संडे स्पेशल : लेह-स्वप्नांची दुनिया

-अश्‍विनी जगताप-घाडगे

दुसऱ्या दिवशी सार्चूला रामराम करून पुन्हा नवीन जोशात आम्ही लेहकडे प्रवास सुरू केला. कालच्या थंडीमुळे माझी तब्बेत थोडी नरमच होती; पण जोश 100 पटीने जास्त होता. कारण आज आम्ही लेहला पोहोचणार होतो.
जशी प्रवासाला सुरुवात झाली तसा पाऊसही आमचा सोबती बनला. बाजूला खळखळून वाहणारी नदीदेखील होतीच. काही किमी गेल्यानंतर पाऊस थांबला; पण एक नवीन आव्हान समोर आलं “21 घाला लूप्स’ ह्या घाटात 21 हेअर पिन बॅंड्‌स (नागमोडी वळणं) आहेत आणि रस्त्याची स्थिती आधीच खराब.

त्यात समोरून येणाऱ्या अवजड वाहनांमुळे अजून भीती वाटत होती. आमच्यातले एक-दोन जण त्या वळणांवर बाईकवरून खाली पडलेही, हे सगळं बघून सारखं वाटत होतं की, इथे कोणी सांगितलेलं होते यायला, पण दुसऱ्याच क्षणी आसपासच्या दृश्‍यांकडे नजर गेली की वाटायचं, यासाठी आलो आहे इथे.

इतक्‍या कठीण रस्त्यावरून गाडी चालवताना खरंच उत्कृष्ट ड्रायव्हिंग स्किल असणं खूप गरजेचं आहे. आम्ही कसेबसे इथून सुखरूप निघालो. यानंतर येणार होता पांग. इथे तर खरंच प्रत्येकाला चकवा लागल्यासारखा भास होतो. लडाखला जाऊन आलेला प्रत्येक जण माझ्याशी सहमत असेल. कारण माइलस्टोनवर दिसतं पांग 5 किमी अंतरावर मात्र, कितीतरी वेळ वाहन चालवल्यानंतर अगदी एखादाच किमी अंतर कमी झालेले असायचं.

पांगनंतर आम्ही पोहोचलो मोरे प्लेन्सला. ह्या जागेवर नावाप्रमाणे आसपास सगळं सपाट आहे. आतापर्यंत अनुभवल्यापेक्षा उलट अगदी उत्कृष्ट रस्ता, लांबपर्यंत पसरलेली हिरवळ आणि दूर दूर दिसणारे रंगबेरंगी डोंगर. आहाहा… काय दृश्‍य ! या रस्त्यावर बरेच दुचाकीस्वार वाऱ्याशी शर्यत लावल्यासाखे बाईक चालवत होते. पुढे काही अंतरावर डेबरिंगमध्ये एका धाब्यावर मॅग्गी सोबत आलं आणि चहा पिऊन आम्ही पुढच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालो.

इथून पुढे होता जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच मार्ग. येथे बर्फवृष्टी झाल्यामुळे ह्या पासवर पोहोचणं अजिबात सोप नव्हतं. चिखलात जसं चाक घसरतं तसंच बर्फावरही होतं, हे मला त्या दिवशी कळलं. जितका जमेल तितका तोल सांभाळत आम्ही अखेरीस त्या पास वर पोहोचलो. इथून पुढे उपशी नावाच्या जागेपासून नदी पुन्हा सोबतीला आली.

हिमालयाची बर्फाच्छादित पर्वतशिखरे, मध्येच सखल भूमीत दिसणारे नद्यांचे खळखळणारे प्रवाह, त्या भोवतालची हिरवळ, पारदर्शी निळे पाणी, तलाव, सरोवर, खोल दऱ्या असा नजारा पाहत एका वेगळ्याच विश्‍वाची सफर करत आम्ही लामाच्या प्रदेशात पोहोचलो. घाईगर्दीच्या शहरी जीवनात येणारा ताण लेह-लडाखचा निसर्ग पाहून पार कुठल्या कुठे पळून जातो. आज आता या परिस्थितीतून निघून आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचायचं बस्स इतकच डोक्‍यात असतं. बाकी सगळं विसरायला होतं. या भूमीवर एका विलक्षण शांतीचा अनुभव येतो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.