-हिमांशू
वाद काय फक्त आपल्याच देशात उफाळतात? मुद्दाम वाद निर्माण करणारेसुद्धा केवळ आपल्याच देशात आहेत, असं समजायचं कारण नाही. फारतर असं म्हणता येईल, की “वेळ पाहून’ किंवा “वेळ गाठून’ वाद निर्माण करणारे आपल्याकडे संख्येनं थोडे अधिक आहेत. काहीजणांनी तर जास्तीत जास्त वाद निर्माण करून आपली ताकद दाखवून द्यायची, असा नववर्षाचा संकल्प केलाय, असंही आम्ही ऐकून आहोत.
परंतु आजतरी आम्हाला आपल्याकडच्या कोणत्याही ताज्या वादाबद्दल बोलण्यात रस नाही. कसा असेल? पोलंडमध्ये निर्माण झालेल्या वादाबद्दल कळलं तर सगळेच आपल्याकडचे वाद विसरून जातील. खरं तर “नवं वर्ष, नवा वाद’ हा शिरस्ता राखून दरवर्षी एका कंपनीकडून हा वाद मुद्दाम निर्माण केला जातोय म्हणे! मुळात या कंपनीचा व्यवसायच थोडा वेगळा आहे; त्यामुळे वादाचं स्वरूपही वेगळं असणार हे उघड आहे.
“मृत्यू हे अंतिम सत्य आहे,’ हे आपण सगळेच स्वीकारतो आणि मृत्यू हा गंभीर विषय आहे, यावरही जगभरात एकमत आहे. “मृत्यूनंतर काय,’ या प्रश्नावर मतांतरं आहेत, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्याच्या पद्धतीतसुद्धा विविधता आहे; परंतु एखाद्याचा मृत्यू ही दुःखद घटना आहे, असं सगळेच मानतात. परंतु अंत्यसंस्काराची सेवा पुरवणं हाच एखाद्या कंपनीचा व्यवसाय असेल, तर गणितं थोडी बदलतात. वादाचं कारण नेमक्या याच व्यावसायिकतेत दडलंय.
अंत्यसंस्कारांसाठी शवपेटीसह सर्व सेवा पुरवणाऱ्या या कंपनीचं कॅलेंडर हा वादाचा विषय आहे. 2010 मध्ये कंपनीनं सर्वप्रथम वादग्रस्त कॅलेंडर छापलं आणि पोलंडसह अनेक देशांमधल्या चर्चने त्यावर आक्षेप घेतला. परंतु तरीही दरवर्षी न चुकता कंपनी वादग्रस्त कॅलेंडर छापतेच आहे. यंदाच्या कॅलेंडरमध्ये तर अर्धनग्न मॉडेल्स शवपेटी ओढत नेत आहेत, असे फोटो कंपनीनं छापलेत. दर महिन्याला एक, या हिशोबानं बारा मॉडेल बारा पानांवर दिसतायत. “बारा वेगवेगळ्या शवपेट्या… बारा वेगवेगळ्या मॉडेल्स… हे आता तुमचं होऊ शकतं,’ अशी कंपनीनं या कॅलेंडरची जाहिरातसुद्धा केलीय.
अर्थातच कॅलेंडर मोफत वाटलं जात नाहीये. मृत व्यक्तीला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी आलेल्या या अप्सरा आहेत, असाही संदेश कंपनीला यातून द्यायचा असेल! पण मृत्यूचा सन्मान केलाच पाहिजे, अशी भूमिका चर्चने घेतलीय. परंतु या वादाला आणखी एक वेगळा पैलू आहे आणि तोही डोळसपणे पाहायला हवा. या कॅलेंडरची जाहिरात कंपनीने आपल्या वेबसाइटवर केली आहे आणि “2021 साठी तयार केलेली सर्व कॅलेंडर विकली गेली आहेत,’ असंही स्पष्टपणे म्हटलंय. म्हणजेच कॅलेंडरविषयी वाद असला, तरी ती मोठ्या संख्येनं विकली जात आहेत, हेही स्पष्ट झालंय.
यासंदर्भातली बातमी वाचताना सर्वप्रथम असं वाटलं, की करोनाकाळात जगभर मृत्यूचं प्रमाण वाढलंय आणि लोकांच्या मनातली भीती जावी अशा हेतूनं हे कॅलेंडर छापलं गेलं असावं. पण चर्चने आक्षेप घेतल्यानंतर कंपनीनं वेगळंच म्हणणं मांडलं. “आमची उत्पादनं म्हणजे शवपेट्या पाहून कुणीही प्राण सोडायला तयार होईल, असा संदेश आम्ही देऊ इच्छितो,’ असं स्पष्टीकरण दिलं. कंपनी आणि चर्चमधील वादाचा विषय सोडा; पण कॅलेंडर विकत घेऊन भिंतीवर टांगणाऱ्याच्या मनात नेमकं काय असेल..?