प्रेरणा : महिलेने केले गाव सुदृढ!

-दत्तात्रय आंबुलकर

विदर्भातील अकोला शहरापासून सुमारे 65 किलोमीटस अंतरावरील पातूर तालुक्‍यातील आडवळणावर असणारे एक छोटेसे गाव म्हणजे सायवणी. गाव छोटे असल्याने गावच्या ग्रामपंचायत सदस्यांची संख्या केवळ सात.

अशा या छोटेखानी सायवणी गावात सरपंच म्हणून सौ. स्नेहल धनंजय ताले या गेली आठ वर्षे काम पाहत आहेत. आपल्या पूर्वायुष्यात पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या स्नेहल इतर सामान्य मुलींप्रमाणेच संसारात रमल्या. मात्र, शेती यशस्वीपणे करायची असेल तर प्रत्यक्ष गावी जाऊन राहण्यास पर्याय नाही हे लक्षात आल्याने स्नेहल यांनी अकोल्यातील आपला मुक्काम हलवून त्या सायवणी गावी राहण्यास आल्या.

सायवणीला राहण्यास आल्यावर त्यांना गाव आणि गावकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांची जाणीव झाली. त्यांच्या लक्षात आले की, गावकऱ्यांना जे पाणी पिण्यासाठी मिळत असे तेच मुळी दूषित होते. त्या पाण्यामुळे गावातील अनेकांना किडनीचे आजार जडले होते. सुशिक्षित असणाऱ्या स्नेहल, हे सर्व पाहून स्वाभाविकपणेच अस्वस्थ व्हायच्या. एक सामाजिक जबाबदारी म्हणून काही रुग्णांना त्या पुढील उपचारासाठी डॉक्‍टरांकडे घेऊन जात व प्रत्येक वेळी डॉक्‍टरांचे निदान एकच असे व ते म्हणजे सायवणीच्या गावकऱ्यांना प्यावे लागणारे दूषित पाणी.

तशातच सायवणीच्या ग्रामपंचायतीची निवडणूक घोषित झाली. त्यावेळी गावकऱ्यांच्या खास आग्रहास्तव स्नेहल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या व त्या निवडून आल्या. त्यांच्या पूर्वीच्या स्वयंस्फूर्तपणे केलेल्या समाजसेवेचेच फळ म्हणून त्या गावच्या सरपंच झाल्या.

सायवणीच्या नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्याचा त्यांनी चंग बांधला. आपल्या या प्रयत्नांना अधिक प्रशासनिक पाठबळ मिळावे या उद्देशाने त्यांनी गावातील पाण्याचे नमुने अकोल्याच्या शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवून गावात वापरल्या जाणाऱ्या अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळेच अनेकांना किडनीचे आजार झाले याची शासकीय शहानिशा करून घेतली.

मात्र, एवढ्यानेच सायवणीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणारा नव्हता. शुद्ध पाण्यासाठी गावापासून चार किलोमीटरवरील मळसूर परिसरात विहीर खणून गावाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात आली. मात्र स्नेहल यांच्या या प्रयत्नाला आणि पुढाकाराला गावातीलच काही हितसंबंधी लोकांनी विरोध सुरू केला.

मात्र सरपंच म्हणून व त्यातही महिला असूनही स्नेहल टाले डगमगल्या नाहीत. त्यांनी एकीकडे आपले प्रयत्न तर सुरू ठेवलेच व आपल्या प्रयत्नांना गावकरी आणि शासकीय अधिकारी या उभयतांची साथ मिळविली. त्यासाठी आवश्‍यक पत्रव्यवहार-पाठपुरावा सुरू ठेवला व मोठ्या जिद्दीने गावासाठी व गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी सायवणीपासून चार किलोमीटर दूर विहीर खणून एवढ्या दुरून साऱ्या गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे भगीरथ प्रयत्न या महिला सरपंच स्नेहल टाले यांनी यशस्वीपणे पूर्ण केले.

सायवणीच्या गावकऱ्यांची आता अशुद्ध पिण्याच्या पाण्यामुळे होणाऱ्या किडनी विकारापासून कायमस्वरूपी सुटका घडण्याचे महनीय काम त्यांच्याकडून झाले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.