जीवनगाणे : जीवन वाहू दे

-अरुण गोखले

सुप्रसिद्ध साहित्यिक विचारवंत आणि लेखक आचार्य अत्रे ह्यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे की, “वाहते ते जीवन आणि साचते ते डबके’ मानवी जीवनाला जीवनाची म्हणजेच पाण्याची दिलेली उपमा, खरचं किती सार्थ आहे नाही का?

‘वाहणे’ हा जीवनाचा स्वभावधर्म आहे. त्याने सदैव प्रवाहितच राहायला हवे. कारण प्रवाहित राहणाचा प्रवास असतो खाच खळग्यातून, डोंगर कपारीतून. त्यामुळेच त्या सर्वांतून खळाळत जे पुढे जाते ना तेच जीवन म्हणजेच पाणी हे नितळ आणि स्वच्छ होत जाते.

मानवी जीवनाचही तसंच आहे. त्यानेही अडीअडचणीतून, संकटातून धैर्याने मार्ग काढत काढत सदैव पुढेच जायला हवे. त्याने एके ठायीच न थांबता सतत पुढचा पुढचा प्रवास केला पाहिजे. पाणी हे प्रवाहित असते म्हणून ते आपल्या सोबतच्यांनाही नित्य एक निखळ आनंद देत असते. त्या प्रवाहित जीवनाला एक नाद असतो, लय असते, ताल असतो. ते एक सुंदर असे जीवनगाणे असते. त्या गाण्याच्या श्रवणाने श्रोता आणि ते सुरेल गीत गाणारा स्वानंदी दोघेही आनंदीत होतात.

आपणही आपले जीवनगाणे असेच सुरेल आणि सुश्राव्य करायला हवे. ते गात गात पुढे जायला हवे. त्यासाठी जीवन हे वाहतेच राहायला हवे. कारण जर ते प्रवाहित राहिले नाही ना तर ते साचलेल्या डबकांसारखे होते. त्या साचलेल्या डबक्‍यात वृत्तीच्या अळ्या वळवळायला लागतात. तिथे स्वार्थाचे मासे वाढतात. कुप्रवृतीचे बेडूक डराव डराव करायला लागतात. ते पाणी गढूळ होते. अस्वच्छ होते. मग कालपर्यंत तोंड लावायला येणारी जनावरेही अशा गढूळ मलिन पाण्याकडे पाठ फिरवतात.

आपल्याही जीवनाच तसंच होऊ नये म्हणून आपणही आपला जीवनप्रवाह हा प्रवाहितच ठेवायला हवा. ज्याप्रमाणे पाण्याचा प्रवाह हा त्याच्या काठच्या लोकांना संतुष्ट व तृप्त करतो, तसंच आपणही आपल्या अवतीभवतीच्या लहानथोर सर्वांनाच आपल्यापरीने सुखीसमाधानी ठेवायला हवे. त्यांच्या जीवनाची फुलबाग फुलवायला हवी. त्यांना फुलवत आणि खुलवत नेलं ना तर आपल्याही जीवनाची बाग फुलते. आपल्यालाही एक लय सापडते, आपलेही जीवनगाणे सुरेल होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)