पी.एम.टी.ने खर्च कमी करून कार्यक्षमता वाढविली पाहिजे
पुणे, ता. 1 – “प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण केल्यापासून भाड्याच्या दरात वाढ करण्यात आलेली नाही. बसभाडे न वाढविता लोकांसाठी अधिक सुखसोयी करावयाच्या तर कार्यक्षमतेमध्ये वाढ करणे आणि काटकसर करणे अनिवार्य आहे. जो न्याय एस.टी.ला लागू आहे तोच पी.एम.टी.ला लागू आहे,’ असे उद्गार आज बॉम्बे स्टेट ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचे जनरल मॅनेजर एल. एस. लुल्ला यांनी पुणे म्युनिसिपल ट्रान्सपोर्टच्या दहाव्या वर्धापन दिनाच्या समारंभावेळी केलेल्या भाषणात म्हटले.
भूकंप धक्क्याने सबंध शहर उद्ध्वस्त
राबट – अटलांटिक किनाऱ्यावरील दक्षिण मोरोक्कोमधील आगाडीर नामक शहर भूकंपाच्या धक्क्याने संपूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. मनुष्यहानीही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. आगाडीर हे शहर साडेबारा हजार लोकवस्तीचे आहे.
माणसाच्या डोळ्यांना सर्व रंग कसे दिसतात?
बोस्टन – “यू. एस. व्हेटरन्स ऍडमिनिस्ट्रेशन हॉस्पिटल’चे डॉ. नॉर्मन गेश्विंड व डॉ. जॉन आर सेगल या दोन वैज्ञानिकांनी रंग दर्शनासंबंधी येथे एक अपूर्व प्रयोग केला. त्या प्रयोगातून त्यांनी असा निष्कर्ष काढला की, फक्त लाल व हिरवा या दोन रंगांच्या प्रकाशामुळे मानवी डोळ्यांना सर्व रंग दिसू शकतात. एका डोळ्यात लाल व एका डोळ्यात हिरवा रंग प्रवेश करतात आणि त्यामुळे सर्व रंगांचे दर्शन घडते. येथे प्रयोग करताना डॉ. गेश्विंड व डॉ. सेगल यांनी एकाच चित्राच्या दोन छायाचित्रांचा उपयोग केला. त्यापैकी एक छायाचित्र लाल रंगाचे व दुसरे हिरव्या रंगाचे होते.
लोकसभेत मांजर
नवी दिल्ली – आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या शेवटी आकस्मिकपणे एक पिंगट रंगाचे मांजर आले ते मधूनच जात असता त्याने सभासदांचे लक्ष वेधून घेतले. तेथील नोकरांनी त्याला हळूच बाहेर काढून लावले.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा