दूरदर्शनवर क्रिकेट
नवी दिल्ली, दि. 30 – मुंबई व मद्रास येथे भारत व न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या कसोटी सामन्यांची दृश्ये दूरचित्रवाणीवर पाहावयास मिळतील. सामना चालू असतानाच तो दूरदर्शनवर प्रसारित केला जाईल. न्यूझीलंडचा संघ मुंबई, मद्रास व कानपूर येथे कसोटी सामने खेळणार आहे. अधिकाधिक लोकांना सामना दूरदर्शनवर पाहता यावा म्हणून सार्वजनिक सेट्स बसविण्यात येणार आहेत. सामन्यांची दृश्ये इतर केंद्रावरूनही प्रसारित होतील.
विरोधी पक्ष दबले गेले नाही
नवी दिल्ली – विरोधी पक्ष आणीबाणीनंतर दबले गेले नाहीत. जे लोक सतत लोकशाही राज्यवस्थेच्या विरूद्ध आहे व सतत घातपातात मग्न असतात त्यांना नेस्तनाबूद करायचे आहे, असे पंतप्रधान इंदिरा गांधी म्हणाल्या.
कचऱ्याचा पुनर्वापर
नवी दिल्ली – कचऱ्याचा योग्य रितीने वापर केल्यास राष्ट्रीय मालमत्तेचा वापर कमी प्रमाणात होईल आणि उत्पादन खर्चाच्या प्रमाणात कपात होईल. वातावरण प्रदूषणालाही यामुळे बऱ्याच प्रमाणात आळा बसेल. शेती क्षेत्रात तसेच मत्स्यपालन, पशुसंवर्धन इत्यादी क्षेत्रातही अनेक प्रकारचा माल वाया जातो त्याचा सदुपयोग करता येईल. देशातील बऱ्याचशा प्रयोगशाळांत कचऱ्याचा पुनर्वापर करण्यासंबंधी प्रयोग चालू आहेत.
विद्यार्थ्यांना स्वस्तात जेवण देण्याची सूचना
नवी दिल्ली – विद्यार्थी वसतिगृहांतील भोजनालयांचे दर खाली आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना केली आहे.