स्मरण : संस्कारांचे विद्यापीठ

-नारायण ढेबे

आमचे बाबा म्हणजे डॉ. विजय देव हे अतिशय प्रेमळ, साधे, संस्कारित, अभ्यासू, मेहनती, सुस्वभावी, विचारी असं व्यक्तिमत्त्व. मी जेव्हा त्यांच्या घरात गेलो आणि त्यांच्या घरचाच एक केव्हा झालो ते मलाही कळलं नाही. माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसाधारण विद्यार्थ्याला त्यांनी मोठा आधार तर दिलाच पण माझं आयुष्य बदलण्यासाठी, घडवण्यासाठी, आकार देण्यासाठी बाबा हे एक महत्त्वपूर्ण असं व्यक्तिमत्त्व होतं. माझ्या दृष्टीने बाबा हेच माझे खरे हिरो अर्थात आयडॉल होते. त्यांचे विचार, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे मला माझ्या अखेरपर्यंत नक्कीच प्रेरणा देत राहील.

प्रा. डॉ. विजय देव यांचं निधन झाल्याची बातमी मला माझे मित्र बबन मिंडे यांच्याकडून कळाली. मी मृणालताईला फोन केला आणि तिनेही या वृत्ताला दुजोरा दिला. मी तेव्हा एका कामासाठी शिर्डी येथे निघालो होतो. ताईला सांगितल्यावर तिने मला तू परत येऊ नकोस कारण बाबांना ते कधीच आवडणार नाही. तू तुझं काम पूर्ण कर आणि आईला (डॉ. वीणा देव) येऊन भेट. मी गाडीत बसलो. गाडीच्या वेगाने माझ्या आयुष्यात मागे जात होतो. आठवणींचे एक एक कप्पे उघडत होतो.

डॉ. विजय देव (बाबांचा) आणि माझा परिचय डॉ. वीणा देव (आई) यांच्यामुळे झाला. मी वीणा देव यांचा विद्यार्थी. अभ्यास आणि मराठीची आवड यामुळे मी कॉलेज जीवनात त्यांच्या घरात प्रवेश केला. आप्पा अर्थात गो.नी. दांडेकरांची सेवा माझ्या हातून घडली. मी बाबांच्या घरी गेलो आणि त्यांचा मुलगा कधी झालो ते मलाही कधी कळलंच नाही. आमचं प्रेमाचं नातं अगदी घट्ट होतं.

कधी माझ्याकडून चुका झाल्या तरी ते रागवले नाहीत. मी कॉलेजला असताना खूप मेहनत करायचो ते पाहून ते खूप माझं कौतुक करायचे. एखादी गोष्ट चुकली असेल तर ती समजावून सांगायचे विचार करायला भाग पाडायचे आपण नेमके कोठे चुकलोय? याचा विचार करायला लावणारे विजय देव बाबा आणि शेवटी माफी मागायला लावणारे आमचे देव पण हे सारं क्षणिक असायचं. सॉरी बाबा म्हणलं की क्षणात संपूर्ण वातावरण आनंदी करणारे, वातावरण बदलायचे. डॉ. विजय देव विद्यार्थीप्रिय होते. मला आठवतंय आमच्या घरी नेहमी बाबा बैठकीवर बसलले असायचे आणि समोर किमान तीन चार विद्यार्थी बसलेले असायचे. मग ते एम.ए.चे, एम.फीलचे नाही तर पीएच.डी. करणारे हातात पेन वही घेऊन असायचे.

पण बाबा त्यांच्याबरोबर साधी साधी दैनंदिन जीवनातील उदाहरणं देत गप्पा मारायचे, चर्चा करायचे आणि यातूनच विद्यार्थ्यांचा अभ्यास घ्यायचे. त्यांची शिकवण्याची एक वेगळीच शैली होती. डॉ. देवांच्या जवळ आलेला कोणताही विद्यार्थी मग तो राज्यशास्त्राच असेलही आणि नसेलही पण तो क्षणात बाबांना गुरू मानल्याशिवाय राहत नसायचा. विद्यार्थी कोणत्याही जाती धर्माचा, गरीब, श्रीमंत, हुशार किंवा हुशार नसणारा असा भेदभाव त्यांनी कधी केलाच नाही. त्यांना सर्व विद्यार्थी आवडायचे. ते जर एखाद्या विषयावर बोलायला लागले तर वेळेचंही भान राहायचं नाही. इतक्‍या तन्मयतेने ते शिकवत असत.

मला नेहमी स्पर्धा परीक्षेला बस, असे सांगायचे आणि मी म्हणायचो, बाबा पेपर लिहिता येणार आहे का? जमणार आहे का? मी पास होईल का? यावर त्यांचं उत्तर असायचं, तू पास होणार किंवा नाही, तुझा नंबर येईल किंवा नाही यापेक्षा तू स्पर्धा परीक्षा दिल्याने तुझी विचार करण्याची पातळी वाढेल. मी ग्रामीण भागातून आलेला होतो. बोलताना, वागताना गावंढळपणा असायचा. पण ते बदलण्याचे काम डॉ. देवांनी केले. मधुरा ताई म्हणजे छोटी मुलगी म्हणायची, आनी नाही रे आणि म्हण. मग बाबा शांतपणे म्हणायचे, तू हा उच्चार नव्याण्णवेळा कर मग, माझा एखादा शब्दाचा उच्चार पूर्ण व्हायचा.

मराठी आणि इंग्रजी यांतील शब्द कधी कधी सापडायचे नाहीत. मग एकदा बाबांनी हे मधुराताईला सांगितले. तिने मला मराठी-इंग्रजी डिक्‍शनरी आणून दिली आणि मग काही अडले की त्यात बाबा शब्द शोधायला लावायचे आणि असा आमचा अभ्यास चालायचा. बाबांना बातम्या खूप आवडायच्या. वेगवेगळ्या वाहिनीवरील बातम्या पाहायचे आणि त्यावर चर्चाही असायचीच.

जेव्हा लोकसभेत अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ 13 मतांनी पडले तेव्हा त्यांना खूप दुःख झाले होते. टी.व्ही. पाहताना, तो ठराव पाहताना त्यांच्या बरोबर बाबांची रनिंग कॉमेंट्रीदेखील असायची. मी वाजपेयी सरकार पडल्यावर एक लेख एका अंकात लिहिला होता. तो वाचून ते खूप आनंदी झाले होते. त्या लेखाचे शीर्षक त्यांनीच दिले होते. “भारतीय लोकशाहीचा विपर्यास’ असे ते होते. त्यात एवढा मोठा झालेला खर्च, वाया गेलेला मौलिक वेळ या गोष्टींविषयी चर्चा होती.

बाबांचं गाव हे शिक्रापूरजवळ दहीवडी हे होते. पण आम्ही फार कमी वेळा तिकडे जायचो. त्यांचे तीन भाऊ आणि आमची बेबी आत्या यांच्याशी त्यांचं खूप चांगलं जमायचं. गो. नी. दांडेकरांसारख्या मोठ्या लेखकाचे आपण जावई आहोत, याचा गर्व त्यांनी कधी केलाच नाही. मात्र, त्यांनी आप्पांचे जावई नाही तर सर्वच गोष्टीने मुलाची भूमिका बजावली. अप्पांची सर्वात जास्त काळजी बाबा घ्यायचे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.