कलंदर : मायाजाल…

-उत्तम पिंगळे

कालच प्राध्यापक विसरभोळे त्यांच्या मित्राशी त्यांच्या घरात बोलत होते. मी त्यावेळीच तेथे गेलो. मला पाहताच या… या… म्हणाले, पण त्यांचे बोलणे चालूच होते. प्राध्यापक त्यास समजावत होते, तुम्ही म्हणता तसा पक्ष विचारधारा, तत्त्वे असे काही राहिलेले नाही असे नाही. मात्र, आता सर्व पैसा व सत्ता यांच्या बाजूने झुकत चाललेले आहे. पैसा आला म्हणजे सत्ता येते आणि सत्ता आली म्हणजे पैसा येतो.

आता अलीकडचेच उदाहरण पाहा ना? उत्तर प्रदेशातील एका नेत्याने त्यांनी उभे केलेले पुतळे लोकप्रतिनिधीनी मंजूर केलेल्या बजेटमधूनच केले होते, असे कोर्टात सांगितले. जर दोनशे मीटरचा प्रभू रामचंद्राचा पुतळा सरकारी खर्चाने उभारला जाऊ शकतो तर मी केलेल्या कार्यासाठी माझा पुतळा का उभारला जाऊ नये? म्हणजे सत्ता, पैसा व एखाद्या गटाचा पाठिंबा असेल तर नेते स्वतःची तुलना परमेश्‍वराशी करू लागले आहेत.

वरील उदाहरण फक्‍त वानगी दाखल आहे; पण अलीकडे कित्येक उदाहरणे पाहता येतात की, सत्ता व पैसा यांची गुर्मी अनेक नेत्यांना आलेली आहे. अशा प्रकारचे नेते हे बहुतेक सर्वच पक्षांत आहेत. कित्येक नेत्यांची संपत्ती पूर्वीच्या तुलनेने कित्येक पटींनी वाढलेली आहे. उमेदवारी अर्जात कित्येक नेत्यांनी कोट्यवधींची अधिकृत मालमत्ता घोषणापत्राद्वारे जाहीर केलेली आहे. पण या सर्वांची पूर्वीची पार्श्‍वभूमी पाहता हे पैसे आले कसे? आपल्या देशात पूर्वी अनेक संस्थानिक होते; पण स्वातंत्र्यानंतर सर्व संस्थाने खालसा केली गेली. संस्थानांचे तनखेही नंतर पुढे रद्द केले गेले.

म्हणतात ना संस्थाने खालसा केली गेली; पण संस्थानिकांचा दबदबा मात्र तसाच राहिला. बहुतेक संस्थानिकांचे वारस कोणत्या ना कोणत्या पक्षाशी संबंधित राहून या ना त्या मार्गाने कायम सत्तेच्या आसपास असतात.सरकार कोणाचेही असले तरी संस्थानिकांचा दबदबा त्यावेळीही होता व आजही आहे. आता हे झाले सारे संस्थानिकांच्या बाबतीत. पण किती कार्यकर्ते जे पुढे समाजकारण करत राजकारणात गेले व सत्तेत पोहोचले. त्यांच्यामधील फार थोडे लोकं व त्यांचे वारस आहे. तसेच राहिले. पण इतरांनी मात्र अमाप संपत्ती जमा केली आहे.

ते इतके श्रीमंत झाले की त्यांना त्यामुळे पुढे सत्ता मिळत गेली. सत्ता मिळाली मग संपत्ती आली व संपत्ती आली म्हणून सत्ता मिळाली, हे रहाटगाडगं चालूच राहिले. अशा सत्ताधाऱ्यांना म्हणजे त्या विभागातील नेत्यांना आपल्याला कोणी जाब विचारू शकत नाही अशी दर्पोक्‍ती आलेली आहे. त्यांच्यापाशी सत्ता, पैसा, फौजफाटा वा अनेक साधने आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे नेते त्या विभागात स्वतःला सम्राट मानू लागले आहेत. पैसा आणि सत्ता यामुळे राजकारण काही मोजक्‍या लोकांच्या हाताकडेच गेलेले आहे. सामान्य माणूस यामध्ये शिरण्याचा विचारही करू शकत नाही.

अशा रीतीने बराच काळ सत्ता उपभोगल्यावर जो उर्मटपणा येतो तो बऱ्याच ठिकाणी दिसून येतो. कशालाच विचारायचे नाही. हम करे सो कायदा हे कित्येकांच्या रक्‍तात भिनून जाते. तुम्हाला ते गाणे माहीत आहे ना… ही दुनिया मायाजाल जाग जरा… सामान्य माणूस सत्ताधीशांच्या मायाजालाच्या खूप दूर उभारा नुसता पाहात आहे. तेच लढणार, तेच निवडणूक जिंकणार, तेच सरकार बनवणार, तेच कायदे करणार, तेच त्यांचे पगार वाढवून घेणार. आपण फक्‍त जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश ही बिरुदावली अभिमानाने मिरवणार…

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.