-हिमांशू
नवनवीन तंत्रज्ञानाची प्रचंड ओढ असलेल्या, स्वतःला टेक्नोसॅव्ही म्हणवून घेणाऱ्या आणि मुख्यत्वे वारंवार हॅंडसेट बदलण्यासाठी आपल्या गरजांमध्ये बदल करणाऱ्या लोकांना सध्या अॅलेक्साचं जबरदस्त आकर्षण आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानावर काम करणारी ही अॅलेक्सा म्हणजे हाकेला उभा ठाकणारा अल्लाउद्दिनचा जिन!
तंत्रज्ञानानं आपलं जीवन जास्तीत जास्त सुखी करून घेण्याचा प्रयत्न मानवाने नेहमीच केला. जीवन सुखी करायचं म्हणजे, स्वतःला जास्त कष्ट पडू द्यायचे नाहीत किंवा सध्या पडताहेत ते कष्ट कमी करायचे, असाच अर्थ सामान्यतः घेतला जातो. अॅलेक्सा नावाचा जिन सांगितलेली कामं करतो आणि विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतो, असं आम्ही ऐकून आहोत.
डिजिटल क्षेत्रातली ही नवी क्रांती ठराविक मोबाइलमध्येही दिसू लागलीय. काल आम्ही नवख्या शहरात गेलो होतो तेव्हा हवं होतं ते ठिकाण आमच्या मित्रानं त्याच्या मोबाइलला तोंडी सांगितलं आणि मोबाइलने अचूक नकाशा दाखवला. काहीजण मोबाइल फोनशी बोलतात आणि मोबाइल ते शब्द टाइप करतो, हेही आम्ही पाहिलंय.
इंटरनेट ऑफ थिंग्ज आणि आर्टिफिशियल इन्टेलिजन्स एकत्र आणल्यास घरातल्या वस्तू आपण दुरून हाताळू शकतो. गॅस, दिवे, नळ खुले राहिले असतील तर घराबाहेरूनच ते बंद करू शकतो. एखादी गोष्ट हवी असेल तर ती जवळच्या जवळ कुठे मिळेल हेही आपल्याला ऍलेक्सा सांगू शकते म्हणे!
स्वयंचलित होत चाललेल्या जगात आपण अजूनही लिहितो, टाइप करतो, चालतो, सबब आपण खूपच मागास आहोत, म्हणून कधी-कधी वैषम्य वाटतं. आमचे मित्र आपापल्या नव्या फोनमध्ये असणाऱ्या लेटेस्ट फीचर्सबाबत रसभरीत चर्चा करतात तेव्हा अतोनात फ्रस्ट्रेशन येतं. आपल्याकडे तसा मोबाइल नाही म्हणून नव्हे, तर ही मंडळी जे बोलतात त्यातलं काहीच कळत नाही म्हणून!
आमचा हा न्यूनगंड दूर करण्याचं काम बरेलीतल्या मोहंमद सैद यांनी केलं. “टारझन – दि वंडर कार’ नावाचा चित्रपट आम्ही फॅण्टसी म्हणूनच पाहिला होता. पण ती फॅण्टसी या गृहस्थानं खरी करून दाखवली. त्यांची मोटारसायकल मालकाच्या आवाजावर चालत असली, तरी तिला ऍलेक्साचा बोजडपणा नाही. सैद यांनीही तिचं नाव “टारझन’ असंच ठेवलंय.
“टारझन स्टार्ट हो’ म्हटल्यावर ती आपोआप सुरू होते. हॅण्डलपर्यंत हात न्यायचा अवकाश की ती स्टॅंडवरून खाली उतरते. “टारझन, गाना सुनाओ’ म्हटल्यावर गाणं ऐकवते. तेही दरवेळी वेगळं! सैद फिरते व्यापारी असून, या मोटारसायकलवरून फिरून वस्तू विकतात. त्यांच्या या बाइकमध्ये “एटीएम’सुद्धा आहे. ग्राहकाला सुटे पैसे परत देताना फक्त ओरडून सांगितलं की, एटीएममधून नेमकी तेवढी रक्कम बाहेर पडते.
वस्तुतः अशी मोटारसायकल म्हणजे आजकाल कुणाला जादू वाटणार नाही. अॅलेक्साच्या या जमान्यात कुणाला या बाइकचं फारसं अप्रूप असणार नाही. परंतु ती तयार करणारे तिचे मालक मोहंमद सैद हे स्वतः अशिक्षित आहेत. आज ते ऐंशी वर्षांचे आहेत. त्यामुळेच त्यांनी बनवलेल्या या बाइकचा वृत्तांत टीव्हीवर पाहताना आमचा न्यूनगंड गळून पडला. सैद यांच्या बाइकला वेग किती ठेवायचा हे तोंडी सांगितल्यावर समजतं. पण जीवनाचा वेग किती ठेवायचा, हे आपल्याला कोण सांगणार?