अग्रलेख | लपवाछपवी अजून किती दिवस?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येला 14 जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. हा एक अत्यंत गुणी आणि होतकरू अभिनेता होता याबद्दल कोणाचेच दुमत नाही. त्याचा दुर्दैवी अंत अनेकांना चटका लावून गेला. त्याने त्याच्या राहत्या घरातच अचानक आत्महत्या केल्याची बातमी त्याच्या चाहत्यांवर एके दिवशी वीज कोसळावी तशी कोसळली. ज्यांनी सुशांतचा एकही चित्रपट पाहिला नव्हता किंवा हा अभिनेता नेमका कोण आहे याचीही ज्यांना कल्पना नव्हती त्यांनाही त्याच्या आत्महत्येच्या बातम्यांतील तपशील वाचून निश्‍चितच दु:ख झाले असणार. 

प्रचंड संघर्षानंतर मुंबईच्या चित्रपटसृष्टीत तो आताच कुठे स्थिरस्थावर होत असताना वयाच्या 34 व्या वर्षी त्याने राहत्या घरातच आत्महत्या करून आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना दु:खद असली तरी त्या घटनेचा देशपातळीवरून इतका नाहक गाजावाजा केला गेला की, या साऱ्या प्रकरणाला प्रचंड मोठे गुढत्व प्राप्त झाले आहे. त्याने आत्महत्या करताना कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवली नव्हती की, त्याच्या आत्महत्येचे कोणतेही समर्पक कारण पुढे आले नव्हते. त्यामुळे जे काही प्रश्‍न उभे राहिले त्याचेच भांडवल करीत मीडियामधून अभूतपूर्व आगडोंब माजवला गेला. त्यावेळच्या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांमधील सादर झालेल्या बातम्या आजही आठवल्या तरी उद्विग्नता निर्माण करतात. महाराष्ट्रातील बड्या राजकारण्यांचा त्यात सहभाग होता अशा वावड्या उठवल्या गेल्या. 

सुशांतसिंह प्रकरणात राज्यातील सत्ताधारी सहभागी असल्याची पक्‍की खात्री लोकांना पटवून देण्याचाही आटोकाट प्रयत्न झाला. त्यातच त्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर बिहारच्या निवडणुका असल्याने त्या अनुषंगानेही वातावरण तापवले गेले कारण सुशांतसिंह हा मूळचा बिहारचा रहिवासी होता. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांच्या हातून या प्रकरणाचा तपास काढून घेतला गेला आणि न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून या विषयाचा तपास सीबीआयकडे सोपवला गेला. महाराष्ट्र पोलिसांचीही बदनामी केली गेली. महाराष्ट्र पोलीस यातील सत्य दडपत असल्याचेही चित्र निर्माण केले गेले. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची एकही संधी इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांनी सोडली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीतून नेमके काय बाहेर येणार याची देशभर उत्सुकता निर्माण झाली होती. हे प्रकरण सीबीआयकडे सोपवूनसुद्धा आज तिनशे दिवसांचा कालावधी उलटून गेला आहे, पण सीबीआयकडून या विषयाचा प्राथमिक तपास अहवालही सादर झालेला नाही. 

आज सुशांतच्या पहिल्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने सीबीआयला या प्रकरणातील तपासाची पुन्हा आठवण करून देण्याची वेळ आली आहे. सुशांतचा चौकशी अहवाल सादर करण्यास सीबीआयला इतका का वेळ लागतो आहे, हा प्रश्‍न आता केंद्र सरकारलाही विचारण्याची वेळ आली आहे. कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी आज हेच प्रश्‍न घेऊन केंद्र सरकारला काही रास्त प्रश्‍न विचारले आहेत. सुशांतने आत्महत्या केली नाही, तर त्याची नियोजनबद्ध हत्या केली गेली आहे, असे वातावरण त्यावेळी निर्माण केले गेले होते. लोकांचीही तशी खात्री पटवण्याचे काम प्रसार माध्यमांनी केले होते. आता फक्‍त सुशांतचे नेमके मारेकरी कोण? या प्रश्‍नापर्यंत हे सारे प्रकरण येऊन ठेपले होते. 

सीबीआय महिनाभरात या साऱ्या प्रकरणाचा छडा लावेल अशी अपेक्षा होती. पण आज बरोबर 310 दिवस होऊनसुद्धा सीबीआयने या प्रकरणाचा अहवाल दिलेला नाही, की त्यांना याचा पुरता छडा लावता आलेला नाही. दरम्यानच्या काळात सुशांतच्या मृत्यू विषयाची दिल्लीच्या एम्स संस्थेचे एक न्यायवैद्यकीय पॅनल नेमून तपास केला गेला. त्यांनी मात्र तातडीने योग्य तपास करून अहवाल सादर केला आणि त्यात त्यांनी सुशांतची हत्या झालेली नाही तर त्याने आत्महत्याच केली असल्याचे स्पष्टपणे नमूद केल्यानंतर या साऱ्या प्रकरणातील हवा तेव्हाच निघून गेली होती. आता फक्‍त सीबीआयच्या तपासाचे निष्कर्ष पुढे येणेच बाकी आहे.

सीबीआयला एखाद्या विषयाचा तपास करण्यासाठी नेमका किती कालावधी लागतो हेही आता स्पष्ट होण्याची गरज आहे. पानसरे, दाभोलकर हत्या प्रकरणांचाही तपास सीबीआयकडे होता त्याचे पुढे काय झाले, हे सगळ्यांना माहिती आहे. तपास कोठवर आला आहे या विषयी तरी सीबीआयने आजच्या सुशांतच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने काही उलगडा करणे अपेक्षित होते. या सुमारे वर्षभराच्या तपासात आक्षेपार्ह असे काही आढळून आले नसेल, तर सीबीआयने तसे स्पष्टपणे जाहीर केले पाहिजे. कारण या साऱ्या प्रकरणात महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आणि राज्यातील पोलीस दलाची प्रचंड बदनामी झाली आहे, त्यामुळे सीबीआय अहवालाला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. अहवाल सादर करण्यास सीबीआयवर नेमका कोणाचा दबाव आहे याचाही अंदाज आता लोकांना यायला लागला आहे. 

सुशांतसिंह याच्या आत्महत्येच्या प्रकरणात इतके घाणेरडे राजकारण खेळले गेले आहे की, ज्याची आजवर कोणी कल्पनाही केली नसेल. मेन स्ट्रीम मीडिया तर पिसाटल्यासारखा या प्रकरणाच्या मागे लागला होता. देशातील सर्व महत्त्वाचे प्रश्‍न बाजूला पडून दोन महिन्यांहून अधिक काळ लोकांच्या कानावर सुशांतसिंह याच्या आत्महत्येखेरीज अन्य कोणताही विषय पडत नव्हता. जशी बिहारच्या इलेक्‍शनची प्रक्रिया पूर्ण झाली तसा हा विषय मागे पडला आणि सीबीआयचा तपासही थंड्या बस्त्यात गेला आहे. या काळात राजकारण आणि राजकारण्यांकडून होणारा मीडियाचा वापर याचे एक अभूतपूर्व रूप लोकांना पाहायला मिळाले. देशातल्या बदललेल्या राजकारण पद्धतीची ही सुरुवात होती. 

देशातील महत्त्वाच्या प्रश्‍नांवरील लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मुंबईच्या चित्रपटसृष्टीचा असाही उपयोग करून घेतला जाऊ शकतो, हे देशात पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे. सुशांतच्या पहिल्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने या साऱ्या घडामोडींना उजाळा देताना एकच गोष्ट प्रकर्षाने मांडण्याची आवश्‍यकता आहे ती म्हणजे आजवरच्या तपासात सीबीआयच्या हाती ज्या काही नोंदी लागल्या आहेत, त्या निष्पक्षपणाने लोकांच्या पुढे मांडल्या गेल्या पाहिजेत. यातील तथ्य लोकांच्या पुढे आलेच पाहिजे. यात लपवाछपवी किंवा चालढकल केल्याने सीबीआयच्याही प्रतिष्ठेचा घसारा होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.