-हिमांशू
“भित्यापाठी ब्रह्मराक्षस’ ही म्हण ठाऊक होती; परंतु “भित्यापाठी नफेखोरी’ हे वास्तव करोनाकाळातच उमगलं. संकटात संधी शोधणारे असंख्य लोक असतात आणि त्यांनी या काळात आपल्या गळ्यात काय-काय मारलं, हे एव्हाना सर्वांना समजून चुकलंय. जाहिराती तयार करणारेसुद्धा “फिअर ऑफ लॉस’ नावाचं काहीतरी तत्त्व सांगतात.
म्हणजे, एखादं उत्पादन घेतलं नाही तर आपला तोटा होईल, अशी भीती जाहिरात पाहणाऱ्याला वाटायला हवी. मग त्या उत्पादनाची विक्री वाढते म्हणे! हे “फिअर ऑफ लॉस’चं तत्त्व जाहिरातींमध्ये दिसू लागलं. असंख्य जाहिरातींमध्ये न चुकता करोनाचा उल्लेख येऊ लागला. नवी जीवनशैली स्वीकारणं आता कसं आवश्यक आहे आणि त्यासाठी आमचं उत्पादन किती अत्यावश्यक आहे, हे अनेक कंपन्यांकडून ठासून सांगितलं गेलं.
मुख्य म्हणजे, या नव्या जीवनशैलीत तुम्ही आमची वस्तू किंवा सेवा वापरली नाहीत तर तुम्ही जगाच्या खूप मागे राहाल, असंही सांगून झालं. ही झाली थेट नफेखोरी; पण फसवाफसवीचे उद्योगही या काळात अनेकांनी केले. ऑनलाइन गैरव्यवहार कितीतरी पटींनी वाढले, असं आकडेवारी सांगते. मुळात लॉकडाऊनपासून ऑनलाइन व्यवहारांमध्ये खूपच वाढ झाली. नवीन वापरकर्त्यांना वेगवेगळ्या भूलथापा देऊन पैसे लाटण्याचा “उद्योग’ त्यामुळे चांगलाच तेजीत आला. अर्थात फसवणूक केवळ ऑनलाइन व्यवहारांतच झाली असं नाही. ऑफलाइन गोष्टींमध्येही बऱ्याच जणांनी संधी साधली.
दक्षिण अमेरिकेतील इक्वाडोरमध्ये तर फसवणुकीचा कळसच झाला. तिथं तब्बल 70 हजार लोकांना करोनाची बनावट लस दिली गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. संपूर्ण जगाला करोना लसीची प्रतीक्षा असताना, देशोदेशीचे राज्यकर्ते लस मिळवण्यासाठी धडपड करीत असताना एखाद्या देशात खासगी क्लिनिकमध्ये इतक्या मोठ्या संख्येने खोट्या लसी दिल्या जाणं केवळ धक्कादायक नाही तर चिंताजनक आहे. या खासगी दवाखान्यात कोणता तरी “अज्ञात डोस’ लोकांना लस म्हणून दिला जात होता. एका डोसची किंमत 15 डॉलर म्हणजे जवळजवळ 1100 रुपये इतकी सांगितली गेली होती. असे तीन डोस घेतले की करोना होणार नाही, असं सांगितलं गेलं आणि लोकांचा विश्वासही बसला.
याचाच अर्थ, ज्यांनी तीन डोस घेतले त्यांनी 45 डॉलर म्हणजे 3300 रुपये मोजले. इक्वाडोरची राजधानी क्विटो या शहरात हा प्रकार उघडकीस आलाय. या क्लिनिकमधून ज्यांनी ही बोगस लस घेतली, त्यांचे जाबजबाब आता पोलीस नोंदवून घेऊ लागलेत आणि संबंधित क्लिनिक सील करून टाकलंय. आरोपींना अटक झालीय. लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या जीवनसत्त्वांचे डोस आपण “लस’ म्हणून 70 हजार लोकांना दिले, अशी कबुली क्लिनिकमधल्या डॉक्टरांनी पोलिसांना दिलीय.
“दुनिया झुकती है; झुकानेवाला चाहिये’ असं म्हणतात! आपल्या भीतीवरचं औषध एखाद्या ठिकाणी मिळतंय हे समजल्यावर तिथं गर्दी होते; रांगा लागतात. परंतु आपल्याला दिलं जातंय ते काय आहे? ते कसं काम करतं? असे प्रश्न कुणाला पडत नाहीत आणि कुणी विचारतही नाही. अर्थात, मृत्यूचं तांडव ज्यांनी डोळ्यांसमोर पाहिलं त्यांच्याकडून हेच घडणं अपेक्षित आहे. मास्क, अंतर, साबण एवढी त्रिसूत्री पाळली तरी आपल्याला धोका नाही हे आता तरी ओळखलं पाहिजे.