दखल : सेतू- पुणे काश्‍मीर

-शिल्पा देशपांडे

पुण्यातून काश्‍मीरसाठी काम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत, सामाजिक कार्य हे नक्‍कीच समाजाला आणि एकूणच देशाला उपयोगी असते. पुणे व काश्‍मीरमध्ये भौगोलिक आणि सांस्कृतिक अंतर असूनही अशी कोणती गोष्ट आहे की जी पुण्यातील संस्था काश्‍मीरमध्ये काम करण्यासाठी उदयास आल्या. काही संस्था अभ्यासदौऱ्यादरम्यान घटीत घटना आणि अनुभव यांनी उदयास आल्या, तर काही स्वयंप्रेरणेतून, तर काही वेगळ्या पाऊलवाटेच्या इच्छेने, अशा अनेक कारणांनी या संस्था उदयास आल्या, काहींनी तिथे प्रत्यक्ष जाऊन काम करणे पसंद केले तर काहींनी महाराष्ट्रात किंवा पुण्यातही संदिग्ध खोऱ्यातील आतंकवादाचे बळी तसेच विषम परिस्थितीतील मुला-मुलींसाठी वसतिगृहे उभी केली.

पुण्यात या “संस्थांचा उदय’ हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. अशा विविध संस्थांच्या संचालकांनी याबाबत विविध मते मांडली आहेत. 2018 पर्यंत अशा संस्थेतर्फे झालेल्या कामांचा लेखाजोखा नक्‍कीच अभ्यासाचा एक भाग होऊ शकतो आणि अजून कोणत्या गोष्टीवर काम होणे गरजेचे आहे हेही अभ्यासाद्वारे समजणे सोपे होईल.

पुण्यात चालणाऱ्या या संस्थांवर धर्मादाय आयुक्‍त आणि गुन्हे अन्वेषण विभाग यांचे नियंत्रण असते. धर्मादाय आयुक्‍तांनी सांगितले की “कोणतीही संस्था निर्माण होताना तिचा उद्देश्‍य वाईट नसतो, काही संस्थांच्या कार्याबद्दल संशय किंवा अकार्यक्षमता आढळ्यास संस्था बरखास्त न करता विश्‍वस्त मंडळाची फेरनिवड करणे जास्त हितावह असते.’

पुण्याला जसा ऐतिहासिक वारसा आहे तसाच नवीन बदल आणि चळवळींचा उदयही याच भूमीत झाला. काश्‍मिरी प्रश्‍नांना थेट भिडून तेथील परिस्थितीत थोडाफार बदल करण्याचे कार्य ह्या संस्था करतात; पण वेगात बदल अपेक्षित नसला तरी सापेक्ष तुलना नक्‍कीच अभ्यासाचा विषय ठरेल. सामाजिक संस्थेंबाबत पुण्यापुरता विचार केला तर शंभर मागे एक संस्था विविध क्षेत्रात काम करतात; परंतु अशी कोणती गोष्ट आहे की काही संस्था काश्‍मीरशी जोडल्या गेल्या आहेत, पुण्यात महाराष्ट्रासंदर्भात अनेक प्रश्‍न भेडसावत असताना सांस्कृतिक, भोैगोलिक अंतर पार करून या संस्था इथून आणि काही संदिग्ध खोऱ्यातही काम करतात. भारतात सुमारे 31 ते 35 लाख सामाजिक संस्था आहेत. म्हणजेच देशातील शाळांपेक्षा दुप्पट, दवाखान्यांपेक्षा दुप्पट आणि हाच आराखडा फक्त पुण्यापुरता काढला तर सुमारे 70 हजार संस्था मान्यताप्राप्त नोंदणीकृत आहेत.

अभ्यासाचा विषय असा आहे की, कोणत्या कारणाने पुण्यातील संस्था काश्‍मीरसाठी जोडल्या गेल्या आणि आतापर्यंत झालेल्या कामांचा तपशिलाचा अभ्यासक, राजकीय विश्‍लेषक अभ्यास नक्‍कीच करत असतील; पण सामाजिक कार्य हे वार्षिक अहवालांपुरते मर्यादित आहे का? सूक्ष्म बदलही त्या खोऱ्यात होतात का हेही तपासणे गरजेचे आहे.

पुण्यात नोंदणीकृत झालेल्या आणि काश्‍मीरला जोडल्या गेलेल्या किंवा काश्‍मीर पुण्याला जोडणाऱ्या अनेक संस्था, त्यांची नावे आणि कार्य समोर आले आहेत. त्यापैकी असीम फाउंडेशन, सरहद, पनून काश्‍मीर, बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन, जे अँड के स्टडी, ज्ञानप्रबोधिनी, मैत्र या आणि अशा अजून अनेक संस्था काश्‍मीर मुला-मुलींसाठी काम करतात हे नक्‍कीच स्पृहणीय आहे; पण त्याचबरोबर केवळ वार्षिक अहवाल हा संस्थांच्या कार्याचे मापन आहे का? कारण अहवाल कित्येक वेळा तयार केला जातो तर प्रगती ही प्रत्यक्ष दिसते .

अहवालात काही कमतरता दिसली तर याचा अर्थ काही संस्था काम करत नाही, असे नाही पण त्यांच्या कार्याचा सूक्ष्म अभ्यास केला जात नाही. या अभ्यासात कार्याच्या त्रुटीही दिसून येतील जेणे करून कार्यातील सुधारही जलद गतीने होईल. तसेच या कार्यमापांवरील अकुंश हा दबावासाठी नसून अभ्यासासाठीच असावा. या संस्थांना मिळणारे निधी, निधीस्रोत आणि आतापर्यंत झालेले बदल यामध्ये सामाजिक, राजकीय, शैक्षणिक स्तरावर अभ्यास केला तर भविष्यकालीन उपाययोजनांसाठी विचार करणे सोपे होईल.

आतापर्यंत सरकार आणि सामाजिक संस्था या काही प्रमाणात स्वतंत्र काम करतात; पण सरकारला मदत करून हवे असलेले सकारात्मक बदलही या संस्था करू शकतात. काही संस्था हे कार्य करीतही आहेत आणि म्हणूनच पुण्यातून घडणारे हे कार्य पुणेकरांसाठीही अजून एक मानाचा बिंदू ठरेल. काश्‍मीर हे गिनिपिग नक्‍कीच नाही की त्यावर वेगवेगळे प्रयोग व्हावेत, काही संस्थांची अशीही तक्रार आहे की सरकार मदत करीत नाही. त्याचबरोबर काही संस्था इतक्‍या सधन आहेत की परदेश दौरेही निधी संकलनसाठी केले जातात, विविध कार्यक्रम, भूमी संपादन अशा संस्थेला मिळते आहे.

सकारात्मक गोष्ट ही आहे की महाराष्ट्र आणि पुणे येथून जास्तीत जास्त निधी काश्‍मीरमधील कार्यासाठी जातो. अशा संस्था जास्तीत जास्त उदयाला येवो; पण त्याचबरोबर त्यांच्या कार्याचाही अभ्यास अधिक पारदर्शक होणे गरजेचे आहे. एकंदरीत पुण्यातून अशा अनेक संस्था उदयास येत आहेत, ज्यांना काश्‍मीर हा विषय संवेदनशील वाटतो ही गोष्ट चांगलीच आहे. प्रत्येक संस्थेने खोऱ्यातील एक गाव दत्तक घेतले तर पुणे ते काश्‍मीर हा पूल वेगाने बांधला जाईल यात शंकाच नाही.

महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्‍न भेडसावत असताना काश्‍मीरसाठी का काम करता? असाही प्रश्‍न या संस्थांना विचारला जातो. हे जरी खरे असले तरी काम स्वीकारणे, निवडणे आणि ते करत राहणे हे कोणत्याही भौगोलिक भागासाठी चांगलेच आहे. कारण हा भारतातीलच भाग आहे. नुकतेच बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन या संस्थेमार्फत काश्‍मीर खोऱ्यामधील लोकांसाठी अद्ययावत ऍम्ब्युलन्स देण्यात आली. या भागात वैद्यकीय सुविधा अपुऱ्या असून महाराष्ट्राच्या नाशिक भागातून ऍम्ब्युलन्स तिकडे पाठवली असल्याचे ऋषिकेश परमार यांनी सांगितले.

तसेच नुकतीच ट्रामा ऍम्ब्युलन्स ही पुण्यातीलच संस्थेमधून देण्यात आली. ज्यामुळे फिरते हॉस्पिटल सर्व सुविधांनी त्या खोऱ्यात उपलब्ध झाले. बॉर्डर सिक्‍युरिटी फोर्सलाही ऍम्ब्युलन्स पुरवणारे हातही पुण्यातीलच आहेत. एकूण काय तर काही हात शैक्षणिक, काही सामाजिक काही वैद्यकीय कार्य करत आहेत तर, काही आपल्या कार्यानेच शांती प्रस्थापित करण्याचे काम करत आहेत. हे पुणेकरांच्या दृष्टीने नक्‍कीच अभिमानाची गोष्ट आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.