विविधा : संत सोनोपंत दांडेकर

-माधव विद्वांस

महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, एस. पी. कॉलेजचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक व वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार कै. सोनोपंत दांडेकर यांची आज जयंती.

त्यांचा जन्म 20 एप्रिल 1896 रोजी ठाणे जिल्ह्यातील केळवे येथे झाला.ते दीड वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. त्यांच्या वडिलांनी आईची उणीव भासू न देता त्यांना चांगले संस्कार व शिक्षण दिले. त्यांचे प्राथमिक शिक्षण केळवे माहीमच्या प्राथमिक शाळेत तर, माध्यमिक शिक्षण त्यांच्या बंधूंसह पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. त्यांचे संपूर्ण नाव शंकर वामन दांडेकर असे होते. ते सोनोपंत ऊर्फ मामासाहेब दांडेकर या नावाने अधिक परिचित होते.

मॅट्रिक झाल्यावर त्याच सुमारास ते विष्णुबुवा जोग या साक्षात्कारी पुरुषाच्या संपर्कात आले. विष्णू नरसिंह जोग लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी होते. सोनोपंतांना जोग महाराजांमुळे हरिभक्‍ती व देशभक्‍तीबरोबरच अध्यात्माचीही गोडी लहान वयातच लागली. पदवी मिळाल्यावर त्यांना मुंबई विद्यापीठाची प्रल्हाद सीताराम स्कॉलरशिप मिळाली आणि पुढे पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो हा विषय घेऊन ते एम.ए. झाले.

पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्याचे ठरवून शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे या संस्थेचे आजीव सदस्यत्व घेतले व न्यू पूना कॉलेजात (सध्याचे स. प. महाविद्यालय) तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. एकदा त्या मंडळात व्याख्यान देण्यासाठी डॉ. राधाकृष्णन्‌ आले असताना त्यांनी सोनोपंतांविषयी गौरवोद्‌गार काढले. तरुणपणीच त्यांची योग्यता किती होती, हे यावरून स्पष्ट होते. त्यांनी पुणे विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता तसेच अखिल भारतीय तत्त्वज्ञान परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते.

अध्यापन करीत असताना त्यांची एक अट होती. ती म्हणजे प्रत्येक आषाढीत वारीच्या वेळी रजा मिळावी. त्यामुळे त्यांनी पंढरीची वारी कधीच चुकविली नाही. वारकऱ्यांचे प्रबोधन, अंधश्रद्धांचे निर्मूलन, धर्मग्रंथांचे सादरीकरण, कीर्तनसंस्थेचे पुनरुज्जीवन, लोकशिक्षण हे त्यांच्या वारीचे हेतू होते.

एकदा असे झाले, स. प. महाविद्यालयातील एका वर्गात प्राचार्य सोनोपंत दांडेकर अध्यापनासाठी वर्गात आले. वासुदेव हरी !! पांडुरंग हरी !! अशी घोषणा वर्गात घुमली. वरील घोषणेने त्यांचे स्वागत करून विद्यार्थ्यांनी त्यांची टिंगल करण्याचा प्रयत्न केला. सरांनी लगेचच विद्यार्थ्यांस उत्तर दिले, माझ्या टिंगलीच्यानिमित्ताने तुम्ही पांडुरंगाचे नाव घेतलेत, मी धन्य झालो.

निवृत्तीनंतर त्यांनी नेवासे येथील ज्ञानेश्‍वर मंदिराचा जीर्णोद्धार केला. जत संस्थानच्या राणीसाहेबांनी सोनोपंतांना गुरुस्थानी मानले होते.राणीसाहेबांनी सोन्याचा कळस ज्ञानेश्‍वर माऊलीच्या चरणी अर्पण केला व त्याची स्थापना सोनोपंतांच्या हस्ते करण्यात आली. याशिवाय त्यांनी पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिर, पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांनी गावोगावी कीर्तने-प्रवचने करून सर्वसामान्य लोकांना नीतिधर्माचा उपदेश करून त्यांना अंधश्रद्धामुक्‍त असा सन्मार्गाचा रस्ता दाखविला. तसेच अनेक आध्यात्मिक ग्रंथांचे संपादनही केले.

ईश्‍वरवाद या ग्रंथात त्यांनी एकेश्‍वरवाद, नास्तिकवाद, देवधर्माचे भवितव्य व ईश्‍वरदर्शन या विषयांची चर्चा केली आहे. कुशल राजकारणी शरद पवार यांचे काटेवाडीतील मारुती मंदिरात त्यांचे शिष्य ह. भ. प. काळेबुवा राहायचे. ते आता हयात नाहीत. ते सुद्धा ज्ञानेश्‍वरीवर प्रवचन देत असत. त्यांची कीर्तने ऐकण्याचा एकदा योग आला. हा माणूस, एवढे सुंदर प्रवचन कसे करतात याचे मला कुतूहल होते. त्यांच्याबरोबर माझ्या बहिणीने चर्चा केली असता त्यांनी सोनोपंत दांडेकर यांच्याकडून शिकलो असे सांगितले. पुण्यात्म्यास अभिवादन.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.