अबाऊट टर्न : बोध

– हिमांशू

बदलत्या काळाबरोबर गरजाही बदलत असतात आणि पूर्वी दुर्लक्षिले गेलेले विषय प्राधान्यक्रमावर येतात. अशाच अचानक अजेंड्यावर आलेल्या काही विषयांसाठी सरकारकडून स्वतंत्र विभाग स्थापन केला जातो. नवी धोरणं आखली जातात. आता इथं केंद्राच्या नव्या कोऱ्या सहकार खात्याची आणि मंत्र्यांची चर्चा होणार, असं समजून कुणीही कान टवकारू नयेत. 

राजकीय कुरघोड्यांवर भाष्य करण्याचा मोह चिपळूणच्या पुरात वाहून गेलाय. संकटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी झालेले विविध नेतेमंडळींचे दौरे पाहून तर पायाखाली भूस्खलन झालंय आणि मेंदूवर यांच्या निगरगट्टपणाची दरड कोसळलीय. चर्चा अशा लोकांची करूया, जे संकटांमधून खरोखर काही बोध घेतात आणि भविष्यासाठी काही कायमस्वरूपी उपाययोजना सुरू करतात. इथं सांगली, कोल्हापुरात दरवर्षी पाणी शिरतंय, तरी कुठल्या पक्षाच्या सरकारनं जास्त मदत दिली आणि कुठल्या पक्षाच्या सरकारनं तोंडाला पानं पुसली, या पलीकडे चर्चा जातच नाहीये.

दरवर्षी पूर आलाच पाहिजे का? येऊ नये म्हणून काय करता येईल? आतापर्यंत आपलं कुठे चुकलंय का? असेल तर दुरुस्त कसं करता येईल? हे प्रश्‍न आपल्या राजकारण्यांना कधी पडणार नाहीत आणि संकटांचं स्वरूप, व्याप्ती आणि भीषणता वाढतच जाणार! उद्या विरोधातले सत्तेवर येतील, सत्तेतले विरोधात बसतील; पण परिस्थिती अशीच असेल. माणसं चिखलाखाली गाडली गेली तरी यांची चिखलफेक संपत नाही.

नैसर्गिक संकटांची तीव्रता आणि वारंवारिता वाढण्यास जलवायू परिवर्तन, जागतिक तापमानवाढ हे घटक कारणीभूत आहेत आणि बऱ्याच अंशी ते मानवनिर्मित आहेत, याची चर्चा टाळणं म्हणजे डोळ्यांवर कातडं ओढून घेणं. संकटांची केवळ संख्याच वाढत नाहीये, तर स्वरूपसुद्धा बदलतंय, हे कॅनडातल्या “हीट डोम’वरून लक्षात आलंय. जिथं उणे तापमान असतं, तिथं माणसं उष्णतेनं होरपळून मरण पावली. अमेरिकेत वाढत्या उष्णतेने जंगलांत वणवे लागले. पण या घटनांनंतर पाश्‍चात्य जगातल्या अनेक देशांनी हा विषय सर्वोच्च प्राधान्यक्रमात आणलाय.

अमेरिकेतल्या मियामीमध्ये आणि त्यापाठोपाठ आता ग्रीसच्या अथेन्समध्ये एका विशेष अधिकाऱ्याची नियुक्‍ती झालीय. या पदाचं नाव आहे “चीफ हीट ऑफिसर’! तापमानवाढीवर लक्ष ठेवणं आणि उष्णतेची लाट येऊ नये म्हणून शहरातलं वातावरण अनुकूल करणं, हे या अधिकाऱ्याचं काम असेल. शहर थंड ठेवण्यासाठी हा अधिकारी उपाययोजना करणार आहे. कृत्रिम ऊर्जेवर चालणारी एअर कंडिशनरसारखी सामग्री वापरून नव्हे, तर शहराभोवतीची हिरवळ वाढवून, आसपासच्या शेतीचं प्रमाण वाढवून शहरं थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रस्त्यांचं आणि इमारतींचं डिझाइन सुधारलं जाईल आणि तापमानवाढीला कारणीभूत ठरणारी सामग्री बांधकामात वापरली जाणार नाहीत, याची दक्षता हा अधिकारी घेईल.

उष्णतेची लाटेची समस्या युरोपात वारंवार उद्‌भवू लागली आहे. 2018 मध्ये लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. अथेन्स शहरात तापमान वाढलं तर पर्यटक पाठ फिरवतात. पर्यटनावर अवलंबून असलेल्यांना आणि एकंदर अर्थव्यवस्थेला त्याचा फटका बसतो. पर्यावरण राखलं तर पर्यटन राहील आणि अर्थव्यवस्थाही चालेल, हे समजायला खरं तर बराच उशीर झालाय. आपल्याकडे तर निसर्गात अंधाधुंद हस्तक्षेपाचे परिणाम सांगणारे ओरडत राहिले; पण मनावर घ्यायला वेळ कुणाला आहे?

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.