भारताचा सल्ला घेतल्यावाचून इराण कोठल्याही परराष्ट्राशी लष्करी करार करणार नाही
तेहरान, ता. 25 – अमेरिका, रशिया किंवा इतर कोणत्याही परकीय राष्ट्रांशी इराण लष्करी करार करणार नाही, असे इराणचे नवे प्रधानमंत्री ज. झहेदी यांनी येथे एका खास मुलाखतीत निवेदन केले.
मुसादिकने दिलेले वचन पाळण्याचे झहेदीचे आश्वासन ….
माजी प्रधान डॉ. मुसादिक यांनी लष्करी करार करण्यापूर्वी भारताशी सल्लामसलत करू हे दिलेले वचन आपण पाळू असे सांगून झहेदी म्हणाले, आमचे स्वातंत्र्य रक्षण करणे हे प्रथम महत्त्वाचे आहे.
कम्युनिस्ट विरोधाचा खुलासा….
देशात आमचे धोरण कम्युनिस्ट विरोधी असले तरी बाहेर दोस्ताशी संगनमत करून वागण्याचे आम्हास प्रयोजन नाही. येथे आम्ही कम्युनिस्टांचा कडवा प्रतिकार करू. परंतु डॉलरच्या गठ्ठ्यांनी किंवा सुवर्णपत्राच्या लालसेने आम्ही इराणची विक्री करणार नाही.
पारडी सत्याग्रही प्रश्नी चर्चा करण्यास तयार
मुंबई, ता. 25 – पारडीतील खेड सत्याग्रह विनाकारण पुढे चालू ठेवण्याची आमची इच्छा नाही आणि त्यादृष्टीने सरकारशी बोलणी करण्यास आम्ही तयार आहोत, असे प्रजासमाजवादी पक्षाचे अध्यक्ष आचार्य कृपलानी ह्यांनी आज येथे जाहीर केले.
मुख्यमंत्र्यांची इच्छा असेल तर भूदान आणि सत्याग्रह
ते म्हणाले, “”ह्या प्रश्नात एकमताचा भाग कोणता आहे ते शोधून काढण्यासाठी श्री. अशोक मेहता ह्यांचा मुख्यमंत्र्यांशी सतत पत्रव्यवहार चालू आहे आणि मुख्यमंत्र्यांची जर तशी इच्छा असली तर आजही ही चळवळ थांबविणे शक्य होईल.”
पारडी सत्याग्रह म्हणजे एक राजकीय खेळ आहे ह्या आरोपाचा इन्कार करून ही चळवळ राजकीय स्वरूपाची नसून आर्थिक स्वरूपाची आहे असे ते म्हणाले. पारडी सत्याग्रह अधिक जोराने चालविणे न चालविणे हे सत्याग्रह चालविणाऱ्यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. ह्या सर्व प्रश्नाबाबत एक चौकशी समिती नेमावी अशी सत्याग्रह चालविणाऱ्यांची मागणी आहे. ह्या मागणीस विनोबाजींनी पाठिंबा दिला आहे.