अबाऊट टर्न : उभी फूट

-हिमांशू

“उभी फूट’ हा शब्दप्रयोग आम्हाला नेहमीच बुचकळ्यात टाकणारा ठरलाय. फूट “आडवी’ का नसते? शाळेत असताना जीवशास्त्राच्या प्रयोगात “उभा छेद’ घ्यायला लावायचे, तेव्हासुद्धा आम्हाला “आडवा छेद का नाही,’ असा प्रश्‍न पडायचा. राजकीय पक्षांमध्ये उभी फूट पडतेच; पण क्रिकेटच्या टीममधली फूटसुद्धा “उभी’ का म्हणायची? वस्तुतः राजकीय पक्षात उभी फूट पडली तर पक्ष “आडवा’ होण्याची शक्‍यता अधिक असते आणि क्रिकेटची टीम मैदानावर “आडवी’ झाल्यानंतर उभी फूट दिसून येते. मग हे उभं-आडवं, डावं-उजवं ठरवलं कुणी, हे एकदा भाषातज्ज्ञांकडून जाणून घेतलं पाहिजे.

निवडणुकीला “उभं’ राहू दिलं नाही म्हणून नाराज नेते पक्षात फूट पाडतात, म्हणून तिला “उभी फूट’ म्हणत असावेत, असं मध्यंतरी वाटायचं. पण नंतर लक्षात आलं की पक्षाचं तिकीट मिळवून निवडून आलेले सात-आठ नेते एखाद्या हॉटेलात एकत्र राहिले, तरी पडणारी फूट उभीच असते. फक्‍त सरकार “आडवं’ होतं. असो, काही शब्दांचे नेमके अर्थ “उभी’ हयात गेली तरी समजायचे नाहीत.

मुद्दा असा की, राज्यातली विधानसभा निवडणूक जवळ येतीय. सत्ताधारी पक्षात इनकमिंग फ्री झालंय. त्यामुळं बहुतांश विरोधी पक्षांना उभ्या फुटीच्या शक्‍यतेनं धडकी भरलीय. सोशल मीडियावर उभ्या फुटीचा ठराविक हंगाम नसतो. ती बारमाही असते. निवडणूक जवळ येईल, तसतशी ती गडद होते, इतकंच!

अनेकांच्या दृष्टीनं उभी फूट हा मनोरंजनाचा भाग असला, तरी मनोरंजनाच्या क्षेत्रातसुद्धा उभी फूट पडते, तेव्हा मनोरंजन कशाला म्हणायचं हा प्रश्‍न पडतो. 600 कलावंत विरुद्ध 900 कलावंत आणि 49 कलावंत विरुद्ध 61 कलावंत अशी ही फूट अलीकडच्या काळात दोनदा दिसून आलीय.

पूर्वी कलात्मक चित्रपटांचा स्वतंत्र विभाग होता. चित्रपट रंगीत आहे की ब्लॅक-व्हाइट हे समजेपर्यंत इंटरव्हल व्हायचा. दुसरीकडे, मुख्य प्रवाहातले चित्रपट इतके मसालेदार, की त्यातली माणसं चंद्रावर राहणारी असावीत, असं वाटायचं. कलात्मक विभागातले कलावंत मुख्य प्रवाहाला आणि मुख्य प्रवाहातले कलावंत कलात्मक प्रवाहाला नेहमी दूषणं द्यायचे.

कालांतरानं कलात्मक प्रवाहातले काही कलावंत मुख्य प्रवाहात गेले आणि काहीजण व्यासपीठावर गेले. इंडस्ट्रीचा अवघा रंग एक झाला! पण कलावंत राजकारणात जाऊ लागले आणि राजकारणी कलावंत झाले, तेव्हा अवघा बेरंग झाला! कालांतरानं “कलावंताचं सामाजिक भान’ हा विषय “डिस्कस’ला जाऊ लागला आणि इंडस्ट्रीतली “उभी फूट’ पुन्हा दिसू लागली. सामाजिक भान सांगणाऱ्यांना “तेव्हा कुठे होता?’ असं विचारलं जाऊ लागलं. वास्तविक, असं विचारणाऱ्यांपैकी अनेकजण “तेव्हा’ नव्हतेच; पण आता अचानक आले. राजकारणातला “नंबर गेम’ इंडस्ट्रीत आला. आमच्यासारखे प्रेक्षक बुचकळ्यात!

आम्हाला आवडणारे प्रतिभावंत दोन्ही गटांमध्ये आहेत. आम्हाला त्यांचं लेखन आवडतं, दिग्दर्शन, अभिनय आवडतो. काहींचे विचारही आवडतात. त्यांना सामाजिक बांधिलकी असू नये का? जरूर असावी; मात्र ती “निवडक’ नसावी, हे निश्‍चितच पटण्याजोगं आहे. दुसरीकडे, अपप्रवृत्तीविरुद्ध बोलणाऱ्याला गप्प करणं हे अपप्रवृत्तींना बळ देणारं ठरत नाही का, हाही प्रश्‍न रास्त वाटतो. विचारांचं आणि प्रश्‍नांचं काहूर आमच्याशी “उभा’ दावा मांडतं. फूट “उभी’च का असते, हे तेव्हा कळतं!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)