जीवनगाणे : आत्मविश्‍वास हवा…

-अरुण गोखले

माणसाच्या व्यक्‍तिमत्व विकासामध्ये त्याच्या स्वत:च्या आत्मविश्‍वासाला फार मोठे मोल आहे. प्रत्येकाला त्याच्या कामाबद्दल, कार्याबद्दल पूर्ण आत्मविश्‍वास असायलाच हवा. मी जे केले आहे ते चांगलेच आणि योग्य असेच केले आहे, असे त्याला सांगता आले पाहिजे. एकदा एक चित्रकार त्याने काढलेले सुंदर चित्र गुरूंना दाखवायला घेऊन आला. चित्र खरंच खूप सुंदर काढले होते, त्यामुळे पाहताक्षणीच गुरुजींनी त्या चित्राची स्तुती केली.

त्यावर तो म्हणाला, “”गुरूजी! हे चित्र खरंच सुंदर आहे का? का माझ्या समाधानासाठी ते चांगल म्हणताय?” गुरू त्याचा स्वभाव ओळखून होते. ते म्हणाले, “”का तुला तसं वाटत नाही का? मग असं कर ते चित्र एका चौकात लाव आणि मी सांगतो त्याप्रमाणे चित्राखाली एक पाटी लाव.”

गुरूंनी सांगितल्याप्रमाणे ते चित्र नेऊन त्याने एका चौकात लावले. त्याखाली एक पाटी लावली. “या चित्रात जर तुम्हाला काही चूक वाटली तर चित्रावर तिथे फुली करा’

संध्याकाळी त्याने तिथे जाऊन पाहिले तर काय! त्याचे ते पूर्ण चित्र हे नुसते लोकांच्या फुल्या फुल्यांनीच भरले होते.
ते चित्र घेऊन तो चित्रकार निराश मनाने परत आला आणि गुरूंना म्हणाला, “”गुरुजी! मी यापुढे हातात कधी ब्रश धरणार नाही.” गुरुजींनी विचारले, “”अरे पण का?”

त्याने ते फुल्यांनी भरलेले चित्र दाखवले. गुरुजींनी त्याची भावनिक अवस्था ओळखली. त्याला धीर देत ते म्हणाले, “”हे बघ असा निराश होऊ नकोस. पुन्हा एक चित्र काढ.”

गुरुजींच्या सांगण्यावरून त्याने पुन्हा एक चित्र काढून आणले. त्या चित्राचेही कौतुक करीत त्यांनी विचारले. “”तुझ्या मताप्रमाणे तू हे चित्र परिपूर्ण काढले आहेस ना?”

गुरुजींनी त्याला ते चित्र नेऊन पुन्हा त्याच चौकात आणि त्याच जागी लावायला लावले. यावेळी चित्राखालच्या पाटीत मात्र थोडा बदल केला. त्यात लिहिले होते. “मी हे चित्र काढले आहे. यात जर काही चूक असेल तर ती कृपया दुरुस्त करून दाखवा.’

संध्याकाळी चित्रकार तिथे जाऊन पाहतो तर काय! त्या चित्रावर एकानेही एक सुद्धा फुली मारली नव्हती.आनंदाने त्याने ते चित्र आणून गुरुजींना दाखविले.

ते पाहून गुरुजी म्हणाले, “”पाहिलंस! लोकांना फक्त चुका दाखवता येतात. कारण चुका दाखवायला काहीच कष्ट पडत नसतात. आपण आपला आत्मविश्‍वास कायम ठेवावा. दुसऱ्यांनी चुका काढल्या म्हणून स्वतःचा आत्मविश्‍वास कमी होऊ देऊ नको”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.