जीवनगाणे : मी… तू… आपण…

-अरुण गोखले

मी वर्गातल्या मुलांना विचारले, तुमचा आवडता खेळ कोणता? तेव्हा एका पाठोपाठ एक अशा बऱ्याच बैठ्या आणि मैदानी खेळांची एक छानशी यादी सर्वांच्यासमोर आली. त्याचाच आधार घेत मग खेळाचे फायदे कोणकोणते या विषयावर मी मुलांमध्ये आणखीन एक चर्चा घडवून आणली.

या चर्चेच्या निमित्ताने खेळ का खेळायचे, त्याची गरज काय, फायदे काय? या सर्वांवर छान प्रकाश पडला. मुलांना आवडणाऱ्या खेळांवरून त्यांच्या मानसिकतेचाही अंदाज आला. या सर्व चर्चेत माझ्या विशेषत्वाने लक्षात राहिला तो राहुलने सांगितलेला त्याच्या आवडीचा खेळ…

इतर मुलांनी आपापल्या आवडीचे खेळ सांगितले. शेवटच्या बाकावरचा एक हात मधूनच वर खाली होत होता. माझ्या ते लक्षातही आलं होत. त्या सांग़ू का नको या दोलायमान अवस्थेत काहीतरी वेगळेपण लपलेलं आहे, हे ओळखून सर्वांचं सांगून झाल्यावर मी त्याला म्हणालो, “राहुल तुला काही तरी सांगायचं आहे, होय ना! मग खुशाल सांग.”
त्यावर तो म्हणाला, “सर मला ना मला रस्सीखेच हा खेळ आवडतो.”
“काय रस्सीखेच! कारे बाबा तुला हा खेळ का आवडतो?”

त्यावर राहुल म्हणाला, एकदा असेच झाले पीटीच्या सरांनी रस्सीखेच हा खेळ घेतला. त्यावेळी त्यांनी दोरीच्या एका टोकाला तीनचार मुलांना उभे केले. मी दुसऱ्या टोकाला उभा होतो. त्यांनी विचारले, “काय एकटा खेचणार का या सगळ्यांना?” मी “हो म्हणालो.”

पहिल्या दमात मी थोडाफार यशस्वी प्रयत्नही केला. पण नंतर माझ्या लक्षात येऊ लागले की मी एकटा अपुरा पटतोय. “देऊ का कोणी मदतीला?” सरांनी विचारले.

मग मी “तू ये….तू ये” असं म्हणत माझ्या बाजूला आणखी दोनतीन गडी गोळा केले. पलीकडच्यांनीही आपलं बळ वाढवलं. रस्सीखेच जोरात सुरू झाली. जसा का खेळ रंगात आला. तशी अधिक ओढाताण सुरू झाली. दोन्ही बाजूच्या खेळाडूच्या मनातील मी… तू… ही वेगळेपणाची भावना मागे पडायला लागली.

सारेजण एकजुटीने एकत्र येऊन नेटाने खेळू लागले आणि आमच्यातील एकतेने जेव्हा अधिक जोर लावला तेव्हा आम्हीच जिंकलो. राहुलचं उत्तर ऐकून मला एक समाधान झालं, ते मुलं खेळातून नुसता आनंद घेतात याच नाही तर ते काहीतरी उत्तम शिकतातही याचं.

Leave A Reply

Your email address will not be published.