दक्षिण कोरियाच्या लष्कराला सज्जतेचा आदेश
सेऊल, दि. 12 – दक्षिण कोरियाने आपल्या सेनेला सज्ज राहण्याचा आदेश दिला आहे. पिवळ्या समुद्रातील दक्षिण कोरियाच्या हद्दीतून उत्तर कोरियन बोटीला हुसकून दिल्यानंतर हा आदेश देण्यात आला. लष्कराला सज्जतेचा आदेश का देण्यात आला आहे त्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही. पण दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले की, उत्तर कोरियाच्या पाच बोटी दक्षिण कोरियाच्या बंदराजवळ आलेल्या दिसल्या होत्या. आमच्या दृष्टीत पुन्हा आल्यास उत्तर कोरियाच्या बोटी बुडविल्या जातील.
ईडी अमीनचे चित्र छापलेले शर्ट वापराचा हुकूम
नैरोबी – युगांडाची राजधानी कंपाला येथे आफ्रिकन राष्ट्र शिखर परिषदेच्या वेळी नागरिकांनी अध्यक्ष ईडी अमीन यांचे चित्र असलेले शर्ट घालून हिंडले पाहिजे, असा हुकूम युगांडा सरकारने काढला आहे.
चित्रपट तपासणीच्या जाचक नियमांविरूद्ध तीव्र प्रतिक्रिया
मद्रास – तामीळनाडूत नवे चित्रपट नियंत्रण नियम लागू केले आहे. त्या विरूद्ध दक्षिणेतील चित्रपट निर्मात्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या नव्या नियमानुसार चित्रपट तपासणीची फी 500 रुपयांवरून 3500 रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.