भारताने राष्ट्रकुलाशी संबंध तोडू नये
अभ्यंकरनगर (नागपूर), ता. 10 – आशियाई आणि आफ्रिकन राष्ट्रांचा उत्तोरत्तर वाढत्या संख्येने समावेश होत असल्याने ब्रिटिश राष्ट्रकुलाचे स्वरूप पालटत चालले आहे. तेव्हा भारताने राष्ट्रकुलाशी असलेला दुवा तोडू नये, असे आवाहन संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी आज येथे बोलताना केले.
गृहमंत्री पं. पंतांनीही मेनन यांच्या प्रमाणेच राष्ट्रकुलाशी संबंध ठेवण्यावरच जोरदार भर दिला आहे. मेनन आज येथे कॉंग्रेसच्या विषयनियामक समितीत आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधी ठरावावर बोलत होते. ते म्हणाले, आशियाई-आफ्रिकी राष्ट्रांचे राष्ट्रकुटुंबात वर्चस्व प्रस्तापित होईल की काय हे मी सांगू शकत नाही; पण उपेक्षा न करण्याइतका प्रभाव पडेल अशी वेळ मात्र कधीना कधी आल्याशिवाय राहणार नाही.
विषयविषयक समितीपुढे आलेल्या आंतरराष्ट्रीय धोरणासंबंधी ठरावातील राष्ट्रकुलाचा उल्लेख गाळावा अशी काही वक्त्यांनी सूचना केली होती. त्यास उद्देशूनच मेनन यांनी वरील सूचना केली. पाकिस्तान व द. आफ्रिका या राष्ट्रकुलीन देशांची भारताबद्दल स्नेहाची वृत्ती नाही असा आक्षेप घेऊन ठरावातील राष्ट्रकुलाचा उल्लेख गाळण्याची सूचना करण्यात आली होती.
अकाली शीख गटांची दंगल शमविण्यासाठी अश्रुधूर
अमृतसर – अकाली नेते मास्टर तारासिंग व शिरोमणी गुरूद्वार प्रतिबंधक समितीचे नवे अध्यक्ष सरदार प्रेमसिंग लालपुरा यांच्या गटाचे लोकांत दंगल झाल्याने जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. येथून 15 मैलावर तरनतरन या तेहशिलच्या गावी काल हा प्रकार घडला.
या दंगली संबंधी अमृतसरचे सीनियर पोलीस सुपरिटेंडेंट रणजितसिंग माहिती सांगताना म्हणाले, पोलिसांनी बेबंद जमाव पांगविण्यासाठी अश्रुधुराचे वीस गोळे फोडले.
जर्मन शांतता तहासंबंधी परिषद
मॉस्को- जर्मन शांतता परिषद येत्या दोन महिन्यात घ्यावी अशी रशियाने आज पश्चिमी राष्ट्रांना सूचना केली असून, जर्मनीशी शांतता तह करण्यासंबंधीचा मसुदाही सादर करण्यात आला आहे, असे राजनैतिक गोटांतील वृत्त आहे.
मॉस्कोतील अमेरिकन वकील रिचर्ड डेव्हिस यांना रशियन परराष्ट्रमंत्री आंद्रे ग्रोमिको यांनी जर्मन शांतता तहाचा मसुदा सादर केला असून, बर्लिनसंबंधी नव्या वर्षाचे निमित्ताने पश्चिमी राष्ट्रांनी जे निवेदन काढले आहे त्यास रशियाचे 12 पानी उत्तरही या तहमसुद्यासोबत दिले आहे.