लक्षवेधी : असांज पोत्यातून गोत्यात

-हेमंत देसाई

विकिलीक्‍सचा संस्थापक ज्युलियन असांजला इक्‍वाडोरच्या दूतावासातून अटक करण्यात आल्यामुळे, त्याच्यामागचे ससेमिरा वाढतच जाणार आहे. आपली अटक टळावी या उद्देशाने तो या दूतावासात वास्तव्य करत होता. इक्‍वाडोरने त्याला यापुढे आश्रय देण्यास नकार दिल्यानंतर लंडन पोलिसांनी असांजला अटक केली. असांजने 2010 मध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे सार्वजनिक केली होती आणि आपली अटक टाळण्यासाठी तो 2012 पासून इक्‍वाडोर येथील दूतावासात वास्तव्य करत होता. पाच महिन्यांपूर्वी त्याला इक्‍वाडोरचे नागरिकत्वही मिळाले होते; परंतु या लहानशा देशावर बड्या राष्ट्रांनी दडपण आणून असांजला ताब्यात घेतले.

विकिलीक्‍सने अमेरिकन सरकारची गोपनीय माहिती फोडून खळबळ माजवली होती. याप्रकरणी असांजला अमेरिकेत फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा तेथे त्याचा वेगवेगळ्या मार्गाने छळ होऊ शकतो. म्हणूनच अमेरिकेला प्रत्यार्पण होण्याच्या शक्‍यतेमुळे, मुळात ऑस्ट्रेलियन नागरिक असलेल्या असांजने मागची सात वर्षे लंडनमधील इक्‍वाडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. वारंवार आंतरराष्ट्रीय करारांचे उल्लंघन करण्याबरोबरच शिष्टाचारभंगामुळे त्याला दिलेला राजकीय आश्रय आपण काढून घेत असल्याचे इक्‍वाडोरचे अध्यक्ष लेनिन मोरेनो यांनी म्हटले आहे. जेथे फाशीची तरतूद आहे व जेथे छळ होऊ शकेल, अशा कुठल्याही देशात त्याला धाडले जाणार नाही, अशी हमी आम्ही ब्रिटनकडे मागितली आहे, असेही मोरेनो यांनी म्हटले आहे. अर्थात ब्रिटनने ती अद्याप मान्य कलेली नाही. उलट, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, असे स्पष्टीकरण केले आहे. असांज याचा सॉफ्टवेअर निर्माता असलेला एक सहकारी ओला बिनी यालाही इक्‍वाडोरमध्ये अटक करण्यात आली असून, मोरेनो सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न त्याने केला, असा आरोप करण्यात आला आहे.

एखाद्याला टार्गेट करायचे असल्यास, सरकार त्यास कोणत्याही आरोपाखाली अटक करू शकते आणि पुरावे निर्माणही केले जाऊ शकतात. सरकारचे गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्यांना दबावाखाली आणले जाते. आपल्याकडे राफेलबद्दलची वृत्ते प्रसिद्ध करून मोदी सरकारला अडचणीत आणणाऱ्या एका वृत्तपत्रावर कसे दडपण आणले गेले, याचे उदाहरण ताजेच आहे. असांजला दूतावासाबाहेर पाऊल ठेवताच पकडले जाईल, असे ब्रिटनने यापूर्वीच स्पष्ट केले होते. असांजने विकिलीक्‍सच्या संकेतस्थळांमधून अमेरिकेच्या जगभरातील दूतावासांनी पाठवलेले संदेश, पत्रे तसेच इराक व अफगाणिस्तानातील लष्करी कारवाईचे अहवाल याविषयीची सनसनाटी व गोपनीय माहिती जगासमोर आणली होती.

जागतिक दहशतवादाचा आपण सामना करत असल्याचा दावा करत असलेल्या अमेरिकेचा खरा चेहरा त्यामुळे लोकांसमोर आला. ही माहिती वाचून, अमेरिकी जनतेतही अस्वस्थता निर्माण झाली. त्यामुळे तत्कालीन अमेरिकन प्रशासनाने असांज हा हायटेक टेररिस्ट असल्याचे म्हटले. असांजला सर्व माहितीचा दारूगोळा पुरवणाऱ्या ब्रॅडली मॅनिंगला 35 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा देण्यात आली. त्यानंतर असांजवर स्वीडनमध्ये दोन मुलींवर बलात्कार केल्याचा आरोप ठेवण्यात आला. आता हा आरोप खरा की खोटा, याचा अंदाज जो तो सहज बांधू शकतो. ज्या मुलींकडून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला, त्यापैकी एकीने तर हे प्रकरणच खोटे असल्याचे जाहीर केले. एखाद्या गैरसोयीच्या माणसाला बदनाम करायचे असेल, तर या प्रकारची चिखलफेक नेहमीच केली जाते.

विकिलीक्‍सने अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या हिलरी क्‍लिंटन यांचेही खासगी ई-मेल्स जाहीर करून टाकले. त्यामुळे रशियाच्या मदतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी विकिलीक्‍स काम करत असल्याचा आरोप हिलरी यांनी केला होता. असांज याने अमेरिकेची लष्करी गुपिते फोडली आणि म्हणून तो राष्ट्रद्रोही आहे, असा मुख्य आरोप होता व आहे. वास्तविक विकिलीक्‍सला अमेरिकन लष्करी गुप्तहेर यंत्रणेच्या स्रोतातूनच महिती मिळाली होती. त्यामधून अमेरिकेने कसे कसे युद्धगुन्हे केले आणि ग्वांटानामो बे येथे इराक व अफगाणिस्तानमधील पकडलेल्या युद्धकैद्यांवर कसे अत्याचार केले, याचे पुरावेच जगासमोर आले. एखादी माहिती हॅकिंगद्वारे मिळवली गेली असेल, तरी केवळ त्यामुळेच ती प्रसिद्ध करू नये, ही अपेक्षा साफ चुकीची आहे.

भारतात राफेल कागदपत्रांच्या चोरीबाबत असेच म्हणता येईल. वास्तविक अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचा तोच तर खरा गाभा आहे. असांज असो वा स्नोडेन; त्यांच्यासारख्या माणसांवर आरोप करून, आक्रमक राष्ट्रवादाचे वातावरण निर्माण केले जाते. खरे तर विकिलीक्‍सचा आणि रशियन गुप्तचर यंत्रणेचा काहीही परस्परसंबंध नाही. मात्र, विकिलीक्‍समुळे पश्‍चिमेतील उदारमतवादी लोकशाहीवरील जगाच्या विश्‍वासास तडा गेला. उलट असांजसारख्यांमुळे राष्ट्रवादीच बेफाम झाले. त्यामुळे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांनी “आय लव्ह विकिलीक्‍स’ असे उद्‌गार काढले. असांज याने माहितीचे लोकशाहीकरण केले. त्यासाठी डिजिटल क्रांतीचे हत्यार वापरले.

खरे तर जागतिकीकरणामुळे पारदर्शकता वाढली. संपूर्ण जग एकत्र आले. माहितीचा प्रस्फोट झाला. मोठ्या प्रमाणावर माहितीची देवाणघेवाण झाली; परंतु गैरसोयीची माहिती प्रसिद्ध करणाऱ्या असांजला मात्र जनतेचा व राष्ट्राचा शत्रू ठरवण्यात आले, ही विसंगती नाही, तर दुसरे काय आहे? आता असांज प्रकरण पुढे काय काय वळणे घेते व त्यात कोण भरडले जाते, हे पाहावे लागेल. तूर्त असांज गोत्यात आला आहे, एवढे मात्र खरे!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.