प्रेरणा : तेरवीला केले हेल्मेटवाटप

-दत्तात्रय आंबुलकर

मृतात्म्याला शांती मिळावी व त्यांच्या आत्म्याला चिरगती मिळावी यासाठी घरगुती स्वरूपात नातेवाईक व कुटुंबीय विविध विधींद्वारा श्राद्ध घालतात. “श्रद्धापूर्वक केले ते श्राद्ध’ अशी यासंदर्भात श्रद्धापूर्ण धारणा असली तरी कुणाच्या घरी निधन झाल्यास मृताच्या दशक्रिया विधीपासून तेरवीपर्यंत विविध विधी केले जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो व या निमित्ताने मृतकाच्या छायाचित्रासह जाहिरातींपासून परिसरातील चौकांमध्ये फ्लेक्‍स लावण्यापर्यंतची कामे केली जातात.

या साऱ्या रूढीवादी व परंपरागत पार्श्‍वभूमीवर बारामतीजवळील करावगंज या छोटेखानी गावातील 47 वर्षीय महिला पूनम बनकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तेरवी-श्राद्धप्रसंगी एक सामाजिक जबाबदारीचा आदर्श म्हणून परिसरातील 70 दुचाकी वाहकांना हेल्मेट वाटप करण्याचे आगळे, अभिनंदनीय व अनुकरणीय काम केले आहे. याप्रकरणी पुढाकार घेतला तो स्व. पूनम बनकर यांचे दीर हनुमंत बनकर यांनी हनुमंत बनकर हे स्वतः मुंबईमध्ये महामार्ग वाहतूक पोलीस विभागात काम करताना त्यांनी अनेक अपघात पाहिले व त्यात मोठ्या प्रमाणात युवा मोटारसायकलस्वारांना हेल्मेटविना झालेल्या जखमा व त्यांचे दुर्दैवी मृत्यू पाहिले. युवकांचे केवळ हेल्मेटविना होणारे नुकसान प्रत्यक्ष पाहणाऱ्या व अनुभवणाऱ्या हनुमंत बनकर यांनी आपण यासंदर्भात आपल्या स्तरावर काही प्रयत्न करावेत असे ठरवले होते.

या साऱ्या पार्श्‍वभूमीवर आपल्या वहिनींच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या तेरवी-श्राद्धप्रसंगी काहीतरी करावे असे प्रकर्षाने वाटले व त्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न म्हणून श्राद्धाच्या दिवशी करावगंज व परिसरातील मोटारसायकल चालविणाऱ्या युवकांना हेल्मेट वाटप करण्याचा निर्णय घेतला. आपला हा मुद्दा व मनोदय घरच्यांना समजावून सांगितला.

त्यानंतर त्यांनी श्राद्धविधी करणाऱ्या गुरुजींना सांगितले की, आपल्या दिवंगत नातेवाईकाच्या स्मरणार्थ गरजूंना भांडी-घरगुती वापराच्या वस्तू देण्याऐवजी युवकांना मोटारसायकल चालविताना उपयुक्‍त व सुरक्षित ठरणारे हेल्मेटचे वाटप का केले जाऊ नये? त्याने आपले समाधान, वापरण्याला उपयुक्‍त वस्तू देण्याबरोबरच आपल्या वहिनींना शांती लाभेल असे हनुमंत बनकर यांनी सविस्तर व प्रांजळपणे समजावून सांगितल्यावर गुरुजींनी या उपक्रमाला आपली मंजुरी व समर्थन दिले.

उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात हनुमंत बनकर यांना घरच्यांचे व गुरुजींचे पाठबळ मिळाले तरी गावकीतील इतर नातेवाईकांनी श्राद्धविधी परंपरेला फाटा देऊन मृतकाच्या स्मृतिप्रीत्यर्थ हेल्मेट वाटप करणे कितपत संयुक्‍तिक ठरेल अशा शंका उपस्थित करून त्याची चर्चा चावडीपासून गावकीपर्यंत होऊ लागली. मात्र मुंबईच्या वाहतूक पोलीस विभागात आपल्या 37 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले व त्यामुळे मोटारसायकल चालकांसाठी हेल्मेटच्या वापराचे महत्त्व गावकऱ्यांना पटले.

दरम्यान, 22 सदस्यीय बनकर कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाऱ्या आबासाहेब बनकर यांनी याला समर्थन दिले. याची अंमलबजावणी पूनम बनकर यांच्या तेरवीच्या दिवशी ग्रामीण गरजू युवकांना हेल्मेट वाटपाद्वारे करून एक आगळा-वेगळा आदर्श प्रस्थापित केला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)