चिंतन : बळीराजा

-सत्यवान सुरळकर

आज महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट आहे. या दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसतो तो बळीराजाला. शेतातील कोरड्या ढेकळ्यात तो हिरवेगार पिकांची स्वप्न डोळ्यात रंगवून पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहतो. या दुष्काळामुळे त्याच्यावर आर्थिक कुऱ्हाड कोसळून तो पार उलमडून पडतो. रखरखत्या उन्हात एखादे झाड तग धरून उभे राहते, ते वाट पाहते पहिल्या पावसाची.

पाऊस आपल्या अंगावर पडला की झाड आपले रूक्ष रूप टाकून देते आणि नवीन पालवी धारण करतो. हे त्याच्या कष्टाचे फळ त्याला मिळते. त्याचप्रमाणे बळीराजाही कडक ऊन अंगावर झेलत उन्हाळ्यात शेतातील मशागत पूर्ण करतो.

पावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी करतो. पाऊस पडला की शेती आपले कोरडे रूप टाकून देऊन हिरवी गार शाल अंगावर पांघरते. त्याचप्रमाणे बळीराजाही आपले हिरवेगार शेत पाहून हरखून जातो. तोही मागील उन्हातील दुष्काळीरूप विसरून जातो आणि नव्या जोशात कामाला लागतो. मात्र, त्यानंतर सुरू होतो पावसाचा “लपंडाव खेळ’.

पुन्हा बळीराजाला सुकणारे पीक पाहून डोक्‍याला हात लावून वर आभाळाकडे तोंड करून पावसाची वाट पाहण्याचा दिनक्रम सुरू होतो. हे कधीही न संपणारे दुष्टचक्र सारखे फिरत राहते.

आज महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाने पुरता होरपळून निघाला आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दोन कामं मागे लागलेली असतात. त्यांपैकी एक म्हणजे पाण्यासाठी वणवण फिरणे आणि दुसरे म्हणजे आपल्या जनावरांच्या चाऱ्यापाण्याची कशी सोय करावी. या दोन चिंतेतच शेतकऱ्याचे उभे आयुष्य निघून जाते.

पोटच्या लेकरासारखे वाढवलेले पशुधन कसे जगवायचे हा त्याच्या पुढे प्रश्‍न उभा राहतो. अनेक शेतकरी जनावरे फक्‍त दावणीला बांधून ठेवून त्यांना उपाशी ठेवण्यापेक्षा मिळेल त्या किमतीत व्यापऱ्याला विकून टाकतात. स्वतःच्या पोटाला चिमटा काढत चाऱ्यासाठी पैसे जमा करणाऱ्या बळीराजाची अशी करून कहाणी पाहून ईश्‍वराला का पान्हा फुटत नाही?

शेतात बारमाही राबणाऱ्या या आमच्या अन्नदात्या बाबाला आज खरेच आपली गरज आहे. तो जगला तरच आपण जागणार, ही पृथ्वी जिवंत राहणार. तो आहे तोपर्यंत आपला जिवात जीव आहे. गांधीजींनी खेड्याकडे चला, असा संदेश दिला होता. आज या संदेशाचा आपणाला विसर पडला असून आपण आपल्या अन्नदात्यालाही विसरत चाललो आहे.

सततच्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी तरुण कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरतात. पाऊस सुरू झाला की पुन्हा शेतावर काम करायला हजर होतात. ही बळीराजाची क्रुर चेष्टा सुरू आहे. जो आपणाला पोटभर अन्न देतो त्यालाच अन्नाच्या शोधात शहरात यावे लागते. ही शेतकऱ्याची एकप्रकारे विटंबनाच म्हणावी लागेल.

पुरेसा पाऊस पडणे हे आपल्या हातात नसले तरी दुष्काळी परिस्थिती निर्माण न होण्यासाठी आपण नक्‍कीच प्रयत्न करू शकतो. आपल्या प्रयत्नांनी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य खुलले तेव्हाच ही धरणीमाता सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.