विविधा : कवी मायदेव

-माधव विद्वांस

स्मरणाआड गेलेल्या कवींमधे कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा. गो. मायदेव यांचे नाव घ्यावे लागेल. आज मायदेव यांचे पुण्यस्मरण. नवीन पिढीला त्यांची ओळखही नाही. त्यांचा जन्म 26 जुलै 1894 रोजी झाला तर निधन 30 मार्च 1969 रोजी मुंबई येथे झाले.

कवी मायदेव म्हटले की, त्यांची ‘गाई घरा आल्या’ ही सुंदर कविता आठवते. वर्ष 1929 मध्ये 90 वर्षांपूर्वी ही कविता त्यांनी लिहिली. पूर्वी गावाकडे गायराने असत त्याकाळी गुरे घेऊन तेथे गाईंना चारण्यासाठी नेले जाई. गाई परत निघाल्या की अचूकपणे आपल्या घरी येत असत. त्यांचा राखणकर्ताही त्यांच्या मागेच असे. पण गाई आल्या पण राखणकर्ता आपला मुलगा बरोबर नाही हे लक्षात आल्यावर त्याच्या आईची झालेली घालमेल या कवितेत मायदेवांनी वर्णिली आहे. तेव्हापासून वनमाळी असेही त्यांना ओळखले जाऊ लागले.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मायदेव यांनी केले होते. ते माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी होते. त्यांच्या कवितेचे विषय गंभीर विचारवृत्तीचे होते तसेच बालगोपालांसाठी त्यांनी खूप कविता लिहिल्या. मुलांमध्ये त्या काळी मायदेव यांच्या बालकविता प्रिय होत्या. कवी वनमाळी या टोपणनावानेही परिचित होते.

‘काव्यमकरंद’, ‘भावतरंग’, ‘भावनिर्झर’, ‘सुधा’, ‘भावविहार’ हे त्यांचे काव्यसंग्रह, तर ‘बालविहार’, ‘किलबिल’, ‘शिशुगीत’, ‘क्रीडागीत’ हे बालगीतसंग्रह प्रसिद्ध आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्री-शिक्षण संस्थेत हिंगणे येथे ते रुजू झाले. हिंगणे शिक्षण संस्थेचे ते आजीव सभासद होते. संस्थेसाठी त्यांनी अनेक देणग्या मिळवून दिल्या होत्या. त्यांचे बहुतांश आयुष्य पुण्यात गेले. निवृत्तीपर्यंत ते त्याच संस्थेत कार्यरत होते. संस्थेने त्यांना दोन खोल्या निवासासाठी दिल्या होत्या. त्यातच ते निवृत्तीपर्यंत राहिले. त्यानंतर डेक्कन जिमखान्यावर ते राहत होते. नंतर ते मुंबई येथे राहण्यास गेले.

मायदेव यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी आईवडिलांच्या पश्‍चात एक सावत्र भाऊ व चार सावत्र बहिणींचे शिक्षण व विवाह या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण होताच. मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांच्या आयुष्याची अखेर विपन्नावस्थेतच गेली. मुंबई येथे गिरगावात एका छोट्या खोलीत त्यांनी अखेरचे दिवस घालविले. ते एकटेच राहत होते आणि खानावळीत जेवत असत.

त्यांच्या कवितेतील काही ओळी…

गाई घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे?।।1।।
गाई घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्‍याम कोणीकडे । माझा गेला?।।2।।
गाई घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा?।।3।।
गाई घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का?।।4।।
गाई घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी।।5।।

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)