गाडगीळ तत्त्व कालबाह्य झाले नियोजन मंडळाचे मत
नवी दिल्ली, दि. 20 – राज्यांना पाटबंधारे प्रकल्पासाठी मंजूर करावयाच्या साधनसंपत्तीबाबत “गाडगीळ तत्त्व’ आता कालबाह्य झाले आहे, असे नियोजन मंडळाचे मत असून याबाबतीत नवे धोरण अंमलात आणण्याचे मंडळाने ठरविले आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय अर्थकारणातील किती वाटा ते उचलू शकेल याचा अंदाज घेऊन साधनसंपत्तीचे वाटप करावयाचे, असे नवे धोरण नियोजन मंडळाचे आहे.
नव्या फिल्म सेन्सॉर बोर्डाची स्थापना होणार
नवी दिल्ली – चित्रपट नियंत्रण करणारे नवे सेन्सॉर बोर्ड लवकरच स्थापन होणार आहे. हे सेन्सॉर बोर्ड नियमाची काटेकोर अंमलबजावणी करील. अश्लीलता, अत्याचार, लैंगिक विषय हाताळणाऱ्या चित्रपटांना परवानगी मिळणार नाही. प्रत्येक चित्रपट निर्मात्याने आपल्या चित्रपटांची एक प्रत एक वर्षभर सेन्सॉर बोर्डाकडे ठेवावी लागेल आणि चित्रपटप्रदर्शनाचे वेळी जे भाग बोर्डाने कापले त्याचे दाखले शोकेसमध्ये लावून ठेवावे लागतील. हे नवे नियम त्वरित अमलात येतील.