प्रेरणा : शेतकऱ्यांसाठी तयार केली मशीन

-दत्तात्रय आंबुलकर

वडिलांचे वय झालेले नि घरी शेतीची कामे भरपूर, शेतीतील जनावरांची स्वच्छता पण तितकीच महत्त्वाची. वडील ही सारी कामे किती आणि कशाप्रकारे करणार. त्यातच आजच्या काळात पूर्वीप्रमाणे अशा कामासाठी सालकरी मिळणे कठीण. या साऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नुकत्याच अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या शेतकरी पुत्राने संशोधन केले आणि यावर एक प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शेण उचलणाऱ्या मशीनची निर्मिती करून आपल्या आई-वडिलांसह अनेकानेक शेतकऱ्यांचे भविष्यातील परिश्रम वाचविण्याचे काम केले आहे.

अमरावती येथील प्रा. राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल शाखेतून प्रज्वल चव्हाण या विद्यार्थ्याने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. परंतु, शिक्षण सुरू असतानाच व घरचा मुख्य धंदा शेती असल्याने आपल्या वडिलांचे शेण उचलण्याची होणारी रोजची परवड पाहणाऱ्या प्रज्वलने आपणच शेण उचलण्याची मशीन बनवावी असा निर्धार करून त्या दृष्टीने कल्पकपणे प्रयत्न आणि प्रयोग करण्यास सुरुवात केली.

आपल्या प्रयत्नांपोटी प्रज्वलने सातत्याने अभ्यास व संशोधन केले. त्यादरम्यान प्रज्वलला अपघात झाला. मात्र अपघात व त्यानंतरच्या परिस्थितीला न घाबरता व त्यामुळे निराश न होता त्याने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. या प्रयत्नातून शेण उचलणाऱ्या आगळ्या मशीनची निर्मिती केली. प्रज्वलने तयार केलेली मशीन ही ई-बाइकप्रमाणे मोटरवर आधारित असून एका सेकंदात गोठ्यातील गाई-म्हशीचे शेण सहजगत्या व स्वच्छपणे उचलू शकते. या मशीनमुळे गोठ्यातील शेण उचलण्याची मानवी श्रम आणि हाताची आवश्‍यकता पडणार नसल्याने आता शेण उचलणे अगदी सुलभ झाले असून या सेमी-ऍटोमॅटिक शेण उचलण्याच्या मशीनचे फक्‍त बटण दाबण्यानेच शेण गोळा करण्याचे काम होत आहे.

याला स्टार्टअप इंडियाची मान्यता लाभली असून, केवळ 24 व्या वर्षी मराठमोळ्या व ग्रामीण भागातून आलेल्या या मशीन बनविणाऱ्या विद्यार्थ्याचे सर्वदूर कौतुक होणे स्वाभाविक आहे. सुरुवातीच्या यशस्वी प्रयोगानंतर सध्या प्रज्वलच्या या मशीनची विविध ठिकाणी चाचणी-पडताळणी घेण्यात येत आहे. त्यामुळे विविध ठिकाणी या मशीनला वाढती मागणी आणि प्रतिसाद लाभतो आहे. यामुळे उत्साहित झालेल्या प्रज्वलने आपल्या प्रयोगासाठी पेटंट निवेदन दाखल केले असून याशिवाय पुण्यातील एका नामवंत कंपनीच्या तांत्रिक-व्यावसायिक सहकार्याने मशीनचे उत्पादन सुरू करण्याचा पण त्याचा मनोदय आहे.

या यशस्वी मशिनरी-प्रयोगाचे निर्माण प्रज्वल चव्हाण यांच्या मते त्यांची मशीन अत्यंत अल्प खर्चात उपलब्ध असण्याने त्यामुळे ही मशीन गरीब व सर्वसामान्य शेतकरी, दुग्धव्यावसायिक, गोशाळा, प्राणी संग्रहालय इ. विविध ठिकाणी नजिकच्या भविष्यात उपयुक्‍त सिद्ध होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×