पुस्तक परिक्षण : एक शहर मेले त्याची गोष्ट

-माधुरी तळवलकर

या कथासंग्रहात एकूण अकरा कथा आहेत आणि त्यापैकी आठ कथा अनुवादित आहेत. यातल्या सर्व कथा वेगवेगळ्या लेखकांच्या असल्यामुळे विषय, शैली, मांडणी यात भरपूर वैविध्य आहे.

“एक शहर मेले त्याची गोष्ट’ या कथेची सुरुवात लेखिका अशी करते, “सोळाव्या शतकाने डोळे उघडून आळोखे-पिळोखे दिले आणि… ‘ पुढं आपल्याला वर्णन दिसतं की, वस्तीच्या पूर्वेकडे घनदाट जंगल होतं. बहुतांशी औषधी हिरड्याची झाडं, पण इतरही चिकार जाती होत्या. हळूहळू सतरावं, विसावं, एकविसावं शतक उजाडतं. जंगलाजवळ असलेल्या चंदरपूरमध्ये आता फक्‍त सिमेंटच्या बहुमजली इमारती राहिलेल्या असतात. कथेचा शेवट मात्र आशावादी आहे. कालांतरानं या औषधी झाडांचं, जैवविविधतेचं, दुर्मीळ वनस्पतींचं महत्त्व लोकांना पटतं आणि काही तरुण ही जंगलाची जागा शोधून काढतात. तिथं नव्यानं झाडं लावतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बाबरी मशीद पाडली गेल्यावर दंगली झाल्या. हरिभाऊ आणि मुनीम हे वयस्क झालेले जिवलग दोस्त याच काळात द्वारका, वृंदावनला जायला निघतात. अरूप रूप या कथेतील रेल्वेतील प्रवास, मुक्‍कामी पोचल्यावर हरिभाऊंनी देवाचं दर्शन घेणं आणि बाहेर आल्यावर त्या आनंदात मुनीमला सहभागी करून घेणं… सगळं वाचताना वाचक गलबलून जातो. जाणवतं की, धर्माच्या, राजकारणाच्या भिंती कितीही उंच असल्या तरी माणसामाणसातलं जिव्हाळ्याचं नातंच शेवटी खरं!

याच विषयावर “तो काळा शुक्रवार’ नावाची कथा आहे. यात बॉम्बस्फोट घडवून निष्पाप माणसांचे प्राण घेणारी क्रूर माणसं आहेत, तशीच रक्तदानासाठी रांगा लावणारीही माणसं आहेत. या दोन्ही कथांमध्ये दंगली, हत्या अशासारख्या भीषण घटना असूनही या कथा बटबटीत वाटत नाहीत. अत्याचारांचं, हिंस्रतेचं अंगावर येणारं वर्णन यात नाही आणि तरीही यातली शोकात्मता मनाला भिडते, दु:खी करते; हे या कथांचं यश.

संस्कृती प्रकाशनच्या या पुस्तकात स्त्री आणि पुरुष यांमधली कुटुंबातली असमानता इंडिया गेट या कथेत तीव्रतेनं दाखवून दिली आहे. अगदी साध्यासाध्या गोष्टीतसुद्धा कुटुंबातील पुरुषाला उगाचच मानाचं स्थान देणं आणि स्त्रीला क:पदार्थ लेखणं हे अजूनही कितीतरी कुटुंबात दिसून येतं. पण यातली पद्मिनी नुसती घुसमटत राहात नाही. ती त्यातून मार्ग काढते.

एका गावाचे महत्त्वाकांक्षी प्रमुख चौधरी (म्हणजे अमेरिका), त्यांच्या कावेबाजपणाला बळी पडणारे व्यापारी (तेल असलेले देश) आणि त्यांना न जुमानणारा अरबी घोडा (सद्दाम हुसेन) अशी पात्रांची योजना करून शौक नावाची प्रतिकात्मक कथा अवधेश प्रीत यांची आहे.

कथेचा शेवट असा आहे, “…मुखियाने सर्वांना समजावले, घोडा पागल झाला की त्याला गोळी घालावीच लागते. थक्‍क होऊन हे तत्त्वज्ञान ऐकलं आणि अरबी घोडा पागल झाला होता हे कबूल केलं. या कथेतला उपरोध खूप काही सांगून जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)