अबाऊट टर्न | धक्‍का

– हिमांशू

धक्‍कादायक! असं शीर्षक देऊन दररोज इतक्‍या बातम्या येत असतात, की त्यामुळे आमची धक्‍का पचवायची क्षमताच वाढलीय आता. सायबर विश्‍वात तर सगळंच धक्‍कादायक चाललेलं असतं. परंतु त्याकडे सोयीस्करपणे डोळेझाक करायलाही आम्ही हळूहळू शिकलो आहोत. 

कोविडच्या काळानेही धक्‍के पचवायची क्षमता वाढवली आहे. आपल्या माहितीतले अनेकजण अकाली मृत्युमुखी पडल्याच्या बातम्या येतात. शिवाय, चुकूनमाकून आपल्याला ऍडमिट करावं लागलं तर ऑक्‍सिजन मिळणं अवघड आहे, हे वास्तवही लवकर पचत नाही. अधूनमधून काही सेकंद श्‍वास रोखून धरून आम्ही तो धक्‍का पचवायची तयारी करतो आहोत.

परंतु धक्‍के पचवण्याची क्षमता वाढली म्हणून अंत पाहणंही अमानवीच! आता हेच पाहा ना, मुंबईसारख्या महानगरात काहीही सापडू शकतं, असं आपण गृहित धरलं तरी आपली झेप आरडीएक्‍सच्या पलीकडे जात नाही. पण जर एखाद्यानं मुंबईत चक्‍क युरेनियमच आणून ठेवला तर तो धक्‍का सहन होईल का?

दहशतवादविरोधी पथकानं अटक केलेल्या दोघांकडे कच्च्या स्वरूपात युरेनियम सापडलं आणि ते दोघेजण हे युरेनियम कुणी विकत घेतेय का, याचा अंदाज घेत होते म्हणे! अहो, युरेनियम शब्द म्हणतानासुद्धा जीभ अनेकदा अडखळते. महाशक्‍तिशाली अणुबॉम्ब बनवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो म्हणजे युरेनियम! असा हा धातू मुंबईत आढळतो, तोही चक्‍क सात किलो याला काय म्हणायचं?

यासंदर्भात जेवढी माहिती आतापर्यंत पुढं आलीय, ती “धक्‍कादायक’ या शब्दाच्या पलीकडची आहे. महाराष्ट्र एटीएसने दोघांना नागपाड्यात अटक केली. त्यांच्याकडे सात किलो शंभर ग्रॅम युरेनियम सापडले. अर्थात सापडलेला पदार्थ युरेनियमच आहे का, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांना प्रयोगशाळेत धाव घ्यावीच लागली. प्रयोगशाळेतल्या तज्ज्ञांनी सांगितलं, हे नैसर्गिक स्वरूपातलं आणि शुद्ध युरेनियम आहे. सगळ्यात धक्‍कादायक भाग तर पुढेच आहे. पोलिसांच्या आधीच या दोन व्यक्‍तींनी एका खासगी प्रयोगशाळेशी संपर्क साधला होता. आपल्याकडे असलेले तुकडे युरेनियमचेच आहेत की नाही, याची त्यांना खात्री करून घ्यायची होती.

खासगी प्रयोगशाळेने ही माहिती खरे तर संबंधित अधिकाऱ्यांना देणे गरजेचे होते. परंतु ती न दिल्यामुळे प्रयोगशाळाही संशयाच्या भोवऱ्यात सापडलीय. तपास करणाऱ्यांना तर असा संशय आलाय, की प्रयोगशाळेतल्या कोणत्यातरी व्यक्‍तीच्या मदतीनेच या आरोपींनी युरेनियम आणलेय. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर युरेनियम आले कुठून, हा प्रश्‍न अत्यंत महत्त्वाचा असून, त्याचं उत्तर जर वेळेत सापडले नाही तर कितीतरी “धक्‍कादायक’ बातम्या आपल्याला ऐकाव्या लागू शकतील. या दोन पठ्ठ्यांकडे सापडलेल्या युरेनियमची किंमत तब्बल 21 कोटी 30 लाख रुपये एवढी आहे, असे तपास यंत्रणेने सांगितलंय.

युरेनियम हा अत्यंत दुर्मिळ धातू आहे. तो किरणोत्सर्ग करणारा असल्यामुळे अण्वस्त्र बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. सामान्य माणसाच्या हाती युरेनियम लागणे ही खरोखर “धक्‍कादायक’ बातमी आहे. हेच युरेनियम उद्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचू शकते. आरडीएक्‍सचा तर दहशतवादी सर्रास वापर करीत आहेतच; पण त्यांच्या हाती युरेनियम लागलं तर केवढा गहजब होईल, याची कल्पनाही करता येत नाही. एटीएसने या युरेनियमची गंगोत्री कुठे आहे, याचा शोध तातडीने लावायला हवा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.