मतलबाचे अश्रू ( अग्रलेख )

विजय मल्ल्या याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. त्याच्या भारतातील मालमत्तेच्या जप्तीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. याला आता ब्रिटनमध्ये तोंड लपवून बसलेल्या मल्ल्याने आव्हान दिले आहे. तसे करताना त्याने खोटे अर्थात त्याच्या मतलबाचे अश्रूही ढाळले आहेत. आपल्याला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करून आर्थिक मृत्युदंडाची शिक्षा अगोदरच देण्यात आली असल्याचा त्याने दावा केला आहे. इतकेच नव्हे, तर आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भात भारतात जो कायदा आहे, त्यातील कलमालाच त्याने आव्हान दिले आहे. विजय मल्ल्या चोर आहे. हा शब्द कठोर असला तरी तो असत्य नाही.

भारतातील प्रमुख बॅंकांचे तब्बल 9 हजार कोटी रुपयांचे कर्ज त्याने बुडवले आहे. कर्ज घेणे आणि संस्थेची प्रगती करणे हा प्रत्येक व्यावसायिकाचा हक्‍क असतो. किंबहुना देश- परदेशातील बरीच औद्योगिक साम्राज्ये बॅंकांनी वेळोवेळी केलेल्या मदतीवरच उभी राहिली व तगली आहेत. त्यांनी देशाच्या विकासाला हातभार लावला आहे. नोकरीची स्वप्ने घेऊन बाहेर पडणाऱ्या असंख्य युवक-युवतींना आधार दिला आहे व आशेचा किरण दाखवला आहे. कर्ज घेणे गुन्हा नाही. ते देणेही गुन्हा नाही. मात्र, त्यावर चंगळ करून आणि आपल्या उपभोगवादाचे दर्शन करून नंतर परागंदा होणे निश्‍चितच गुन्हा आहे.

मल्ल्याने तो गुन्हा केला. बॅंकांचे पैसे त्याने लाटले. ते देण्याची वेळ आली तेव्हा तो देशातून पसार झाला. जो पैसा बॅंकांनी त्याला दिला तो बॅंकांचाही नव्हता. तो सर्वसामान्य ठेवीदारांचा होता. या लोकांनी मोठ्या विश्‍वासाने तो बॅंकांकडे सोपविला होता. बॅंका त्याच्या मालक नव्हत्या, तर केवळ विश्‍वस्त होत्या. या प्रत्येक पै साठी त्या ठेवीदारांना उत्तरदाई आहेत व मल्ल्यादेखील याकरता बॅंकांना उत्तर देण्यास बाध्य आहे. मात्र, हे काहीही त्याने केले नाही. त्याला ते करायचेच नव्हते. जर तसे नसते तर तो अगोदर देशातून पसार झालाच नसता. केवळ काहीतरी सनसनाटी निर्माण होईल अशी वक्‍तव्ये करून वेळकाढूपणा त्याने चालवला आहे.

एक मात्र खरे त्याच्या या बनावातून त्याचे खरे रूप अधिक उघडे पडते आहे. त्याचे भांबावलेपण अधोरेखित होते आहे. भारतातील तपास संस्थांचा मागे लागलेला ससेमिरा आणि ब्रिटनच्या न्यायालयानेही पाठीशी घालण्यास दिलेला नकार यामुळे आपल्याभोवतीचा पाश अधिक घट्ट होत चालल्याचे मल्ल्याला दिसते आहे. त्यातून आलेले नैराश्‍य तो प्रत्येक कृतीतून दाखवून देत आहे. आपण स्वत: भारतीय बॅंकांकडून घेतलेले पैसे त्यांना परत देण्यात इच्छुक आहोत. मात्र घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त मालमत्ता त्यांनी जप्त केली आहे. सारी खाती, मालमत्ता तपास यंत्रणांच्या ताब्यात असल्याने इच्छा असूनही आपण हतबल असल्याचा दावा त्याने केला आहे.

एकीकडे असे अश्रू ढाळत असताना आणि आपल्या नसलेल्या प्रामाणिकपणाचे कातडे पांघरत असतानाच तपास यंत्रणाच्या या कथित आडमुठेपणामुळे आपल्यावरील व्याजाचा बोजाच वाढत चालला असल्याचा आरोप करत त्याने चेंडू यंत्रणांवरच टोलवला आहे. याच्यापेक्षा बेडर, निगरगट्ट आणि निर्ढावलेपणा असूच शकत नाही. त्याचे कारण म्हणजे जाणूनबुजून एखाद्या व्यक्‍तीने कोणती चूक अथवा गुन्हा केला असेल तर तो ती मान्य करेलच कशी? जर गुन्हाच मान्य नाही, तर शिक्षा कशाची असा त्यांचा तर्क असतो. त्यामुळे वेगवेगळे शब्द वापरून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न मग अशा माणसाकडून केला जातो. जे सध्या मल्ल्या करतो आहे.

पैसे देण्याची आपली तयारी असल्याचे एकीकडे सांगायचे, त्याचवेळी जप्त केलेल्या मालमत्तेकडे बोट दाखवायचे, हे सगळे करत असताना सरकारी स्तरावरील कोणा जबाबदार व्यक्‍तीचे नाव घेत संशयाचे तिसरेच भूत निर्माण करायचे, आपल्या संभाव्य तुरूंग मुक्‍कामाबाबतही प्रश्‍न उपस्थित करायचे आणि तेथील सुविधांबाबत अगोदरच बोटे मोडण्यास सुरुवात करायची असे सगळे प्रयोग या महाभागाकडून झाले आहेत व नित्यक्रमाने होतही आहेत. आपण चूक केली आहे. मात्र त्याकरता आपल्याला जबाबदार धरत शिक्षा ठोठावली गेली तर तो आपल्यावरील अन्याय असेल असे भासविण्यासाठी हे कुभांड त्याच्याकडून रचले जाते आहे.

मल्ल्या जेव्हा भरात होता, तेव्हा तो प्रसारमाध्यमांचे आकर्षण केंद्र होता. त्याची किंगफिशर एअरलाइन्स, त्याचे ते भडक आणि उथळ कॅलेंडरचे प्रकाशन, त्यासाठी केलेला तामझाम आणि असंख्य तोकड्या वस्त्रांतील ललनांची त्याच्याभोवती जमलेली गर्दी. यात भर पडली ती आयपीएलची. एका स्टार संघाचा मालक असल्यामुळे त्याने या स्टार खेळाडूंनाही त्याच्या या फसव्या चमचमत्या जगात ओढले आणि नासवण्याचा प्रयत्नही केला. या सगळ्याचे प्रसारण घराघरांत पोहोचत असल्याने तोंडात बोटे घालून माल्ल्याच्या या लीला पाहणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती.

कोणत्याही मोठ्या यशामागे एखादा मोठा गुन्हा दडलेला असतो अशा आशयाची एक इंग्रजी म्हण आहे. फार जुनी असली तरी आजच्या संदर्भात मल्ल्याला ती लागू होते. मात्र तरीही ते मान्य न करता आपणच कसे पोळलो गेलो आहोत, हे तब्बल नऊ हजार कोटी रुपये उधळून अथवा पचवून बसणाऱ्या या माणसाने म्हणणे म्हणजे देर है और अंधेरही. कायद्याचा बडगा हा सर्वसामान्यांसाठी असतो. त्यांच्याकडून काही मिळण्याची अथवा ओरबाडून घेण्याची संधीच नसते, त्यामुळे यंत्रणांच्या रोषाचे त्यांना धनी व्हावे लागते. मात्र धनिकांकडे वर जेवढे असते, त्यापेक्षा कैकपटीने अधिक खाली लपवलेले असते. त्यामुळे त्यांना हात लावण्यास सहसा यंत्रणा धजावत नाही.

मल्ल्या जेव्हा पळून गेला तेव्हा या वास्तवावर शिक्‍कामोर्तब झाले होते. एवढेच काय, कोणामुळे तो पळून गेला आणि कोण जबाबदार अशी उपकथानके जोडली जाऊन एक वेगळाच अध्याय सुरूही झाला व तो आजतागायत सुरूच आहे. आता कोर्टाचे दार ठोठवायचे व खोटे अश्रू आणि युक्‍तिवाद करत अरिष्ट लांबवण्याचा प्रयत्न करायचा आणखी नवा अंक सुरू करण्यात आला आहे, हेच काय ते या सर्व प्रकारावरून सांगता येते. मात्र हे सगळे होत असताना माल्ल्याने हजम केलेल्या पैशांची भरपाई बॅंकांच्या ठेवीदारांनी करावी का? त्याच्या रंगेल वृत्तीमुळे गोत्यात येऊन बुडालेल्या किंगफिशरमधील बेरोजगार झालेल्या हजारो युवक-युवतींनी काय करावे? या प्रश्‍नांची उत्तरेही त्याने द्यावीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.