61 वर्षांपूर्वी प्रभात : सुशिक्षितांची बेकारी हा एकाचा नसून सर्व राष्ट्राचा तोटा होय

ता. 05, माहे मार्च, सन 1960

सुशिक्षितांची बेकारी हा एकाचा नसून सर्व राष्ट्राचा तोटा होय

पुणे, ता. 4 – “या देशातील सुशिक्षित तरूण जर बेकार राहू लागले तर तो त्यांचा केवळ व्यक्‍तिगत तोटा नसून, सर्व राष्ट्राचे त्यात नुकसान आहे,’ असे उद्‌गार आज पुणे विद्यापीठाचे कुलकुरू प्रा. द. गो. कर्वे यांनी काढले. केवळ आर्थिक विकासाची दृष्टी ठेवून नियोजन करणे युक्‍त ठरणार नाही. या नियोजनामध्ये तरुण पिढीचे शिक्षण, सराव आणि त्यांना नोकरीधंदा उपलब्ध होण्याची संधी याची काहीतरी तरतूद असावयास पाहिजेच. या देशातील सर्व मनुष्यबळाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेतल्याशिवाय उत्कर्षाचा टप्पा गठता येणार नाही.

चांगल्याप्रकारच्या नोकरीधंद्यासाठी विद्यार्थ्यांनी या देशाच्या कोठल्याही भागात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे सांगून कुलगुरू पुढे म्हणाले की, केवळ आपल्या गावी मिळते आहे म्हणून तो नोकरी-धंदा पत्करून समाधान मानण्याची वृत्ती चांगली नाही. जो नोकरीधंदा आपणाला करावयाचा आहे त्यात विद्यार्थ्याने परिपूर्ण होणे आणि आपली उपयुक्‍तता प्रत्यक्ष कृतीने सिद्ध करणे जरूरीचे आहे असा उपदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प. जर्मनीचे भारतास कर्ज वाटाघाटीची पहिली फैर यशस्वी

बॉन – पश्‍चिम जर्मनी भारतास 125 दशलक्ष मार्कस्‌चे (जर्मन नाणे) कर्ज देणार असून त्या संबंधीच्या वाटाघाटीची पहिली फैर यशस्वीपणे पार पडली असे प. जर्मनी सरकारच्या प्रवक्‍त्याने सांगितले. हे कर्ज कोणत्या तत्त्वाद्वारे द्यावे या संबंधी सर्वसामान्य रूपरेषा ठरली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात उभय सरकारचे प्रतिनिधी पुन्हा वाटाघाटी करणार असून, या संबंधीचा करारच त्यावेळी करण्यात येईल असेही प्रवक्‍त्याने सांगितले.

अफगाणिस्तानच्या तेल शोधार्थ रशिया भरपूर मदत देणार

गाझी – “अफगाणिस्तानला विविध प्रकारची आणि एकसारखी मदत रशिया देत राहील,’ असे रशियन पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, तुमच्या देशात पेट्रोल, गॅस आणि इतर खनिजे यांचा शोध घेण्यासाठी आम्ही मदत करू. आपल्या दोन देशाची 2500 किलोमीटर सरहद्दीवर शांतता व स्नेह नांदत आहेत. काबुलचे महापौर महमद सद्दाक यांनी सांगितले की, देशाच्या स्वातंत्र्यास रशियानेच सर्वात प्रथम मान्यता दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.