प्रेरणा : दिव्यांग मुलीची शिक्षणात प्रगती

-दत्तात्रय आंबुलकर

विदर्भातील यवतमाळ-दारव्हा मार्गावरील लाडखेड या गावच्या उंचीने दीड फूट असणाऱ्या सुमैय्याने दोन वर्षांपूर्वी दहावीच्या व यंदा बारावीच्या परीक्षेत विशेष उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. टक्‍केवारीच्या संदर्भातच सांगायचे झाल्यास सुमैय्याने दहावीत 75 टक्‍के तर त्यापाठोपाठ बारावीत 76 टक्‍के गुण प्राप्त करून उंचीने दिव्यांगपण आले असले तरी आपल्या शैक्षणिक प्रगतीत मोठी उंची गाठली आहे.

सुमैय्याची आई अफरोज यांचे शिक्षण बारावीपर्यंतच झालेले. त्या सांगतात की, त्या पाच महिन्यांच्या गर्भार असतानाच सुमैय्याच्या दिव्यांगपणाची व त्यावर फारसा इलाज उपलब्ध नसल्याची माहिती त्यांच्या डॉक्‍टरांनी दिली होती. घरी-शेजारी असा गर्भ काढून टाकलेलाच बरा अशी अनाहूत चर्चा पण होत असे. मात्र, अफरोज यांनी आई म्हणून आपली “मन की बात’ ऐकली व सुमैय्याला केवळ जन्मच दिला असे नव्हे तर तिचे काळजीने पालन-पोषण, शिक्षण पण केले.

दिव्यांग असणाऱ्या बाल सुमैय्याला अपंग-अपाहिज न म्हणता व तिला केवळ घरातच डांबून न ठेवता तिच्या आई-वडिलांनी तिला बाहेरचे जग पण दाखविले. या साऱ्या प्रयत्नांमध्ये तिच्या अम्मी-आजीची मोठीच साथ लाभली व शेजारील मुले, झाडे, शेती, पशु-पक्षी याकडे पाहात सुमैय्याचे शिक्षण सुरू झाले.

घरच्यांनी पुढे सुमैय्याचे नाव शाळेत घातले. त्यासाठी तिला कडेवर घेऊन शाळेत नेणे-आणणे, तिला कुणाचा धक्‍का लागणार नाही याची काळजी खासकरून घेतली जात असे. हे प्रयत्न निश्‍चितच कठीण होते. पण सुमैय्याच्या कुटुंबाने हे प्रयत्न सातत्याने व अव्याहतपणे केले व त्याचेच आता फळ लागले आहे.

सुमैय्या पाचवी इयत्तेत गेल्यावर तिच्या घरच्यांना “सर्वशिक्षा अभियान योजने’अंतर्गत व्हीलचेअर मिळाली व त्यामुळे सुमैय्याला शाळेत जाण्या-येण्याची मोठी सोय झाली. यातून सुमैय्याच, नव्हे तर तिच्या घरच्यांचा, शिक्षकांचा उत्साह वाढला. सुमैय्याला महंमद सादव व महंमद शाहीत यांची पण मदत मिळत गेली व सुमैय्याची शैक्षणिक प्रगती निरंतर होत गेली. तिच्या जिद्दीने हे सारे शक्‍य झाले.

आज चांगल्या गुणांसह 10 वी व 12 वी उत्तीर्ण झालेल्या सुमैय्याने अभ्यासक्रमातील इंग्रजी, पर्शियन, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, पर्यावरण विज्ञान, आरोग्यविज्ञान इ. विषयांच्या उत्तरपत्रिका कुठल्याही लेखनिकाच्या मदतीविना दिल्या. यावरून तिची बुद्धिमत्ता व चिकाटीचा प्रत्यय येतो.

सुमैय्याच्या बालपणापासून तिच्या दिव्यांगत्वाबद्दल चिंतीत असणारे तिचे वडील अब्दुल अजीज हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करीत असून त्यांना आज आपल्या मुलीचा मोठाच अभिमान वाटत आहे. सुमैय्याला आता अधिक शिकवून “उसे तो अब अफसर बनाना है’ असा त्यांचा ध्यास असून त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न पण सुरू झाले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)