चर्चा : उत्तर कोरिया पुढील आव्हाने

– नित्तेंन गोखले

युद्ध करायची उत्तर कोरियाची आर्थिक स्थिती आहे का? किम जोंग उन यांनी देशातील निवडक परमाणू वैज्ञानिक संशोधन केंद्र बंद करण्याची तयारी का दाखवली? किम यांनी या महिन्यात रशियात जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट का घेतली असावी? खालील पाच मुद्द्यांवर थोडा प्रकाश…

1. देशात मूलभूत सुविधांचा अभाव

हा देश जवळजवळ प्रत्येक वर्षी धुमश्‍चक्री, पाऊस, पूर, उष्णकटिबंधीय वादळ आणि काही भागांमध्ये दुष्काळदेखील सहन करतो. जागतिक बॅंकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, उत्तर कोरियाची लोकसंख्या सुमारे 25.37 दशलक्ष एवढी आहे.
किम जोंग उन यांना स्टर्जन माशाची खारवलेली अंडी व चिनी बर्ड्‌स नेस्ट सूप आवडते. पण दुर्दैवाने त्यांच्या देशातील 70 टक्‍के लोकांना पौष्टिक अन्न आणि स्वच्छ पिण्याचे पाणी या सारख्या मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नाहीत. येथील नागरिक आपल्या देशाचे सरकार, किम राजवंश आणि शिस्तबद्ध सैन्याला घाबरून राहतात. आर्थिकदृष्ट्या या देशाच्या हुकूमशहाला युद्ध करणे परवडणार नाही.

2. चीनबरोबर मजबूत व्यापारीसंबंध

किम जोंग उनच्या देशाला अधिक आण्विक शस्त्रे विकसित करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने त्यांच्यावर आर्थिक व व्यापार प्रतिबंध लादले. न्यूयॉर्क टाइम्सने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, आर्थिक व व्यापार प्रतिबंध असूनही चीनकडून गुप्तपणे किमच्या देशाला अनेक वस्तू निर्यात केल्या जातात. साइनो कोरिया फ्रेंडशिप ब्रिजच्या मदतीने अवजड यंत्रांसोबत अगदी बिअरच्या डब्यांपर्यंत सर्व काही ट्रकमध्ये लादून पाठवले जाते. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांमधील उपग्रहांना चकवा देण्यासाठी या गाड्या रात्रीच्या अंधारात साइनो कोरिया फ्रेंडशिप ब्रिज पार करतात. चीनमधील बऱ्याच कापड कंपन्यांनी आपले काम उत्तर कोरियाच्या कारखान्यांना आउटसोर्स केले आहे. स्वस्त श्रमांमुळे उत्तर कोरियातील कारखाने माफक दरात सेवा देऊ शकतात. याचाच फायदा सध्या चीन घेत आहे. अशा उत्तर कोरियन उत्पादित उत्पादनांना मेड इन चायना म्हणून लेबल केले जाते.

अमेरिकेतील प्रसिद्ध हॉपकिन्स विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ स्टीव्ह हांक यांनी अलीकडे पत्रकारांशी चर्चा करताना चीन-उत्तर कोरियामधील आर्थिक संबंधाबाबत मत व्यक्‍त केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोरियातील श्रीमंत लोकांना बीजिंगमधून सर्व माल आयात करून पुरवला जातो. उत्तर कोरिया चीनला लाखो टन कोळसा निर्यात करते. आंतरराष्ट्रीय दबावामुळे गेली दोन वर्षें चीनने उ. कोरियाचे सीफूड आयात करणे कमी केले आणि त्यांना परमाणू उपकरणे देखील चीनने निर्यात करणे थांबवले. एकूणच, चीन सध्या उत्तर कोरियाला वस्तू निर्यात जास्त करते आणि आयात कमी. कोरियासाठी आर्थिकदृष्ट्या हे चांगले चिन्ह दिसत नाही. चीनव्यतिरिक्‍त, रशियाबरोबर देखील उत्तर कोरिया तेल आणि कोळशाचा बेकायदेशीर व्यापार करत असल्याचे म्हटले जाते.

3. साइनो कोरिया फ्रेंडशिप ब्रिज ठरतोय आर्थिक आधार

यालू नदीवर बांधलेला हा पूल उत्तर कोरियाच्या सीनुइजू शहराला चीनच्या दांडोंगशी जोडतो. हा पूल 1943 साली प्रथम कार्यरत झाला. साधारण 1950 मध्ये कोरियन युद्धादरम्यान अमेरिकेने हा पूल नष्ट केला व नंतर काही वर्षांनी त्याची पुनर्रचना केली गेली. साइनो कोरिया फ्रेंडशिप ब्रिजजवळ अशाच एका जुन्या पुलाचे अवशेष आहेत. सध्या या ठिकाणी तिसऱ्या पुलाचे देखील काम सुरू आहे.
थोड्या शब्दांत सांगायचे झाले तर हा पूल उत्तर कोरियासाठी एकमेव आर्थिक आधार आहे. अमेरिकेच्या दृष्टीने मात्र हा पूल एक डोकेदुखी आहे. कारण या पुलावरून रात्री चीनमधून कोरियाकडे अनेक ट्रक भरून माल निर्यात केला जातो.

4. तिसरे जागतिक युद्ध सुरू करायचा मूर्खपणा किम जोंग उन करू शकतील अशी भीती अनेक देशांना वाटत होती

दक्षिण कोरियाबरोबर सतत संघर्ष सुरू असल्यामुळे किम राजवंशाने देशाचा पैसा गेली अनेक वर्षे आण्विक शस्त्रे बनवण्यात खर्च केला.देश भिकेला लागला असला तरी उत्तर कोरियाचे हायड्रोजन बॉम्ब, आण्विक शस्त्रे व लघु-श्रेणीतील क्षेपणास्त्रे जपान आणि दक्षिण कोरियाला मोठ्या प्रमाणात नुकसान पोचवू शकतात. जपान उद्‌ध्वस्त करण्याची धमकी किम वारंवार देत होते. असे केल्यास, अमेरिकेसमोर उत्तर कोरियाला उद्‌ध्वस्त करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. सुदैवाने, किम जोंग उन व डोनाल्ड ट्रम्प यांना योग्य मार्ग मिळाला आणि तिसरे जागतिक युद्ध टळले. ट्रम्प यांचा सतत द्वेष करणारी मंडळी या बाबतीत देखील त्यांचे कौतुक करत नाहीत.

5. ट्रम्पवर दबाव आणण्यासाठी किम यांनी व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली?

जून 2018 दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किंम जोंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट झाल्यापासून या दोन देशांचे संबंध खूप सुधारले. किम जोंग उन यांनी देशातील ठराविक परमाणु वैज्ञानिक संशोधन केंद्र बंद करून “निवडक’ आण्विक शस्त्रांचे समर्पण करण्याची तयारी दाखवली आहे. तरीदेखील, उत्तर कोरियावर लादण्यात आलेले आर्थिक प्रतिबंध हटवण्याबाबत संयुक्‍त राष्ट्राने काही ठोस पावले उचललेली नाहीत.

अर्थातच, त्याआधी कोरियाच्या आण्विक शस्त्रांबाबतचे अनेक प्रश्‍न सोडवणे गरजेचे आहे. या वर्षी फेब्रुवारीदरम्यान किम-ट्रम्प यांच्यात व्हिएतनाममध्ये झालेल्या बैठकीत कोणत्याही विषयावर तोडगा मिळाला नाही. कदाचित, ट्रम्पवर दबाव आणण्यासाठी, किम यांनी या महिन्यात रशियात जाऊन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.