे.

अनेक अडचणींचा सामना

“स्ट्राबॅग एजी अफकॉन जॉईंटव्हेन्चर कंपनी’ला प्रकल्प पूर्ण करण्याकरिता अनेक अडचणींना चार वर्षे तोंड द्यावे लागले. त्यातील एक मुख्य अडचण होती 587 मीटर लांब सेरीनाला. बोगद्याच्या छतावरून पाणी वाहत होते व ते बंद करण्यासाठी बोगद्याची कामे झाल्यावर “वॉटर प्रूफिंग’ करण्यात एक वर्ष गेले. तसेच दगड फोडण्याच्या कामांतही फार विलंब झाला. अटल बोगद्याच्या कामासाठी एकूण तीन हजार कंत्राटी मजूर कार्यरत होते व 750 नेहमीचे इंजिनिअर्स व टेक्‍निशिअन्सची टीम पूर्णवेळ काम करत होती. या भागात काम करायला मजूर मिळत नाही फक्‍त सहा महिने काम करता येते. त्याकरता तीन हजार मजूर प्रत्येक वर्षी झारखंडमधून आणले गेले. अशा या बोगद्याचे काम फार कठीण असे होते, पण बांधकामा दरम्यान एकाही कामगाराला इजा झाली नाही वा कुणाचाही मृत्यू झाला नाही.

लेहचा प्रवास सोपा करेल अटल बोगदा

हा नवीन बोगदा लडाखप्रमाणे पर्यटकांना लाभदायक ठरणार आहे. रोहतांग खिंडीमुळे या महामार्गावर अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. पण, या नवीन बोगद्यामुळे पर्यटकांचा लेहचा प्रवास सोपा होईल. या बोगद्यामुळे पुढील थंडीमध्ये या मार्गावर अन्न पुरवठा व इतर पुरवठा या अडचणी कमी होतील.या अटल बोगद्यामुळे आता या विभागातील सर्वांगीण विकासाचे एकूणच चित्र पालटणार आहे.

बोगद्याचे सामरिक महत्त्व

अटल बोगदा प्रकल्प पूर्ण करणे हे “बीआरओ’साठीही मोठे आव्हानात्मक काम होते. बोगद्यामुळे भारत-चीन हद्दीपर्यंत अनेक किमींचे महामार्ग जाळे फार उपयुक्‍त ठरणार आहे. सध्या लडाखच्या पूर्वेकडे भारत-चीन तणाव असताना, हा बोगदा प्रकल्प फार महत्त्वाचा ठरणार आहे. या बोगद्यामुळे सुरक्षा बल, त्यांचे साहित्य लडाखच्या हद्दीपर्यंत कमी वेळात पोहोचू शकेल आणि चीनबरोबर लढण्याची क्षमतादेखील वाढवू शकणार आहे. अटल बोगद्यामुळे मनाली आणि किलॉंगमधील 45 किलोमीटरचं अंतर कमी होणार आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास 12 हजार फुटांच्या उंचीवर साकारण्यात येणारा हा बोगदा जगातील सर्वात उंच बोगदा आहे, ज्याच्या निर्मितीसाठी जवळपास चार हजार कोटी रुपये इतका खर्च आला आहे.सर्वसामान्य नागरिकांबरोबरच हा बोगदा सैन्य दल वाहनांच्या वाहतुकीसाठीसुद्धा फायद्याचा ठरणार आहे. अटल बोगदा सर्वार्थाने लडाखच्या विकासाचे प्रवेशद्वार ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.