-हिमांशू
भारतातल्या अन्य नेतेमंडळींपेक्षा काश्मीरमधले नेते थोडे वेगळेच आहेत; किमान ते तसं नेहमी दाखवत असतात. खरं तर काश्मिरी नेते एकमेकांपेक्षासुद्धा टोकाचे वेगळे आहेत; परंतु आता या मंडळींनी एकत्र येऊन “गुपकार आघाडी’ स्थापन केलीय. ज्यांच्यामधून परवापर्यंत विस्तवसुद्धा जात नव्हता, असे नेते 370 कलम रद्द करण्याच्या केंद्राच्या निर्णयानंतर असे एकत्र आलेत, जणू एकाच पक्षाचे, एकाच विचाराचे असावेत. एकमेकांशी असलेलं साधर्म्य कृतीतून दाखवून दिल्यानंतर हे नेते वादग्रस्त विधानांच्या शर्यतीत उतरले.
देशभरात सगळेच नेते वादग्रस्त विधानं करतात, मग आम्ही का करू नये, असा त्यामागील विचार असावा; पण इतर नेत्यांच्या आणि आपल्या वादग्रस्त विधानांमध्ये टोकाचा फरक असणार, हे त्यांच्या गावीही नसावं. नाहीतर कलम 370 आणि 35 अ रद्द करण्याचा निर्णय माघारी घ्यावा, या मागणीसाठी आपण चक्क चीनच्या सुरात सूर मिसळतोय, हे फारुख अब्दुल्लांना समजलं असतं. कदाचित वयपरत्वे विचारशक्ती क्षीण होत असेल, असं म्हणावं तरी ते चुकीचं ठरेल. कारण करोनाच्या साथीनं इतर भेदाभेद जसे संपुष्टात आणले, तसाच वयाचा भेदही संपवलाय, हेही पुन्हा फारुख अब्दुल्लांनीच दाखवून दिलं. अब्दुल्लांचं वय आता ऐंशीच्या पुढं आहे. परंतु त्यांची विनोदबुद्धी जशी शाबूत आहे, तसंच त्यांचं तारुण्यही अजून टिकून आहे, याचा प्रत्यय त्यांनीच दिला…
करोनामुळे माणूस माणसापासून लांब राहू लागला, अंतर वाढत गेलं, हे सांगताना अब्दुल्लांना भर कार्यक्रमात काय लहर आली कुणास ठाऊक! “करोना सुरू झाल्यापासून मी पत्नीचं साधं चुंबनसुद्धा घेऊ शकलो नाही, मग तिला मिठीत घेण्याचा प्रश्नच येत नाही,’ असं त्यांनी सांगून टाकलं. डॉ. अब्दुल्ला हे पहिल्यापासून तसे हजरजबाबीच! विनोद करून समोरच्या जनसमुदायाला खिशात टाकण्याची त्यांची हातोटी विलक्षण आहे. दोन वर्षांपूर्वीच संसद भवनाच्या आवारात त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी काही प्रश्न विचारले होते. त्यांची उत्तरं देत असतानाच दोन महिला पत्रकार माइक घेऊन गडबडीनं तिथं पोहोचल्या.
त्यावेळी अब्दुल्लांनी आपण अभिनेतेही आहोत, हे दाखवून दिलं होतं. “या महिलांपासून मला कुणीतरी वाचवा हो,’ असं म्हणून डॉ. अब्दुल्लांनी तिथून पळ काढल्याचा अभिनय केला होता. अनेक छोट्या-मोठ्या समारंभांमध्ये त्यांच्या विनोदबुद्धीचा असाच अनुभव सर्वांना येतो. परंतु एखाद्या पुस्तक प्रकाशनासारख्या सोहळ्यात ते चुंबन आणि आलिंगन या विषयावर या वयात जाहीरपणे बोलतील, असं खुद्द त्यांच्या पत्नीलाही वाटलं नसेल. या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली आणि त्यांची गंमतही अनेकांनी केली. परंतु त्या निमित्तानं का होईना, अब्दुल्ला “सामान्य’ झाले, हे बरंय!
डॉ. अब्दुल्ला यांच्या या भाषणाचा व्हिडिओ लगेच सगळीकडे व्हायरल झाला आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. एका पठ्ठ्यानं डॉ. अब्दुल्ला यांची “मजबुरी’ लक्षात घेता, करोनाची पहिली लस त्यांनाच द्यावी अशी मागणी केली. अब्दुल्लांच्या विधानावर कोटी करताना दुसरा एकजण म्हणाला, “हे वर्षच अश्लील आहे. दो हजार एक-किस!’ एकाच्या प्रतिभेला पंख फुटले की आजूबाजूच्या अनेक प्रतिभा बहरतात… अशा बाबतीत तर जरा जास्तच! असो, अब्दुल्लांची “मजबुरी’ पाहून तरी करोनाने एकदाचं जावं!