विज्ञानविश्‍व : सहली होतील परिपूर्ण

-डॉ. मेघश्री दळवी

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे सहल उद्योगाची भरभराट झालेली दिसते. या उद्योगात प्रवाससुविधा, हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, स्थलदर्शन अशा सेवांचा समावेश असतो. अर्थात या क्षेत्रात माणसांचा भरणा जास्त असतो, मात्र काही ठिकाणी त्यात रोबोट्‌सचा वापर व्हायला सुरुवात झाली आहे.

आता त्यात एआयचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स- कृत्रिम बुद्धिमत्ता) वापर व्हायला लागला आहे. सहसा मोठमोठी आकडेमोड वेगाने करण्यासाठी किंवा प्रचंड डेटा तत्परतेने हाताळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज भासते. आज सहल उद्योगात ही गरज भासायला लागली आहे आणि तिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर फार कल्पकतेने होतो आहे.

एखाद्या प्रसिद्ध शहराला भेट देताना तिथे काय काय पाहायचं याची यादी आपण आधी करून ठेवायचो. हल्ली आपण ते काम गूगल मॅप्स, ट्रीप ऍडवायझर अशा ऍप्सवर सोडलं आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे हे काम पूर्णपणे एआयवर सोपवणे. दिल्ली, न्यूयॉर्क, लंडन अशा मोठ्या शहरांमध्ये फिरताना हे बघू की ते बघू असं होतं. त्यात आपण गोंधळून जातो किंवा एखाद्या ठिकाणी उशिरा पोचतो. काही वेळा नीट ठरवून पोचावं तर ते स्थळ नेमकं बंद असतं.

आता त्याच्यावर उपाय आहे. प्रेक्षणीय स्थळं, त्यांची कामाची वेळ, तिथलं आधीच झालेलं बुकिंग, तिथली गर्दी, सुट्ट्या, हॉटेलच्या स्थानानुसार तिथे पोहोचायला लागणारा वेळ, कमीत कमी वेळात जास्तीत जास्त ठिकाणांना भेटी देता येईल का, ज्या व्यक्तींना फिरायचं आहे त्यांची आवड, उपलब्ध वेळ, शारीरिक तंदुरुस्ती, खर्चाचं बजेट वगैरे सर्व गोष्टींचा विचार करून अशा प्रेक्षणिय स्थळांना भेट देण्याची पूर्ण योजना एआय प्रणाली वापरून करता येते तीही झटपट.

यातला बराचसा डेटा सहज उपलब्ध असतो, तर व्यक्‍तीनुसार आवश्‍यक ती माहिती फक्त अशा प्रणालीला पुरवावी लागते. सगळ्या डेटाची नीट छाननी करून ट्रीपची परिपूर्ण आखणी करणं सोपं काम नाही. म्हणून तिथे पाहिजे एआय. युरोपमधल्या काही शहरांमध्ये अशा चाचण्या होत आहेत आणि ही सेवा लवकरच सर्वांना मिळू शकेल.

वेळ आणि शक्तीची प्रचंड बचत, शिवाय वैयक्तिक आवडीची घातलेली सांगड यामुळे ही सेवा अल्पावधीतच लोकप्रिय होईल यात शंका नाही. अशीच आणखी एक सेवा आहे ती प्रेक्षणीय स्थळांना भेट देताना त्यांची माहिती पुरवण्याची. बहुतेक वेळा त्यासाठी माहितीपुस्तिका किंवा ऑडिओ किट असतं. आता तिथे एआयच्या कॉम्प्युटर व्हिजन क्षमतेचा उत्तम वापर करून घेतला जात आहे. समजा तुम्ही पिसाचा मनोरा पाहायला गेला आहात.

हातातला स्मार्टफोन फक्त त्या मनोऱ्याच्या दिशेने रोखून एक फोटो खेचायचा, की त्याची पूर्ण माहिती आपल्याला समजेल, अशा सोप्या प्रकारे आपल्यासमोर माहिती सादर केली जाते. त्यात सगळा इतिहास असतो, जोडीने गंमतीशीर माहिती, आणि काही उपयुक्त सूचनादेखील असतात. फोटोवरून ठिकाण ओळखण्यासाठी त्यात एआयच्या कॉम्प्युटर व्हिजन तंत्रज्ञानाचा वापर होतो. तर माहिती मांडताना एआय व्यक्तीनुसार तिची रचना करतो. आहे ना कमाल? म्हणूनच उद्याच्या आपल्या सहली परिपूर्ण होणार आहेत- एआयच्या मदतीने.

Leave A Reply

Your email address will not be published.