शिवनेरीवर महाराष्ट्र राज्याचा प्रारंभ
मुंबई, ता. 22 – मुंबईचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विनंतीस मान देऊन पंतप्रधान नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्घाटन करण्याचे कबूल केले आहे. समारंभ तारीख 30 एप्रिल रोजी रात्री मुंबईत होईल. नेहरू राष्ट्रकुल पंतप्रधानांच्या बैठकीस हजर राहण्यासाठी लंडनला जात असताना त्यांच्या मुंबईतील अल्पशा वास्तवात हा समारंभ घडवून आणण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या उद्घाटन समारंभाचा प्रारंभ शिवनेरी येथील एका कार्यक्रमाने होईल असे कळते. त्यावेळी तेथे श्रीशिवछत्रपतींचा पुतळा उभारला जाईल. या समारंभास मंत्री हजर राहून महाराष्ट्र व भारत निष्ठेची शपथ घेतील.
ब्रिटिश टॉमीचा पोशाख बदलणार
लंडन – ब्रिटिश टॉमी हा जगातला सर्वात उत्कृष्ट पोशाखातील सैनिक गणला जाईल. गेल्या शंभर वर्षांत करण्यात आले नाहीत एवढे पोशाख या पद्धतीमुळे रद्द करण्यात येणार आहे. निमुळत्या आणि ब्लाऊझ पद्धतीचा युद्धाचा पोशाख जाऊन त्या जागी अधिकारी लोक घालतात तसा खाकी सूट येईल.
राज्यपालांचे हुकुमास हरकत घेता येईल
मुंबई – कमांडर नानावटी यांची शिक्षा तहकूब करण्यासाठी राज्यपालांनी जो हुकूम काढला तो सनदशीर आहे की नाही हे ठरविण्यास घटना कलम 261 प्रमाणे हायकोर्टास प्रतिबंध करण्यात आलेला नाही असा मुद्दा आज वेस्टर्न इंडिया ऍडव्होकेट्स असोसिएशनचे वकील आर. बी. कोतवाल यांनी हायकोर्ट फुलबेंचपुढील सुनावणीचे वेळी मांडला. मुंबईच्या हायकोर्टाने नानावटीवर काढलेल्या वारंटाची अंमलबजावणी करावी असा सरकारला हुकूम द्यावा अशी विनंती करणारा ऍड. ए. जी. भिडे यांनी केलेला अर्ज दाखल करून घेण्यास फुलबेंचने नकार दिला. ऍडव्होकेट जनरलनी या अर्जास हरकत घेतली होती.
आधुनिक भारताचे शिल्पकार चरित्रमाला
नवी दिल्ली – आधुनिक भारताचे शिल्पकार या चरित्र मालेत 13 विख्यात भारतीयांची चरित्रे प्रसिद्ध करण्याचे भारत सरकारने ठरविले आहे असे माहिती व नभोवाणी खात्याचे मंत्री डॉ. बी. व्ही. केसकर यांनी लोकसभेत सांगितले. बंकिमचंद्र चटर्जी, रानडे, टिळक, टागोर वगैरे अशी नावे यात आहेत.