बांगलादेश भारताला वृत्तपत्रीय कागद देणार
कलकत्ता, दि. 7 – आम्ही भारताला आमचे जवळील जादा वृत्तपत्रीय कागद देण्यास तयार आहोत, असे बांगलादेशचे उद्योग खात्याचे चिटणीस गुलाम मुस्ताफा यांनी येथे सांगितले. मासे व ताग याखेरीज बांगलादेश भारताकडे काही औद्योगिक उत्पादनांच्या वस्तू, तांब्याच्या तारा, रेयॉन इत्यादी वस्तूही पाठविण्यास तयार आहे, असेही त्यांनी सांगितले.
तुरूंग की महाल?
न्यूयॉर्क – येथे 1.5 कोटी डॉलर्स खर्चून एक अलिशान तुरूंग बांधण्यात आला आहे. तो वातानुकूलित आहे. त्यात दूरचित्रवाणीची सोय आहे. ज्यांना कमी मुदतीच्या शिक्षा झाल्या आहेत अशा कैद्यांना येथे ठेवले जाईल.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी दुर्गा भागवत-शंकरराव खरात
पुणे – कऱ्हाडच्या आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी म. सा. परिषदेने दुर्गा भागवत व शंकरराव खरात यांची नावे मराठी साहित्य महामंडळाकडे सुचविली आहेत.
कृष्णा खोऱ्यात हिरे
मुंबई – कृष्णा खोरे व मध्य प्रदेशातील पन्ना भागात ज्यापासून हिरे मिळू शकतील असे खडक सापडल्याने भारतास पूर्वीचे वैभव प्राप्त होईल, असे उद्गार एस. एन. सेन यांनी काढले. आंध्र प्रदेशातील चेलिमा भागात चाललेल्या संशोधनाबद्दल मोठं औत्सुक्य निर्माण झाले आहे.