संडेस्पेशल : जीवनशक्‍तीचा विकास

-अशोक सुतार

हाताची बोटे जशी सारखी नसतात, तसे प्रत्येक मनुष्याचे वर्तन, बुद्धी एकसारखी असणार नाही. आयुष्यात येणारी संकटे, आनंदोत्सव यांना सहजपणे सामोरे जावे. मनुष्याचे शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम असले पाहिजे. हे होण्यासाठी जीवनशक्‍तीचा विकास शरीर व मनात झाला पाहिजे.

आपण निसर्गात हिंडतो, पाण्याने भरलेले तलाव, समुद्राच्या लाटा, उंच डोंगर, हिरवीगार झाडे, विविध रंगांची आकर्षक फुले, फुलपाखरे पाहतो. निसर्गाच्या कुशीतील हे सोबती पाहताना मनुष्याची मनोवस्था सकारात्मक विचारांनी भरलेली असते. मनुष्याचे शरीर पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी या पंचतत्त्वांनी बनलेले असते, त्यावर पोसलेले आहे. त्यामुळे मनुष्याला निसर्गसान्निध्यात राहिले तर जास्त ऊर्जाशक्ती मिळते. मनुष्य संपन्न निसर्गाशिवाय जगू शकत नाही. आपण ज्या वातावरणात राहात असू, तिथे जर गर्दी असेल तर मन सैरभैर होते.

मनाची एकाग्रता संपते. त्याचा परिणाम मनुष्याच्या निर्णयक्षमतेवर होतो. अशा वेळी मनुष्य बाह्य परिस्थितीच्या अधिन होऊन त्याच्या अंतर्मनाशी संबंध तोडतो. त्यावेळी त्याच्या जीवनशक्‍तीचा ऱ्हास होण्यास सुरुवात होते. प्रत्येक घटनांचे बरेवाईट परिणाम होत असतात. मनुष्याचे मन जगण्याचे कारक आहे. जगात कोणतीही गोष्ट जेव्हा घडते, त्याच्या पाठीमागे निश्‍चित कारण असते. कारणाशिवाय जगात कोणतेही कर्म घडत नाही, असे तथागत गौतम बुद्ध सांगतात.

जसा आपण विचार करतो, तसे आपण घडतो. जगातील कोणतीही गोष्ट वाईट नसते. आपले विचारच एखाद्या गोष्टीला चांगले व वाईट ठरवत असतात. तुम्ही कसे विचार करणार, त्यावर जगातील गोष्टी बऱ्या की वाईट हे ठरते. त्यामुळे “विचार असो द्यावेत सकारात्मक, ते नसावेत नकारात्मक.’

शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळ, चित्रकला शिकवले जाते. कारण बुद्धीसोबत विद्यार्थ्यांच्या इतर गुणांची पातळी वाढणे महत्त्वाचे असते. खेळामुळे मन प्रसन्न होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या शरीरात आंतरिक ऊर्जास्रोत आहे, त्याचा वापर केलात तर जगातील मोठी कामे लीलया पार पाडाल. सुदृढ शरीरात सुदृढ मन बसण्यासाठी आमचे शरीर मजबूत हवे. एखादा विद्यार्थी जेव्हा चित्रकला, हस्तकला अशी नवनिर्मिती करत असतो, त्यावेळी त्याची जीवनशक्‍ती वाढत असते. जीवनशक्‍ती हे मानवाला मिळालेले नैसर्गिक वरदान आहे.

अंतर्मनातील जीवनशक्‍तीचा विकास जे करून घेतात, त्यांना जगात चांगले जगता येते. आपण निसर्गसंपन्न नदी, तलावात पोहतो, त्यावेळी पोहताना शरीरात एक ऊर्जास्रोत तयार होतो, मन प्रसन्न होते. निसर्गातील धबधबे, लाटा, नदीचा वाहता प्रवाह क्षणभर पाहिला तरी समाधान वाटते. आपल्या शरीरात त्याचप्रकारचा ऊर्जाप्रवाह शरीरभर फिरू लागतो. काम करताना सतेज वाटते. आपण आपल्या शरीराचे, मनाचे व आजूबाजूला घडणाऱ्या सकारात्मक गोष्टींचे विश्‍लेषण केले पाहिजे. निसर्गात फिरून पाखरांच्या किलबिलाटाचा मधुर ध्वनी ऐकला पाहिजे. निसर्गाचे संगीत ज्याला समजले, त्याची जीवनशक्‍ती विकसित होते.

कविवर्य बा. भ. बोरगावकर “तू तुझाच दीप’ या कवितेत म्हणतात, तू तुझाच दीप आणि तू तुझीच वाट, तू तुझाच क्रूस आणि तू तुझाच घाट. तथागत गौतम बुद्ध म्हणतात, “अत दीप भव’ याचा अर्थ, तू तुझा दीप आहेस, तो प्रज्वलित कर आणि विकास कर. जीवनशक्‍तीचा विकास करून आपण या जगात उत्साहाने जगू शकतो, सकारात्मक कामे करण्यासाठी आणि नवे जग घडविण्यासाठी!

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)