लक्षवेधी : सीरिया पुन्हा उभं राहतंय

-नित्तेंन गोखले

उत्तर सीरियातील रक्‍का शहर ऑक्‍टोबर 2017 दरम्यान इस्लामिक स्टेटच्या (इसिस) तावडीतून मुक्‍त झाले. पण हे शहर आतंकवाद्यांविरोधात लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे खंडर बनले आहे. अशा परिस्थितीतसुद्धा वसना अहमद महामद सारखे शूर नागरिक स्वतःचे घर आणि शहराचे अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याची जिद्द बाळगून आहेत…

जिहादी सैन्याने मार्च 2013 मध्ये रक्‍काचा ताबा घेतला. विध्वंस सुरू होण्याआधी येथे जवळजवळ 240,000 रहिवासी होते. धक्‍कादायक बाब म्हणजे संयुक्‍त राष्ट्राकडे याभागात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची माहिती किंवा अचूक आकडेवारी उपलब्ध नाही.

गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत लाखोंच्या संख्येने लोकांनी सीरिया सोडून शरणार्थी म्हणून युरोपमध्ये प्रवेश केला. यात अनेकांचे जीवदेखील गेले. सर्वच नागरिक सीरिया सोडून पळाले असे एक चित्र जगभर पसरले. तथापि, हे चित्र चुकीचे होते. कारण इसिसला न घाबरता सीरियात राहून आतंकवाद्यांना तोडीस तोड उत्तर देणारे वसनासारखे लोकदेखील आहेत.
साधारणतः 2014 पासूनच आतंकवाद्यांनी रक्‍का शहरातील लोकांना “बशर अल-असद’ रेजिमचे गुंड जाहीर करून मारून टाकण्यास सुरुवात केली. अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले. लवकरच रक्‍का शहर दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला बनले. त्याच दरम्यान पतीच्या निधनामुळे स्वतःचे व मुलांचे पोट भरण्यासाठी वसना इसिसच्या धमक्‍या येत असूनही शहरात पतीचे दुकान चालवत राहिल्या.

दहशतवादी संघटनेच्या लोकांनी मला, मी स्त्री असल्यामुळे दुकान चालवू शकत नाही, असा इशारा दिला. मला मारहाण करण्यात आली. पतीच्या निधनानंतर मी दुसरे लग्न करावे यासाठी माझ्यावर अनेकांकडून दबाव आणण्यात आला व धार्मिक पोलिसांकडे नेऊन शिक्षा देण्याची धमकी देण्यात आली. आपले शहर आणि दुकान सोडून जिहादींना घाबरून मुलांसोबत दुसरीकडे निघून जाण्यापेक्षा डोक्‍यात गोळी लागून मृत्यू झाला तरी चालेल, अशी मानसिक तयारी मी ठेवली होती. स्त्रिया व लहान मुलांवर भयंकर अत्याचार होत होते. त्यांनी देशात गोंधळ आणि विनाश आणला, आम्हाला वाईट वागणूक दिली. आम्ही या क्रूर लोकांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दिवस-रात्र वाट पाहात होतो. आता या सर्वांतून मोकळे झाल्यावर नवीन युगाची सुरुवात झाल्यासारखे वाटत आहे, असे वसना अहमद महामद पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.

इसिसने अराजकता आणि विनाश पसरवला. याशिवाय, अमेरिका, रशिया, ब्रिटनने रक्‍का येथील दहशतवादी संघटनेच्या छावण्यांवर अनेक हवाई हल्ले केले. या सगळ्यामुळेच शहराच्या पायाभूत सुविधा उद्‌ध्वस्त झाल्या. दुर्दैवाने रक्‍का शहराच्या पुनर्बांधणीसाठी मदत करण्यास अमेरिका, ब्रिटन, किंवा युरोपीय समुदायातील इतर राष्ट्र उत्सुक नसल्याचे जाणवते.
युद्धादरम्यान सीरिया सोडून गेलेली कुटुंब हळूहळू परत येत आहेत. दुसऱ्या देशात निर्वासित बनून राहण्यापेक्षा स्वतःच्या अर्धवट पडलेल्या घरात राहणे त्यांना मानसिकरीत्या सुखाचे वाटू लागले आहे; परंतु नष्ट झालेले पूल, रस्ते, रुग्णालये, शाळा हे सर्व दुरुस्त होईपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वीसारखी होणार नाही याची सर्वांना कल्पना आहे.

शहराच्या विविध भागातून भूसुरुंग व स्फोटके शोधून ती निकामी करणे डोकेदुखी बनले आहे.कुर्दिश सैनिकांबरोबर फ्रेंच विदेशी सेना (फ्रेंच फोरेन लीजीओन) यांनी प्रशिक्षण दिलेले अनेक लोक स्फोटके शोधून ती निकामी करण्यात मदत करत आहेत. बंदुका चालवण्याबरोबर या लोकांना विस्फोटक हाताळणीचे देखील प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु युद्धादरम्यान कुर्दिश कमांडरांनी या परदेशी सैनिकांना युद्ध क्षेत्रापासून दूर ठेवले.

जगभरातून इसिस विरोधात लढायला सीरियात आलेल्या हजारो सैनिकांमधील “जेमी विलियम्स’ हा ऑस्ट्रेलियन तरुण कुर्दिश सैनिकांबरोबर शहरात मोर्टार, भूसुरूंग, तसेच विस्फोटक यंत्रे शोधून ती निकामी करण्यास मदत करतो.
शहर सोडण्यापूर्वी दहशतवाद्यांनी रस्त्यांवर, घरांमधील टीव्ही, फ्रिज, अगदी मुलांच्या खेळण्यातही लहान मोठ्या आकारांचे विस्फोटक व बॉम्ब लपविले आहेत.

दीड वर्षे उलटूनसुद्धा यामुळे रोज अनेक नागरिक तसेच सैनिकांचे मृत्यू होत आहेत, असे पत्रकारांशी संवाद साधताना विलियम्स म्हणाले. तालिबानने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तान सोडून ब्रिटनमध्ये नागरिकत्व स्वीकारून राहणाऱ्या मलाला युसूफझाई यांना सर्व जग ओळखते; परंतु चार वर्षे जीवाची पर्वा न करता आतंकवाद्यांविरोधात लढत रक्‍का शहरात राहणाऱ्या वसना अहमद महामद सारख्या स्त्रियांना कोणी ओळखत नाही व त्यांचे घरटे पुन्हा बांधण्यास मदतदेखील होताना दिसत नाही.

ए.बी.सी. नेटवर्क ऑस्ट्रेलियाच्या साहाय्याने जर्मनच्या “डी-डब्लू’ वाहिनीने रक्‍का शहराच्या सध्याच्या परिस्थितीवर “रुईन्स ऑफ रक्का’ नावाने बनविलेल्या डॉक्‍युमेंटरीच्या माध्यमातून वसना यांची कथा जगासमोर आणली. रक्‍का सिव्हिल कॉन्सिल (पुनर्निर्माण प्रकल्प टीम) व नागरिकांनी मिळून 2018 पासून अनेक अशक्‍य गोष्टी केल्या. खाद्य पदार्थ, पाणी, औषधे, वीजपुरवठा या व्यतिरिक्‍त काही भागात शाळादेखील सुरू झाल्या आहेत. येथील शाळा अमेरिकेतर्फे येणाऱ्या (अमेरिकन स्टॅबिलिझशन ऐड) आर्थिक साहाय्यातून चालवल्या जातात.

सध्या शहरातील लोक स्वतः अर्धवट पडलेल्या घरातील सिमेंटचा मलबा, काचेचे तुकडे साफ करताना दिसतात. मनात भावनात्मक व शरीरावर युद्धामुळे झालेल्या जखमा असलेली लहान मुलेदेखील साफसफाई करणाऱ्या पालकांना मदत करतात. युरोपबरोबरच ब्रिटन सध्या ब्रेक्‍झिट डील डोकेदुखीत अडकले असल्याने त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा देखील करणे अयोग्य ठरेल; परंतु जगातील सर्वात शक्‍तिशाली देशांनी मनावर घेतले तर पाच वर्षांत रक्‍का शहरातील मलबा हटवून, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा जागेवर येतील याचा सर्वांनीच विचार करायला हवा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.