जीवनगाणे : जगा आणि जगू द्या

-अरुण गोखले

आपल्या वाट्याला आलेलं जीवन हे आपण कसं जगायचं? किंवा खऱ्या अर्थाने ते कसे जगायला हवे हे सांगणारा, शिकवणारा हा पू. नरेंद्र महाराज यांचा संदेश. हा संदेश जरी छोटासा असला तरी त्या मागचा अर्थ मात्र फार मोठा आहे. त्यातला प्रत्येक शब्द मोलाचा असून तो तुम्हा आम्हाला जीवनदर्शक आहे.

प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय? हा सर्व सामान्य जीवांना पडणारा प्रश्‍न. त्याचं साधं सोपं असं उत्तर म्हणजे केवळ स्वत:च्या स्वार्थाचा विचार म्हणजे प्रपंच आणि स्वत: बरोबरच इतरांच्या कल्याणाचा विचार म्हणजेच परमार्थ.
आपल्याला तर प्रपंचही करायचाच आहे आणि परमार्थही साधायचा आहे. या दोन्ही गोष्टी कशा आणि कोणत्या खुबीने साधायच्या हेच शिकवणारा हा संदेश.

महाराज इथे असे मार्गदर्शन करतात की, तुम्ही स्वत: जगा म्हणजेच तुम्ही आणि तुमचे कुटुंबीयांच्यासाठी जे जे करायला हवे, जोडायला हवे ते जोडा. पण हे करताना तुम्ही समाजाचे सभोवतालच्या विश्‍वाचे एक घटक आहात हे मात्र विसरू नका. स्वत: सुखा समाधानात जगत असताना, तसा प्रयत्न करीत असताना भोवतालच्या जगाकडे डोळेझाक करू नका.

त्यांनाही आपल्या प्रमाणेच जगू द्यायचं, जगवायचं म्हणजे आपल्या बरोबरच इतरांनी जगण्याचा हक्‍क आहे. त्यांनाही आपल्याप्रमाणेच सुख मिळायला हवे. त्यांचाही आदर सन्मान राखायला हवा. त्यांनाही आपण आपल्या परीने चार प्रेमाचे घास भरवायला हवेत. माणसांबरोबरच सभोवतालचा निसर्ग, झाडे, वेली यांना माती, खत, पाणी घालून त्यांची काळजी घेऊन त्यांना वाढवायला हवे. मुके प्राणी, पक्षी यांचीही तहान भूक ओळखायला हवी.

भूतदया, प्राणीप्रेम, मानवता आणि अतिथीधर्म ह्यांचे पालन करीत सर्वांच्याच कल्याणासाठी, उत्कर्षासाठी त्या ईश्‍वराकडे कृपेचे वरदान मागायला हवे. “स्व’च्या केंद्रीभूत संकल्पनेची व्याप्ती वाढवीत मी… तू… तुम्ही… आपण आणि हे सारे विश्‍व इतकी ती व्यापक करत न्यायची. माझ्या बरोबरच मी इतरांचाही विचार करायचा. त्यांना सहकार्य करायचे. इतरांना पाडून नाही तर बरोबर घेऊन सर्वांनीच जीवनाचा सुखानंद हा देऊन आणि घेऊन उपभोगायचा, हाच त्या छोट्या संदेशा मागचा मोठा गुढार्थ आहे.

“स्व’कडून सर्वांपर्यंत घेऊन जाणारी ही शिकवण माणसाला माणूस जोडणारी, मानवता जागवणारी आणि विश्‍वकल्याणाची अपेक्षा बाळगणारी आहे. त्यामुळेच ती छोटी असली तरी आदर्श आचरणीय आणि अनुकरणीय आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)