विशेष | लोकोत्तर पुरुष आद्य शंकराचार्य

– यो. नं. काटे

भारतीय मनावर तसेच राष्ट्र व धर्मजीवनावर ज्या लोकोत्तर महापुरुषांचा प्रभाव पडला आहे त्यात आद्य शंकराचार्य यांचे नाव म्हणजे माळेतील मेरुमण्यासारखे आहे. 17 मे रोजी त्यांची जयंती साजरी झाली. त्याबाबत…

भगवद्‌पाद श्रीमदाचार्य केवळ तत्त्वज्ञानी नव्हते तरी आत्मसाक्षात्कारी, महाकवी, महान भगवद्‌भक्‍त, धर्मपुनर्घटना करणारा द्रष्टा, प्रखरबुद्धीवादी कुशल समाजसंघटक व थोर मातृभक्‍त अशा सर्वंकष पैलूंनी नटलेले व्यक्‍तिमत्त्व म्हणजे आचार्य. त्यांच्या मंगलमय प्रतिभेचा प्रकाश आपणास एका दिव्य वातावरणात नेल्याशिवाय राहात नाही. त्यांच्या साहित्याने हिंदू तसेच भारतीय संस्कृतीस भरभक्‍कम असा शाश्‍वत तत्त्वज्ञानाचा पाया दिला आहे.

याच तत्त्वज्ञानाच्या पायावर वाचस्पती मिश्र, अयप्पा दक्षिति, श्रीहर्ष, महामुनी विद्याअरण्य, सर्व भागवतधर्मीय महाराष्ट्रीय संत परंपरा, रामकृष्ण परमहंस, लोकमान्य, योगी अरविंद, श्रीरमण महर्षी, स्वामी विवेकानंद, डॉ. राधाकृष्णन आणि अलीकडील सूत्रभाष्यकार स्वामी वरदानंद भारती यांचे साहित्य पाहिले असता त्या साहित्य विचारांवर आचार्यांच्या विचाराचा केवढा विलक्षण प्रभाव आहे लक्षात येईल.

आचार्यांनी सांप्रदायिक तंट्यात अडकलेल्या भारतीय वैदिक समाजाला आत्मभान देत एकात्मतेच्या धाग्यात बांधून धार्मिक, राष्ट्रीय सामाजिक तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात सुसंघटित जीवनप्राप्त करून दिले. आजच्या जडवादी, चंगळवादी वातावरणात आमच्या धार्मिक, राष्ट्रीय अस्मिता तसेच निष्ठा डोळस व प्रखर करण्यासाठी या लोकोत्तर राष्ट्रपुरुषाच्या जीवन व तत्त्वज्ञानाचे चिंतनपूर्व श्रद्धायुक्‍त अंतःकरणाने परिशीलन करणे आपले व पुढच्या पिढीची ही जबाबदारी आहे. त्यांच्यासंबंधी ऐतिहासिक वा विश्‍वसनीय तत्कालीन वा समकालीन साहित्य उपलब्ध नाही. याविषयी बरीच मतमतांतरे आहेत. विशेष म्हणजे पू. भगवद्‌पाद यांनी त्यांच्या भाष्यग्रंथात वा स्तोत्रादी साहित्य रचनेत स्वतःविषयी एक अक्षरही लिहिले नाही.

आचार्य चरित्राचा शोध घेतला असता तर आपणास हे लक्षात येईल की, आचार्य यांच्या दिग्विजयाचे वर्णन करणारा एक ग्रंथ “विजय डिंडिम’ श्री पद्मपादाचार्य या आचार्य शिष्याने लिहिला, मात्र, दुर्दैवाने आज हा ग्रंथ उपलब्ध नाही. “बृहत्‌ शांकरविजय’ नावाचा एक ग्रंथ आचार्य शिष्य श्री तोटकाचार्य यांनी लिहिला मात्र तोही आज उपलब्ध नाही. मूळ स्वरूपात मात्र “माधवीय शंकरविजया’चा टीकाकार धनपतिसुरी याने त्याच्या टीका ग्रंथात समावेश केला आहे. अलीकडे आचार्यांच्या चरित्रासंबंधात संस्कृत व मराठीत बरेच साहित्य ऐतिहासिक व परंपरेला धरून उपलब्ध झालेले दिसते.

त्यात आनंदगिरी यांच्या “शांकर दिग्विजय’, “बृहत्‌ शांकर विजय’ इ.चा समावेश होतो, तर मराठीत संतकवी आधुनिक महिपती श्री दासगणु महाराज विरचित “ओविबद्ध श्रीशंकराचार्य चरित्र’ तसेच डॉ. सच्चिदानंद शेवडे यांचे “पुनर्उत्थान रामकृष्ण मठाचे आचार्य शंकर’ आणि अलीकडे प्रकाशित झालेला नवा ग्रंथ म्हणजे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक लेखक शं. रा. तळघट्टी लिखित “आद्य शंकराचार्य प्रणीत अद्वैत वेदांत दर्शन’ हे आचार्य यांच्या जीवनाचा ऐतिहासिक व पारंपरिक श्रद्धेला तडा न जाता योग्य मागोवा घेतल्याचे या ग्रंथातून जाणवते. तथापि एक आशा बाळगण्यास काय हरकत आहे जसे की कौटिल्याचे “अर्थशास्त्र’ व भरतमुनींचे “नाट्यशास्त्र’ शतावधी वर्षांनंतर मिळालीत तसेच पद्मपाद व तोटाकाचार्य यांचे ग्रंथही मिळतील ही आस धरूया.

युगसंधित श्रीमदाचार्य यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने पंथोपंथी वाढलेली अनाचार तंटे मिटवत व त्याला शास्त्रशुद्ध तर्काचा आधार देत वेदसंमत अद्वैत तत्त्वज्ञान हे कसे तत्त्वज्ञानाच्या कक्षेत परिपूर्ण आहे हे सिद्ध केले. याला लोकमान्य यांनी “गीतारहस्य’ या त्यांच्या अद्वितीय अशा भाष्यात नासदीय सुक्‍ताचा हवाला देत उत्तमरीत्या सांगितले.
आचार्य यांनी हिंदूधर्मांतर्गत असलेल्या प्रमुख पंचपंथांमध्ये समन्वय साधत पंचायतन पूजा पद्धतीचा प्रारंभ केला. हिंदूधर्मातील दोन प्रभावशाली संप्रदाय वैष्णव व शैव. या संप्रदायांचे तत्कालीन केंद्र हे दक्षिण भारतातील हरिहर व मुकांबिका येथे होती. तेथे शास्त्र चर्चा करून पंच दैवतांच्या उपासना मार्गाचा शास्त्राधार देत त्याचे महत्त्व पटवून देत संप्रदायांमध्ये एकात्मता निर्माण करत वैदिक अध्यात्मिक ध्येयवादास पुनर्जीवन दिले.

आचार्यांनी दोन दिग्विजयी यात्रा केल्यात. पहिली यात्रा एकटे असताना केली. त्यात त्यांनी भट्टपाद यांचे शिष्य मंडनमिश्र यांचा पराभव करत त्याला आपला शिष्य बनविले. दुसरी यात्रा आचार्य यांनी 23 व्या वर्षी प्रारंभ केली. या वेळेस मात्र ते एकटे नव्हते. पद्मपादाचार्य आनंदगिरी सुरेश्‍वराचार्य इ. दिगंतकीर्तीच्या संन्यासी शिष्यवर्ग त्यांच्या सोबत होता. या यात्रेचा उद्देश म्हणजे भारतातील उपासना केंद्रांना भेटी देऊन पंडिताना वादात जिंकून वेदप्रणीत अद्वैत तत्त्वज्ञानाची प्रतिष्ठापना केली. वेदप्रामाण्य पुनर्जीवित केले. या विजययात्रेत आचार्यांनी राष्ट्रास एका सूत्रात बांधण्यासाठी पूर्व-पश्‍चिम, उत्तर-दक्षिण या दिशेला मठांची स्थापना केली. शास्त्रसमन्वय, संप्रदायसमन्वय आणि आचारसमन्वयाने वैभवशाली आणि तेजस्वी राष्ट्र म्हणून भारत पुन्हा उभा राहील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.