पुण्यातील देवीच्या साथीचा धोका कमी झाला
पुणे, ता. 15 – माहे 1 फेब्रुवारी 1960 पासून खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड बझार भागात देवीची साथ चालू होती. पुणे नगरपालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात सदर भागातून सुमारे 35चे वर रोगी दाखल करण्यात आले.
पुण्यातही खडकी भागातील जाऊन आलेल्यापैकी चार लागण झाल्या. आता देवीच्या साथीचा धोका कमी झाला आहे. आपल्या लहान मुलांना त्यांच्या वयाच्या तीन महिन्यांच्या आत व घरातील इतर मंडळींना गेल्या तीन वर्षांत देवी टोचल्या नसल्यास त्या टोचून घ्याव्या.
बार्शीत सायकलवर टोल बसला
बार्शी – येथील नगरपालिका सरकारच्या ताब्यात असताना सायकलीवर कर व नवीन टोल बसविण्याचे प्रकरण प्रशासक साहेबांनी सरकारकडे पाठविले होते. ते कर पुढील सालाकरीता मंजूर होऊन आले आहेत. सायकल टॅक्स पूर्वी 1 रुपया होता तो आता 2 रुपये झाला आहे. पूर्वी बाहेर ठिकाणाहून येणाऱ्या सायकलीवर टोल घेतला जात नव्हता तो याच्यापुढे घेतला जाणार आहे.
हिंगण्याच्या विद्यार्थिनींनी आग विझविली
पुणे – हिंगणे येथील महिलाश्रमात राहणाऱ्या विद्यार्थिनींनी आश्रमानजीक लागलेली आग विझवून बहुमोल कामगिरी केली आहे. आश्रमाजवळ राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या घराजवळ एक लहान मुलगा काड्याची पेटी घेऊन खेळत होता. त्याच्या हातून काडी ओढली जाऊन ही आग लागली.
यावेळी विद्यार्थिनी जेवण करीत होत्या. आगीची बातमी समजताच अर्धवट जेवण सोडून त्यांनी संस्थेच्या आवारातील तलावामधील पाणी बादल्यांनी उपसून आग विझवण्यास मदत केली. झोपडीस आग लागून शेतीची अवजारे जळून 200-300 रुपयांचे नुकसान झाले.