मायक्रो स्क्रीन्स : झळ

-सत्यवान सुरळकर

ग्रामीण भागातील माणसांच्या पाचवीला पूजलेला दुष्काळ… भर उन्हात फक्‍त पाण्यासाठी दाहीदिशा हिंडणाऱ्या माणसाला इच्छा असते एक हंडाभर पाणी मिळण्याची… डोक्‍यावर सूर्यनारायण आग ओकतोय… जमीन तापल्यामुळे पायाला चटके बसतायेत मात्र तरीही पाणी मिळावे यासाठी हे सर्व सहन केले जाते. ग्रामीण भागातील कुठल्याही गावी हे चित्र असंच डोळ्यासमोर उभं राहतं.

नदी आटलेली, विहिरींनी तळ गाठलेला अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्वजणांना घरात पाणी भरलेले असावे यासाठी पाण्याच्या शोधात असतात. “टॅंकर’ हा यावेळी जणुकाही या लोकांसाठी देवदूत. तो त्यांच्या मदतीला धावून येतो. त्यांची तहान भागवतो. लोकं आतुरतेने वाट बघतात ती टॅंकर येण्याची.

“झळ’ ही शॉर्ट फिल्म याच विषयावर आधारित आहे. फिल्मची सुरुवात होते… एक लहान मुलगा गावातून पळत जातोय. त्यावेळी गावातील भीषण दारिद्य्र दिसते. तो मुलगा एका घराजवळ येऊन “मावशी’ अशी हाक मारतो आणि त्यांना “काहीतरी’ सांगतो. ते ऐकून त्या घरातील स्त्री व तिचा मुलगा व मुलगी पळत सुटतात…

दुसऱ्या क्षणात आपल्याला काही गावकरी रांगेत उभे राहिलेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून ते कोणाचीतरी वाट पाहात उभे असलेले आपणाला जाणवते. तेवढ्यात एक ट्रॅक्‍टर येताना दिसतो. त्या ट्रॅक्‍टरला पाहून गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरत नाही. कारण ते ट्रॅक्‍टर पाण्याचे टॅंकर घेऊन आलेले असते. मग लगबग सुरू होते पाणी भरण्यासाठी.

स्त्रियांच्या चेहऱ्यावर हास्य फुलते. लहान मुले नाचायला लागतात. काही दणकट मुले पाणी भरण्यासाठी पुढे जातात. पण टॅंकर चालक त्यांना थांववतो व रांगेत पाणी भरण्याचे धमकावितो. टॅंकर चालक पाइप काढून पाणी सुरू करतो. तेव्हा खळखळ आवाज होत पाणी हंड्यामध्ये भरले जाते. एकाचा नंबर झाला की दुसरे पाणी भरण्यासाठी पुढे हंडा करतात. मात्र, हा सुखाचा क्षण लवकरच संपतो. कारण टॅंकरमधील पाणी संपते.

एका कुटुंबाचा नंबर लागतो तेव्हा नेमकं पाणी संपतं. त्या माणसाचा जीव कासावीस होतो. तो टॅंकरवर चढून पाणी शिल्लक आहे का बघतो, पाण्याच्या पाईपमध्ये हात घालून पाणी आहे का ते तपासतो. पाणी मिळावे यासाठी त्याची खटापट सुरू असते. त्याचे कुटुंब शेजारी रिकामे भांडे घेऊन उभे राहतात. त्याची बायको टॅंकर चालकास पाणी देण्याची विनवणी करते. त्याचा मुलगा तहान लागल्याचे सांगतो. टॅंकर निघून जातो.

पाणी न मिळाल्याने हे कुटुंब घरी रिकाम्या भांड्यांनी परत येते. मग सुरू होतो खरा संघर्ष… घोटभर पाण्यासाठी. या कुटुंबाचा प्रमुख या शॉर्ट फिल्मचा नायक आहे. संदीप महाजन हे या फिल्मचे लेखक व दिग्दर्शक आहेत. बायको व मुलांची पाण्यासाठी तळमळ पाहून नायकाला राहवत नाही. तो एक हंडा उचलून कुठे पाणी मिळते का? हे पाहण्यासाठी घरातून बाहेर पडतो. रणरणत्या उन्हात रानातील सर्व विहिरी पालथ्या घालतो. पण त्याला कुठेच पाणी मिळत नाही. त्याची बायको एक भांडे घेऊन घरोघर हिंडते, मात्र, तिला कुणीही पाणी देत नाही.

निराश मनाने नायक घरी येतो. त्याची बायको त्याला पाणी मिळाले का म्हणून विचारते. मुले तहानेने व्याकुळ झालेले आहेत. अशा परिस्थितीत शेवटी नायकाच्या हातून घोटभर पाणी मिळवण्याच्या धावपळीत एक गुन्हा घडतो. एक अक्षम्य गुन्हा. त्याने केलेल्या गुन्ह्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येते. शेवटी त्या कुटुंबाला पाणी मिळते का? पुढे त्या नायकाचे काय होते यासाठी ही शॉर्ट फिल्म जरूर पाहावी.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.