अग्रलेख : चमचमीत चेहरे फक्‍त

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने रोज नवे कलाकार राजकारणाच्या पटलावर एंट्री करताना दिसत आहेत. राजकारणात नव्याने उदय झालेल्या या ताऱ्यांच्या नावांत उर्मिला मातोंडकर या अभिनेत्रीचा समावेश झाला आहे. उर्मिलाने कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला असून आपला केवळ पक्षाचाच नव्हे, तर पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आदी थोर राष्ट्रपुरुषांचाही अभ्यास असल्याचे तिने पहिल्याच दिवशी केलेल्या वक्‍तव्यात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

जयाप्रदा या 70-80 च्या दशकात गाजलेल्या आणखी एक अभिनेत्री. मुलायम सिंह यादव यांच्या समाजवादी पक्षाचे अमरसिंह जेथे जयाप्रदा तेथे, असे गेल्या दीड दोन दशकांपासून आहे. हल्ली मुलायम सिंहच राजकीयदृष्ट्या व्हेंटीलेटरवर आहेत. तर अमरसिंह नक्‍की कोणत्या पक्षात आहेत याची कदाचित त्यांनाही कल्पना नसावी. हवेची दिशा जोखण्याचा त्यांचा प्रयत्न असावा आणि चाचपणी म्हणून त्यांनी जयाप्रदा यांना अगोदर भाजपच्या मंडपात पाठवले असावे, असे मानायला हरकत नाही. जयाप्रदा यांना भाजपने उमेदवारीही दिली आहे. अन्य मंडळींनाही यथावकाश मिळेल; नाही मिळाली तर त्यांचे काही इतर इंटरेस्ट असू शकतील. मात्र विषय आहे, तो सेलेब्रीटी मंडळींचा राजकारणात व संसदेत अथवा राज्यांच्या विधीमंडळांत प्रवेशाचा. या चमकत्या तारे-तारकांनी त्यांना जेथे जेथे चमकोगीरी करायला वाव आहे, तेथे तेथे हजेरी लावली आहे.

चित्रपटांच्या व्यतिरिक्त वर्ल्ड टूर, वाढदिवस, अथवा अन्य कारणास्तव आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम या ठिकाणी ते रंगमंचावर अवतरत असतात आणि त्याचे बक्‍कळ पैसेही घेतात. त्यामुळे बॉलीवूडचा किंगही एखाद्या लग्नाच्या वरातीत नाचताना दिसतो. आयपीएल नावाचा जो क्रिकेटमधला चमत्कारीक प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे, त्या प्रकारानेही स्टार मंडळींची चांगलीच सोय करून ठेवली आहे. कबड्डी आणि फुटबॉल या अन्य खेळांनीही त्यांना संघ विकत घेऊन मिरवण्याचे व पैसा कमावण्याचे ऑप्शन उपलब्ध करून दिले आहेत व जो तो आपल्या कुवतीप्रमाणे निवड करतो आहे. हा व्यक्तीगत आवडी निवडीचा भाग झाला. तेथे त्यांना पैसे देऊन बोलावणारे अथवा यांची अर्थात कलाकारांची स्वत:ची आर्थिक ताकद या बाबींवर त्यांनी कुठे जावे हे ठरत असते व त्याला कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. मात्र चमकोगीरीतून एखाद्या सेलेब्रीटीचा एकदम संसद अथवा विधीमंडळाचा प्रवास आणि तोही शॉर्टकटने व कोणतीही पूर्वतयारी नसताना जेव्हा सुरू होतो तेव्हा ते मतदारांवर लादले गेले असते.

पक्षाच्या नेत्यांच्या अथवा या तारकांच्या प्रेमात पडलेल्यांना बऱ्याचदा काही गोष्टी त्यावेळी स्वच्छपणे दिसत नाहीत. ज्यांना दिसतात त्यांचा आवाज संबंधितांपर्यंत पोहोचतच नाही. ज्यांचा आवाज पाहोचतो त्यांची दखल घेतली जात नाही. मात्र हा सगळा घटनाक्रम जेव्हा होत असतो तेव्हा भारावलेले आणि भाळलेले अशा दोन्ही वर्गातले लोक सेलेब्रीटी मंडळींना डोक्‍यावर बसवून नाचून मोकळे झाले असतात. आपले काय नुकसान झाले आहे, याचा विचार करण्याचीही वेळ निघून गेलेली असते. विषय केवळ उर्मिला अथवा जयाप्रदा यांचा नाही. शिवाय तो आजचाही नाही.

पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान असताना पृथ्वीराज कपूर यांच्याशी त्यांचे सख्य होते. किंबहुना राज्यसभेवर पाठवण्यात आलेले पृथ्वीराज हे चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेले पहिले कलावंत मानले जातात. त्यानंतर स्टार ते सुपरस्टार अशा सगळ्याच मंडळींचा राजकारणाशी अथवा राजकीय घराण्यांशी घरोबा राहिला आहे. अगदी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात साक्षात भानुरेखा गणेशन अर्थात रेखा यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. रेखा यांनी किती वेळा कामकाजाला हजेरी लावली आणि किती वेळा सभागृहात तोंड उघडले हे सर्वज्ञात आहे. केवळ त्यांची संसद परिसरात एंट्री व एक्‍झीट यातच माध्यमांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना स्वारस्य होते. त्यांच्या अगोदर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनाही राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. त्या काळात त्या संसदेत तर सोडाच, पण दिल्लीतही दिसल्या नाहीत.

प. बंगालच्या तृणमूल कॉंग्रेसने किमान डझनभर कलाकारांना आतापर्यंत संसदेत पाठवले आहे व यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही आणखी डझनभर मंडळींना उमेदवारी दिली गेली आहे. संसदेच्या सभागृहांत तज्ज्ञ म्हणून अथवा लोकांतून निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून जेव्हा एखादी व्यक्‍ती जाते तेव्हा ती “खास’ झालेली असते, त्याला कारण तिच्या निवड अथवा नियुक्तीशी जनसामान्यांच्या आकांक्षा-अपेक्षा जोडल्या गेल्या असतात. आपल्या क्षेत्रातील अनुभवाचा, ज्ञानाचा सरकारला व पर्यायाने देशालाही फायदा व्हावा याकरता त्यांनी मौलीक सूचना करणे अपेक्षित असते. तथापी, गेल्या साठ-सत्तर वर्षांचा अभ्यास केला तर या आघाडीवर अंधारच आहे. राजकारणी मंडळी त्यांचा जागा जिंकण्याचा तात्कालीक फायदा बघतात व संसदेत अकारण गर्दी करणारी अशी ही सेलेब्रीटींची डोकी गोळा केली जातात.

कला क्षेत्राशी संबंधित सगळीच मंडळी अशी नाहीत. त्याला दिवंगत सुनील दत्त, विनोद खन्ना तसेच जावेद अख्तर, शबाना आझमी, जया बच्चन असे अपवाद आहेत. आपण कोण आहोत व कशासाठी संसदेत आलो याचे भान ठेवून त्यांनी काम केले. मात्र अन्य बहुतेक नावांनी संसदेत गर्दी करण्यापलीकडे काही साध्य केले नाही. राजकारणात लोकांची कामे करत त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळेपर्यंत कार्यकर्त्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात. नेत्यांची मर्जी सांभाळावी लागते. सगळ्यांच्याच हातात अथवा खिशात ताकद नसते. बरेच नेते कष्ट आणि गुणवत्तेवरच पुढे आले आहेत व अशाच नेत्यांनी देशाच्या संबंधात, नागरिकांच्या भल्यासाठी चांगले निर्णयही घेतले. येथे यशस्वी होण्यासाठी लोकांमध्ये राहावे लागते, त्यांचे प्रश्‍न समजून घ्यावे लागतात आणि ते अभ्यासूपणे मांडावेही लागतात.

काळा चष्मा डोळ्यावर लावून मिरवणाऱ्यांचे ग्लॅमर किती फसवे असते, याची झळ बऱ्याच भागांतील मतदारांना बसली आहे. स्टार बनून अगोदरच आकाशात जाऊन पोहोचलेल्या आणि सर्वसामान्यांसाठी दुर्मिळ झालेल्या सेलेब्रीटींना हे झेपत नसल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळेच आपण आपला प्रतिनिधी निवडतो आहोत, त्याला संसदेत पाठवतो आहोत, ब्युटी कॉन्टेस्ट अथवा स्टेज शोसाठी नाही, एवढा जरी मतदारांनी विचार केला तर राजकीय पक्षांनाही विचार बदलावा लागेल. अन्यथा मागणी तसा पुरवठा होतच राहील.

Leave A Reply

Your email address will not be published.