दखल : नवा संदेश देणाऱ्या निवडणुका

-जयसिंग पाटील

निवडणुका हे पैसे मिळवण्याचे साधन आहे हा विचार अनेक घटकांमध्ये रुढ झाला आहे. लोकशाहीच्या या महाउत्सवात जेवढे म्हणून हात धुऊन घेता येतील तेवढे घ्यायचे या निर्धाराने तलवारींना धार चढवून हे घटक वेगाने कार्यरत होताहेत. दुसरीकडे राजकीय पक्षांचीही स्थिती संभ्रमाची आहे. भाजपामध्ये विजयाचा आत्मविश्‍वास टीपेला पोहोचला तर दुसरीकडे कॉंग्रेस नेतृत्व आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जाताना दिसत नाहीये. प्रादेशिक पक्षही एकजुटीने उभे राहताना दिसत नाहीत. थोडक्‍यात कोणतीही लाट नाही. बदलाची हवा नाही. कोणत्याही नेतृत्वाविषयी समाधान नाही अशा काहीशा दुभंगलेल्या मनाने मतदार निवडणुकीला सामोरे जातो आहे. त्यामुळेच या निवडणुकीचा निकाल नवा संदेश देणारा असेल.

निवडणुका म्हणजे आकड्यांचा आणि राजकारण म्हणजे सत्तातुरांचा खेळ भारतीय लोकशाहीचे वास्तव बनले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील नेतृत्वाला अपेक्षित असलेली लोकशाही ती हीच का, असा प्रश्न पडावा असे हे चित्र आहे. नेत्यांमुळे मतदार बिघडला की मतदारांमुळे नेते बिघडले हा प्रश्न तर कोंबडी आधी की अंडे यासारखा अनिर्णीत ठरू शकतो. सध्या लोकसभा निवडणुकांचा माहौल जोरात आहे. सन 1952 ते 2019. भारतीय लोकशाहीने निवडणुकांचा खूप मोठा पल्ला गाठला आहे. निवडणुका लोकशाहीच्या अविभाज्य भाग असतात.

लोकसभाच नव्हे, तर विधानसभा, जिल्हा परिषद, नगर किंवा ग्रामपंचायत अशा सतत कोणत्या ना कोणत्या निवडणुकीला जनता नेहमीच सामोरे जात असते. मतदान हे जनतेच्या आता सरावाचे झाले आहे. 1952 मध्ये पहिल्यांदा मतदानाचा अनुभव घेणारी पिढी जवळपास संपल्यात जमा आहे. आणीबाणीनंतरच्या 1977 च्या निवडणुकीत मतदानातून सत्ता परिवर्तन घडविणारी पिढीही आता कुटुंबात, समाजात केंद्रस्थानी राहिलेली नाही. तेव्हा जे युवा होते ते आता म्हातारे झाले आहेत. 1991 च्या निवडणुकीनंतर म्हणजे राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या काळात एकपक्षीय सत्तेचे दिवस संपले आणि प्रादेशिक पक्षाचे महत्त्व वाढून आघाडी सरकारचे राजकारण हे भारतीय लोकशाहीचे ठळक वैशिष्ट्य बनले.

नरसिंहराव यांच्या काळात दोन महत्त्वाच्या घटना घडल्या. पहिली होती खुल्या अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आणि दुसरी होती अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त होणे. या घटनांचा दीर्घकालीन प्रभाव राजकारणाबरोबरच सर्व क्षेत्रांवर पडल्याचे दिसते. प्रत्येक गोष्टीचे व्यापारीकरण, माणसाचे ग्राहकांमध्ये रूपांतरीत होणे ही खुल्या अर्थव्यवस्थेची अपरिहार्य अशी प्रक्रिया होती. ही प्रक्रिया निवडणुंकामध्येही दिसते. आता मतदारांचे रूपांतरही ग्राहकात झाले आहे. ही प्रक्रिया गेल्या 25 वर्षांच्या काळात अधिक वेगाने होत गेली. राजकारणाला उद्योगाचे स्वरूप येणे हा त्याचाच भाग आहे. आज पक्ष एखादी बहुराष्ट्रीय कंपनी चालवावी त्या पद्धतीने चालवला जातो. ही कला कॉंग्रेसपेक्षा भाजपने अधिक चतुराईने हस्तगत केली. हे ज्यांना जमले नाही ते राजकीय प्रवाहातून बाहेर फेकले गेले किंवा मागे पडले. डावे पक्ष हे त्याचे उदाहरण.

निवडणुका हा बहुमतांच्या आकड्यांचा खेळ बनल्याने त्यासाठी जे जे म्हणून उपयोगी ठरते त्याचा उपयोग पक्ष आणि नेते करताना दिसतात. कोणत्याही प्रकारची साधनसुचिता, मूल्यनिष्ठा याना अत्यंत नगण्य स्थान प्राप्त झाले आहे. राजकारण किती निचतम पातळीला गेले आहे याची तपासणी करण्यासाठी निवडणुकीचा काळ उत्तम असतो. त्यादृष्टीने त्याची असंख्य उदाहरणे आपण या काळात रोज पाहतो आहोत. पहिली गोष्ट म्हणजे मतदान हे पूर्वी समजले जायचे तसे पवित्र कर्तव्य राहिलेले नाही. निवडणूक कालावधीत लाभाचे असे काय काय मिळवता येईल याचा विचार आता पक्ष, नेते कार्यकर्तेच नव्हे तर मतदारही करू लागला आहे. पूर्वी गरीब, झोपडपट्टी भागात पैसे वाटून मते विकत घेतली जात होती. आता उच्चशिक्षित, कॉलनीत राहणारा मतदारही लाभाचे काही मिळत असेल तर नाकारत नाही. मतदारांची मानसिकता किती बदलली आहे, त्याचे हे निदर्शक म्हणावे लागेल.

ज्या दिवशी निवडणूक आयोगाने मतदानाच्या तारखा जाहीर केल्या, तेव्हा पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सहजपणे म्हणाले की, आता इलेक्‍शन फेस्टिव्हल सुरू होत आहे. म्हणजे निवडणुकीचे दिवस हे एखाद्या उत्सवासारखे असतात हेच त्यांनी सांगून टाकले आणि ते आजचे वास्तव आहे. कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट किंवा उत्सव साजरा करण्याची भारताला मोठी परंपराच आहे. धार्मिक, सण उत्सव यात्रा जत्रा याना इव्हेंटचे स्वरूप आले आहे. तसे निवडणूक प्रक्रियेलाही आले आहे. आता एकदा उत्सव म्हटले की त्यात हौसे, नवसे, दुकानदार, व्यापारी यांची काही लाभाची गणिते असणे साहजिकच असते. तसे निवडणुकांचेही झाले आहे. लोकशाहीच्या या महाउत्सवात जेवढे म्हणून हात धुवून घेता येतील तेवढे घ्यायचे या निर्धाराने तलवारींना धार चढवून हे घटक वेगाने कार्यरत होतात.

काळाच्या ओघात निवडणूक प्रचार यंत्रणेचे स्वरूप झपाट्याने बदलले आहे. प्रतिमाहनन, प्रतिमासंवर्धन याला अतोनात महत्त्व आले असून समाजमाध्यमातून खोटेसुद्धा रेटून खऱे असल्यासारखे पसरवले जाते. नेत्यांवर विश्वास ठेऊन रात्रंदिवस राबणारे निष्ठावंत कार्यकर्ते कमी झाले आहेत. म्हणजे तशी त्यांची गरजच उरलेली नाही. कार्यकर्त्यांसाठी प्रचार हे रोजगाराचे साधन बनले आहे. प्रचारसभा, प्रचार फेरी यासाठी लोक पुरविणारे दलाल गावोगावी तयार झाले आहेत. पक्षाच्या दृष्टीने उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता विचार घेताना त्याचे चारित्र्य, कार्य अशा गोष्टी गौण बनल्या आहेत. त्यापेक्षा उमेदवाराची आर्थिक क्षमता महत्त्वाची मानली जाते.

सगळीच गणिते अर्थकारणाशी निगडित असल्याने दोन नंबरवाले, गुंड, ज्यांना सत्तेच्या माध्यमातून आपले चारित्र्य उजळून घ्यायचे आहे, असे लोक निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले आहेत. हे सर्व निवडणुकांतील मतदानाचे गांभीर्य हरवून टाकणारे असले तरी वास्तव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.